Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

भुकेल्या वाटसरूंना मिळाले मायेचे दोन घास

0

नाशिक, दि. १२ (जिमाका वृत्तसेवा) : लॉकडाऊनमध्ये अडकलेले आणि आर्थिक टंचाईने ग्रासलेले हजारो जीव आता मुंबई, ठाण्यात राहण्यापेक्षा आपापल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत.

घरात होतं नव्हतं तेव्हढं सोबत घेवून मिळेल त्या वाहनाने किंवा पायीच निघालेल्या वाटसरूंना आयुष्याच्या या अनवट वाटेवर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून उभ्या असलेल्या  सेवाभाव संस्थांच्या माणुसकीने धीर दिला आहे.

जवळपास १०० हून अधिक सेवाभावी संस्था ची मोट बांधून त्यांच्यासाठी दोन घासांची सोय केली, त्यांच्यासोबतच्या इवल्याशा जीवांसाठी पाणी, दूध, फुड्स पॅकेट्स  पुरवून ‘होय, अजूनही माणुसकी जीवंत आहे’ असा संदेशच दिला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर परप्रांतीयांचा मोठा जथ्थाच उतरला आहे. शेकडो किलोमीटर अंतर कापून रणरणत्या उन्हाने पोळून निघालेल्या या कामगार, मजुरांसह, लहानमुलांसाठी नाशिक जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वयंसेवी संस्थांचे आभार : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

नाशिकमधून जाणाऱ्या प्रत्येक परप्रांतीयांना अन्नधान्य आणि जेवण पुरविवण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यासाठी जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत.

त्या निरपेक्ष पद्धतीने आपले काम करीत असून, त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळेच जिल्हा प्रशासन आज लाखो लोकांना अन्नदान करू शकले असल्याची माहिती देत असतांनाच या सर्व स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आभार मानले.

चांदवड येथील गुरुद्वाराने ३० हजार लोकांना अन्नदान केले. मनमाड येथील गुरुद्वाराने १८ हजार लोकांना, विल्होळी येथील गुरुद्वाराने दिवसाला ३ हजार लोकांना असे पाच दिवस अन्नदान केले आहे.

तर नाशिक रोड येथील गुरुद्वाराने लॉकडाऊन काळात २२  हजार ५०० लोकांना अन्नदान  केले असल्याची माहिती श्री. मांढरे यांनी दिली आहे.

वाटसरूनी व्यक्त केले समाधान : उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे

माणुसकीची वागणूक तसेच वेळीवेळी केलेली जेवणाची सोय तसेच गावाकडे जाण्यासाठी  विनामूल्य वाहन व्यवस्था त्यामुळे वाटसरूनी जिल्हा प्रशासनाचे व त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व स्वंयसेवी संस्थांप्रति आभार व्यक्त केले आहे.

अशा दानशूर स्वंयसेवी संस्थांचा आदर्श घेवून येणाऱ्या काळासाठी इतरही संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी केले आहे.

एकाचं दिवशी हजारोंची भागविली भूक

विविध स्वयंसेवी संस्थानी नाशिक शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी आपल्या गावी  जाणाऱ्या परप्रांतीयांना वाटेत १० मे रोजी या एकाच दिवशी एकूण ३२ हजार लोकांना अन्नदान केले आहे.

यात सकल जैन संघटना यांच्यामार्फत जुना नाशिक, सिडको, सातपूर, अंबड व पाथर्डी, द्वारका ते नाशिकरोड, आग्रा हायवे, विल्होळी मंदिर तसेच सिव्हील हॉस्पिटल, आर. के. स्थानक येथील लोकांना अन्नदान केले आहे.

सकल जैन संघटना व वेलकम सहकार्य मित्र मंडळ यांचेमार्फत जुने नाशिक, भद्रकाली, गंगाघाट येथे अन्नदान सुरू आहे.

श्री गुरुद्वारा गुरुनानक दरबार शिंगाडा तलाव यांचेमार्फत शिंगाडा तलाव येथील लोकांना, श्री गुरुव्दारा देवळाली व रॉबीन हुड आर्मी यांचेमार्फत,

अमिगो लॉजेस्टीकस इंडिया व दिनीयत संस्था यांचेमार्फत बेलतगव्हाण, व्हिलरेज, बिटको, उपनगर कॅनाल रोड, गोरेवाडी, जेलरोड, बागुल नगर झोपडपट्टी येथील लोकांना,

वुई फाउंडेशन यांचे मार्फत सिव्हील हॉस्पीटल नाशिक येथील लोकांना, श्री. अनिकेत उपासनी यांचेमार्फत रंगरेज कॉलनी, वडाळा येथे अन्नदान करण्यात आले आहे.

श्री गुरुद्वारा नाशिकरोड यांचेमार्फत मातोश्री आश्रम, रेल्वे कामगार येथील लोकांना अन्नदान करण्यात येते आहे. गुरुव्दारा नाशिकरोड व रॉबीन हुड आर्मी, श्री गुरुव्दारा हिरावाडी यांचे मार्फत हिरावाडी येथे,

श्री गुरुव्दारा पंचवटी व रॉबीन हुड आर्मी यांचेमार्फत पंचवटी येथे, श्री गुरुव्दारा इगतपुरी यांचे मार्फत, श्रीजी प्रसाद व झेप व नयनतारा ग्रृप, गुरमित बग्गा यांचेमार्फत गाडगेबाबा निवारा, इंद्रकुंड निवारा, मखमलाबाद नाका शाळा,

म्हाडा कॉलनी पाथर्डी फाटा, पंचवटी परिसर येथे अन्नदान करण्यात आले आहे. तसेच  तपोवन मित्र मंडळ, सुजाण नागरिक मंच, तुलसी आय हॉस्पिटल, संदीप फाऊंडेशन, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, पांजरापोळ,

गोली वडापाव, माऊली द फुड, नाशिक ऑप्टीकल फ्रेण्डस, रुहानी मिशन देवळाली,श्वास फाँऊडेशन, इस्कॉन, विवेकानंद केंद्र, सिद्धांत युवा फाऊडेशन, ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संघटना व इतर दानशून व्यक्तींना अन्नदानाचे पवित्र कार्यात मोलाचा वाटा उचलला आहे.

li