Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

श्रमिक विशेष रेल्वे बिहारकडे रवाना

0

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : पालकमंत्री सतेज पाटील यांनी थेट केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या कार्यालयात संपर्क साधल्यानंतर रद्द केलेली तिकिटे रेल्वे प्रशासनाने पुन्हा वितरित केली.

यानंतर ‘भारत माता की जय!’ अशा घोषणा देत बिहारमधील 1 हजार 320 मजूर श्रमिक विशेष रेल्वेने आज सायंकाळी 7.20 वा. छपराकडे रवाना झाले.

प्रशासनाने त्यांची केलेली सुविधा आणि गावी जाण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. प्रवाशांनीही टाळ्या वाजवून आणि घोषणा देवून हा आनंद व्यक्त केला.

बिहार शासनाकडून मंजुरी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने हातकणंगले तालुक्यांमधील मजुरांना राज्य परिवहन महामंडळाच्या 49 बसमधून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे आज आणले.

याठिकाणी प्रवासाची रेल्वे तिकीटे त्यांना देण्यात आली. थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर याचा वापर करत त्यांना रेल्वेच्या बोगीमध्ये प्रवेश देण्यात आला.

यावेळी जेवण, सकाळच्या नाश्त्यासाठी बिस्कीटे, अन्य खाद्य पदार्थ, पाणी व मास्क याचे वाटप डॉ.महादेव नरके यांच्या समन्वयाखाली पथकाने सर्व कामगारांना केले.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी साधला केंद्रीय रेल्वेमंत्री कार्यालयाशी संपर्क

रेल्वे प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला सुरुवातीला 1 हजार 304 तिकिटे वितरित केली. त्यानंतर 1 हजार 240 मजुरांना बोगीत बसवून उर्वरित 64 तिकिटे रद्द केली.

रेल्वे स्थानकात थांबलेल्या मजुरांसाठी रेल्वेमध्ये प्रवेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिकारी विनंती करीत होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील याठिकाणी आले.

झालेल्या प्रकाराची दखल घेत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांच्याशी संपर्क साधत त्यांनी झालेला प्रकार सांगितला.

यानंतर त्यांनी थेट केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून उर्वरित मजुरांना प्रवासाची परवानगी देण्याबाबत मागणी केली.

यानंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी दूरध्वनीवरुन स्टेशन प्रबंधकांना संपर्क साधत सूचना दिल्या. प्रांताधिकारी डॉ.विकास खरात यांनीही विभागीय रेल्वे व्यवस्थापकांशी संपर्क साधून झालेला प्रकार सांगितला.

यानंतर रेल्वे प्रशासनाकडून 80 तिकिटे वितरित करण्यात आली. रेल्वे स्थानकावर चिंतेने थांबून असणाऱ्या मजुरांना बोगीमध्ये प्रवेश देण्यात आला आणि त्यांच्या चेहऱ्यावर क्षणार्धात आनंद पसरला.

डॉ. नरकेंच्या समन्वयाखाली मजुरांसाठी किटची व्यवस्था

गेले तीन दिवस जिल्ह्यामधून आपापल्या गावी परतणाऱ्या विविध मजुरांना त्यांच्या दोन दिवसाच्या जेवणाची व्यवस्था डॉ.महादेव नरके यांच्या समन्वयाखाली सुरु आहे.

प्रत्येक कामगाराला जेवण, नाश्ता, पाण्याची बॉटल आणि मास्क याचे वितरण होत आहे. यासाठी एस.एच.पाटील, डी.डी.पाटील, विनायक सूर्यवंशी, आनंदा करपे, किशोर आयरे,

सागर पाटील, प्रविण पाटील, पार्थ मुंडे, दिपक थोरात, तौफिक मुल्लाणी, सचिन चव्हाण, संजय पोवार, विजय सूर्यवंशी, आदित्य कांबळे, अक्षय शेळके, अभिजीत भोसले, प्रशांत गणेशाचार्य हे पथक सहभागी झाले आहे.

‘भारत माता की जय!’ अशा घोषणा देत श्रमिकांना घेवून अखेर ही विशेष रेल्वे बिहारकडे निघाली. मजुरांनीही टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.

यावेळी इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, हातकणंगलेचे तहसिलदार प्रदीप उबाळे, पोलीस उप अधीक्षक नंदकिशोर भोसले-पाटील, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील, नगरसेवक शारंगधर देशमुख, राहूल माने, माजी महापौर सागर चव्हाण आदी उपस्थित होते.

li