Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

परप्रांतीय मजुरांना मूळ गावी सोडण्यासाठी एस.टी. बसेस रवाना.!

0

अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका) : कोकणातील श्रीवर्धन तालुक्यामधून परप्रांतीय मजूरांना घेऊन तीन एस.टी. बसेस बोर्ली पंचतन आगारातून बुधवारी, संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास रवाना झाल्या.

सांगली-कराड लगत असणाऱ्या कर्नाटक सीमेवरील जत या ठिकाणी या एस.टी. बसेस मार्गस्थ झाल्या. श्रीवर्धन आगारातून एकूण तीन बसेस निघाल्या असून प्रत्येक गाडीत प्रत्येक 22 याप्रमाणे एकूण 66 प्रवाशी कर्नाटक सीमेच्या दिशेने जाणार आहेत. प्रवासासाठी एकूण प्रासंगिक कराराच्या दृष्टीने 44 रुपये प्रति किमी या दराने प्रवासी भाडे आकारले जात आहे.

प्रत्येक  गाडीत सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टिकोनातून एका आसनावर प्रत्येकी एका व्यक्तीलाच बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

एस.टी.बस डेपोमधून मार्गस्थ होण्यापूर्वी सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी करुन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या दाखल्याच्या आधारे त्यांना प्रवासासाठी प्रमाणित करण्यात आले.

त्याचसोबत या तीनही एसटी बसेस आगारातून सुटण्याअगोदर सॅनिटायझर ने निर्जंतूक करण्यात आल्या असल्याचे श्रीवर्धन आगाराचे वाहतूक नियंत्रक श्री. प्रसाद मोरे यांनी सांगितले.

हे सर्व प्रवासी प्रामुख्याने क्वारी वर काम करणारे मजूर असून प्रवासादरम्यान या मजूरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था देखील बोर्ली मंडलाच्या प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

एस.टी. महामंडळाने आखून दिलेल्या मार्गानेच व वाटेत प्रसाधनाव्यतिरिक्त अन्य कुठेही न थांबता थेट कर्नाटक सीमेवरील जत या ठिकाणीच बसेस जाणार आहेत.

श्रीवर्धन प्रांताधिकारी श्री. अमित शेडगे, तहसिलदार श्री. सचिन गोसावी, विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी सुनील मोरे, तलाठी निलेश पवार,

संदीप सोरे, मिलिंद पुट्टेवाड व सुनील भगत, कोतवाल गणेश महाडिक यांच्या प्रयत्नांतून व दिघी सागरी पोलीस ठाणे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तिन्ही एस.टी. बसेस 66 मजूर प्रवाशांना घेऊन कर्नाटक सीमेजवळ मार्गस्थ झाल्या असून सर्व प्रवासी मजूरांनी महाराष्ट्र शासनाचे, एस.टी. महामंडळाचे व जिल्हा प्रशासनाचे विशेष आभार मानले.

li