जागतिक परिचारिका दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई, दि. 12: कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या, प्रसंगी डॉक्टरांच्याही एक पाऊल पुढे जाऊन जोखीम पत्करुन रुग्णांची सेवासुश्रूषा करणाऱ्या

‘परिचारिका’ भगिनींच्या सेवाकार्याची नोंद मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक ‘परिचारिका’ दिनानिमित्त समस्त  परिचारक बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.

जागतिक ‘परिचारिका’दिनाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, मानवतेच्या कल्याणात रुग्णसेवेचे स्थान सर्वोच्च आहे. जगभरातल्या परिचारिकांनी त्यांच्या सेवाकार्यातून मानवतेची अखंड सेवा केली आहे.

परिचारक बंधु-भगिनींना समाजात स्नेहाचं, आदराचं स्थान लाभत आलं आहे. आज जगावर कोरोनाचं संकट असताना असंख्य परिचारिका भगिनी देवदूत बनून रुग्णांची सेवा करत आहेत.

उपचारांच्या बरोबरीनं रुग्णांना धीर, विश्वास, आत्मबळ देत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत याच परिचारिकांची भूमिका मुख्य असून या लढाईत त्याच मुख्य सैनिक आहेत.

स्वत:च्या जीवाची जोखीम पत्करुन, कुटुंबाचा विचार बाजूला ठेवून असंख्य परिचारिका भगिनी आज दिवसरात्र रुग्णसेवा करीत आहेत. शहरी, ग्रामीण, दुर्गम भागात कर्तव्य बजावत आहेत.

त्यांच्या सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास शब्द अपुरे आहेत, अशा भावना उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

‘कोरोना’वर सध्यातरी कोणतेही हमखास औषध नसल्यानं रुग्णांची योग्य काळजी आणि शुश्रूषा हीच आरोग्य संजीवनी ठरत आहे. हे काम परिचारिका भगिनी अत्यंत सेवाभावानं, तन्मयतेने करत आहेत,

त्यामुळे महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधित रुग्णांचं कोरोनामुक्त  होण्याचे प्रमाण चांगले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत समस्त परिचारक बंध-भगिनींचं हे योगदान कोणीही विसरू शकणार नाही.

साथीचे आजार, इतर दुर्धर आजार, सध्याचं कोरोनाचं संकट अशा अनेक संकटांचा सामना या परिचारिका भगिनी करीत असतात.

त्यांच्या सेवाकार्याची नोंद घेऊन त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांचं मनोबल वाढवणं, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणं हे आपले कर्तव्य आहे.

कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकणार असून या विजयात परिचारिकांचा वाटा सर्वात मोठा असेल, त्यांच्या कार्याची नोंद सुवर्णाक्षरांनी होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

Leave a Comment