मानवरुपी परमेश्वरामुळेच बरा झालो – बरा झालेल्या कोरोना रुग्णाची डॉक्टरांप्रती कृतज्ञता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यवतमाळ, दि. 11 : कृषी क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक असल्यामुळे शहरापासून गावखेड्यापर्यंतच्या  नागरिकांशी नियमित संपर्क येतो. व्यवसायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी फिरणे आलेच.

त्यामुळे अलर्जी व खोकल्याचा त्रास सुरवातीपासूनच होता. पण त्यात कोरोनाची लागण झाल्याचे कळताच मनात थोडी धास्ती वाटली.

मात्र यातून आपण लवकरच बरे होऊ असा ठाम विश्वास होता. त्याला कारणही तसेच होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी प्रत्येक क्षणी आमच्यासाठी घेतलेली मेहनत अनुभवायला मिळाली.

या मानवरुपी परमेश्वरामुळेच आम्ही बरे झालो, अशी कृतज्ञता व्यक्त केली कोरोनाची लागण झालेल्या व आता पूर्णपणे ठणठणीत असलेल्या व्यावसायिकाने.  कोरोनावर उपचार शक्य आहे.

त्यामुळे नागरिकांनो घाबरू नका मात्र प्रशासनाच्या आदेशाचे पालन करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जिल्ह्यात सुरवातीला तीन जण कोरोना पॉझेटिव्ह निघाले. त्यात मी आणि माझी पत्नी होतो. आम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. तिघांसाठीही वेगवेगळी खोली, वेगवेगळे संडास-बाथरूम, सर्वत्र स्वच्छता.

अशी नियोजनबध्द कार्यपध्दती तर मोठमोठ्या खाजगी दवाखान्यातसुध्दा अनुभवायला मिळत नाही. जे आम्ही यवतमाळ शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात अनुभवले. आम्ही तर पॉझेटिव्ह पेशंट होतो.

पण येथील डॉक्टर्स, नर्स व त्यांच्या संपूर्ण स्टाफने अतिशय काळजीपूर्वक व आपुलकीने आमच्यावर उपचार केले. इतरत्र ऐकून होतो की, अशा पेशंटजवळ कोणी येत नाही.

पण तत्कालीन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे किट परिधान करून आमच्या खोलीमध्ये येऊन आस्थेने विचारपूस करीत होते. एवढेच नाही तर आम्हाला घरचे जेवण घेण्याची मुभा होती.

घरून टिफीन आला की नाही, वेळेवर जेवले की नाही, अशा कितीतरी बाबींची डॉक्टरांकडून विचारणा होत होती. त्यांनी केलेल्या उपचारांमुळेच आमचा पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे प्रवास सुकर झाला, ते सांगत होते.

डॉक्टरांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. हे ऋण या जन्मात फेडणे नाही. मी देवीचा भक्त असल्यामुळे वर्षातून पंधरा दिवस आम्ही दोघेही पती-पत्नी देवीची उपासना करतो.

मात्र आम्हाला विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर खुद्द परमेश्वररुपी डॉक्टरांनीच भक्तांची सेवा केली, असे म्हणावे लागेल. आम्ही 14 दिवस दवाखान्यात होतो. दुसरे आणि तिसरे नमुने निगेटिव्ह आल्यावर आम्हाला घरी सोडण्यात आले.

तेव्हापासून घराचा उंबरठा आम्ही ओलांडला नाही. पूर्णपणे बरे झालो असलो तरी शासनाच्या व प्रशासनाच्या आदेशांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

जीवनावश्यक वस्तू आमचे नातेवाईक संरक्षण भिंतीच्या गेटवर आणून ठेवतात. त्यांना घरात तर सोडा आवारातसुध्दा आम्ही प्रवेश देत नाही व आम्ही गेटववरून वस्तूंची पिशवी घेतली की आतमध्ये, अशी सध्या दिनचर्या आहे.

जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी घरातच राहावे व प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे, अशी हातजोडून विनंतीही त्यांनी केली.

आमच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना लागण झाली नाही, याबाबत समाधान व्यक्त करून ही परमेश्वराचीच कृपा आहे, असेही त्यांनी सांगितले.

रुग्णांना निगेटिव्ह करण्यासाठी प्रशासनाची पॉझेटिव्ह धडपड : आयसोलेशन वॉर्डात दाखल केलेल्या व पॉझेटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांचे पहिल्या दिवसापासूनच मनोबल वाढविण्यासाठी वेळोवेळी समुदेशन करण्यात येत होते.

ड्युटीच्या शिफ्टनुसार 24 तास त्यांच्यावर लक्ष देण्यात आले. ज्या पदार्थांमध्ये ‘व्हिटॅमीन सी’ जास्त आहे असे पदार्थ, प्रोटीन जास्त असलेले पदार्थ, बादाम, अंजीर, दोन अंडी, संत्री आदी आहार या रुग्णांना वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आला.

यावर मात करण्याचा पूर्ण विश्वास आम्हा डॉक्टरांना होता, असे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे सांगत होते.

पॉझिटिव्ह नंतर जेव्हा निगेटिव्ह रिपोर्ट आले, तेव्हा सर्वांना केलेल्या परिश्रमाचे फळ मिळाल्याचे समाधान होते. न्युमोनिया, लकवा, खोकला, ताप असलेल्या 62 वर्षीय वृध्दाला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अतिशय गंभीर अवस्थेतून त्यांना बाहेर काढू शकलो.

विशेष म्हणजे याच वृध्द व्यक्तीवर उपचार करताना महाविद्यालयातील डॉक्टर्स, नर्स व इतर स्टाफ असे एकूण 44 त्यांच्या संपर्कात होते. या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाला, असे सांगतांना डॉक्टर गहिवरले.

जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांना प्रत्येक बाबीची माहिती वेळोवेळी देण्यात येत होती. त्यांच्या सहकार्यानेच आम्ही हे सर्व करू शकलो.

पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून जिल्हा प्रशासनाने खनिज विकास निधी, नियोजन समितीचा निधी तसेच आपत्ती व्यवस्थापनाचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिला.

त्यातूनच पीपीई किट, मास्क आदी गोष्टी उपलब्ध झाल्या. वैद्यकीय महाविद्यालयात विषाणू संशोधन चाचणी प्रयोगशाळेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

रुग्णांची संख्या जिल्ह्यात वाढली असली तरी या संकटावर सर्वांच्या सहकार्याने नक्कीच मात करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रशासनाच्या या धडपडीत पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, विद्यमान अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण तसेच सर्व डॉक्टर्स, नर्स व इतर स्टाफ असे प्रत्येकाचे योगदान आहे.

Leave a Comment