Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

नागरिकांनी घाबरून जाऊ नये – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

0

शिर्डी : जगासह देशात व महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. सध्या कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यावर येऊ पहात असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

संगमनेर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

ही  उपाययोजना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असून शहर व तालुक्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांवर विश्वास न ठेवता घरीच सुरक्षित थांबावे, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

कोरोनाबाबत संगमनेरातील जनतेला अवाहन करताना श्री.थोरात म्हणाले, कोरोना हे मानव जातीवरील संकट आहे.

कोरोना हा अदृश्य शत्रू असून त्याचा मुकाबला करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क वापरणे याचबरोबर गर्दी करणे टाळणे व विनाकारण घराबाहेर पडणे टाळणे हे अत्यावश्यक आहे.

या नियमांचे पालन केले तर आपण निश्चितच कोरोनाची साखळी तोडू शकतो. कोरोना संसर्ग तिसऱ्या टप्प्यावर येऊ नये आणि तो रोखण्यासाठी देशात, महाराष्ट्रात व तालुक्यात कोरोनाची साखळी तोडणे अत्यंत गरजेचे आहे.

मागील दीड महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊन असून महाराष्ट्र शासनाने कोरोना प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रभावी आणि अत्यंत चांगले काम केले आहे.

प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि इतर सर्व शासकीय कर्मचारी अत्यंत सेवाभावीपणे आपले काम करत आहे.

या सर्वांना संपूर्ण सहकार्य करणे प्रत्येक नागरिकांचे मुलभूत कर्तव्य आहे. आपण घरीच थांबलो तर या सर्वांवरील ताण कमी होईल. अशा संकटाच्या काळात आपण सरकारच्या सोबत राहणे गरजेचे आहे.

संगमनेर तालुक्यात व शहरात कोरोनाचे काही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रुग्ण आढळलेल्या भागांमध्ये हॉटस्पॉट जाहीर करून लॉकडाऊनची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

त्यामुळे  काही ठिकाणचे भाग सील केले गेले आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अफवा पसरविल्या जात असून नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये.

तसेच अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असे सूतोवाच त्यांनी केले. तसेच नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेबरोबर कुटुंबियांच्या सुरक्षिततेकरिता स्वतः घरी थांबा, विनाकारण घराबाहेर पडणे टाळा आणि मास्कचा वापर करा  असे आवाहनही केले.

शासन व प्रशासन आपल्यासाठी काम करत आहे. संगमनेर शहर, कुरण,  धांदरफळ, घुलेवाडी या परिसरातील नागरिकांना थोरात यांनी दिलासा दिला आहे. या सर्व परिस्थितीवर आपण लक्ष ठेऊन असून प्रशासनाला वेळोवेळी सूचना देत आहोत.

आपल्या सर्वांची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही थोरात यांनी केली आहे.

li