शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी निविष्ठा देण्याचे नियोजन करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावर जाऊन कृषी निविष्ठा खरेदी केल्यास तेथे गर्दी होण्याची शक्यता आहे. शिवाय कृषी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यास विषाणूचा संसर्ग वाढू शकतो.

त्यामुळे कृषी निविष्ठा पुरवठाधारकांनी / कंपन्यांनी कृषी विभागाच्या सहाय्याने शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी निविष्ठा देण्याचे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या.

जिल्ह्यातील कृषी अधिकारी व कृषी निविष्ठा विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी पंकज बरडे, यवतमाळ जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रदीप बनगीरवार, सचिव रमेश बुच, प्रदीप ओमनवार आदी उपस्थित होते.

जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारित आहे. शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या कृषी निविष्ठा वेळेवर प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे, असे सांगून पालकमंत्री श्री.राठोड म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी खरीपाचे नियोजन करीत आहे.

कोरोनाचा धोका लक्षात घेता कुठेही गर्दी न होऊ देणे, याला शासन आणि प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.

त्यामुळे कृषी निविष्ठा खरेदीकरीतासुद्धा गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी गटांमार्फत सरळ शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणे, खते, किटकनाशके व शेतीकरिता लागणारे आवश्यक साहित्य पोहोचवावे.

शेतकऱ्यांनीसुद्धा शेतकरी गटांमार्फत बांधावरच एकत्रितरित्या हे साहित्य खरेदी करावे.

यासाठी शेतकऱ्यांना ज्या कृषी केंद्रातून साहित्य खरेदी करावयाचे आहे त्या दुकानाच्या नावासह खरीप हंगामामध्ये आवश्यक असणारे विविध पिकांचे वाणनिहाय बियाणे, खते यांची मागणी शेतकरी गटांकडे करावी.

सोबतच शेतकऱ्यांनी स्वत:चे नाव, पत्ता, शेतसर्वे क्रमांक, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक सुद्धा द्यावे.

मागणी असलेल्या निविष्ठांची नोंदणी गटांकडे झाल्यावर गट प्रमुखाने खते, बियाणे खरेदी करावे, जेणेकरून त्यांना कृषी केंद्रावर जावे लागणार नाही.

ज्या विक्रेत्यांना शक्य आहे, त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोबाईल ॲप तयार करून त्यावर मागणी नोंदवावी. कोणत्याही निविष्ठांचा गटामार्फत पुरवठा करताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी सामाजिक अंतर ठेवावे, मास्क,

सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी स्वत: आर.सी.एफ, इफको, कृभको,

कोरोमंडल व इतर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फोनवर चर्चा करून यवतमाळ जिल्ह्यात रासायनिक खते उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या.

जिल्ह्यात खरीप हंगाम २०२०-२१ साठी १.६६ लक्ष मे. टन खतांचे आवंटन मंजूर असून यापैकी ३१ हजार मे. टन खत उपलब्ध झाले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment