Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreaking

पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत असतानाच मान्सूनपूर्व पावसामुळे होणारे नुकसान तसेच पावसाळ्यात येणार्‍या नैसर्गिक आपत्ती, पूर आदींचा सामना करण्यासाठी आता प्रशासन सज्ज झाले आहे.

यासंदर्भात, सर्व यंत्रणांनी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी तसेच पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी त्यांना सोपविण्यात आलेली जबाबदारी  व्यवस्थित पार पाडण्यासाठी त्यासाठीचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. सर्व यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची माहिती घ्यावी, संपर्क अधिका-यांच्‍या नेमणुका करणे. संबधीत अधिकारी, संपर्क अधिकारी यांचे मोबाईल नंबर यादी अद्यावत करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.

येथील नगरनिवास कार्यालय येथून त्यांनी तालुकास्तरीय यंत्रणांशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण आदी विभागांचे अधीक्षक अभियंता, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, पशुसंवर्धन, जलसंधारण, शिक्षण विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी जि्ल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी मान्सूनपूर्व आणि अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान,  त्याबाबत घ्यावयाची खबरदारी, पावसाळा सुरु झाल्यानंतर प्रत्येक यंत्रणांनी त्यांना सोपविण्यात आलेली जबाबदारी कार्यक्षमतेने पार पाडण्याचे निर्देश दिले.  विशेषता पाटबंधारे विभागाने त्यांचे नियंत्रण कक्ष आणि संपर्क यंत्रणा कार्यान्वित करणे, महसूल विभागाने आपत्ती व्यवस्थापनासाठीचा गावनिहाय आराखडा तयार करुन कार्यान्वित करणे, आरोग्य विभागाने साथरोग नियंत्रणासाठी पथके कार्यान्वित करणे अशा स्वरुपाच्या सूचना विविध विभागांना देण्यात आल्या.

तालुकास्तरावरुन या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका पशुसंवर्धन अधिकारी यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी तसेच पूर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विविध विभागांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले असून, त्यानुसार काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या, कोणत्याही परिस्थितीत संबंधित विभागांना दिलेल्या जबाबदारीचे पालन करण्यात हलगर्जीपणा होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

विविध विभाग आणि त्यांना दिलेल्या कामांची जबाबदारी पुढीलप्रमाणे-

पाटबंधारे विभाग- पाटबंधारे विभागाचे नियंत्रण कक्ष व संपर्क यंत्रणा कार्यान्वित करणे. धरण सुरक्षा आराखडा तयार करणे व सादर करणे. पूररेषा निश्चितीच्‍या कार्यवाहीबाबत सर्व विभागांनी माहिती देणे. धरण परिसरात व धरणाच्‍या वरील भागातील अतिवृष्‍टीबाबत माहिती जिल्‍हा नियंत्रण कक्षास देणे. धरणांतून पाणी सोडण्‍यापूर्वी संबंधीत तहसीलदार व पोलिस यंत्रणा यांना माहिती देवून धरण क्षेत्रातील  लोकांना धोक्‍याची सूचना देण्‍याची व्‍यवस्‍था करणे. धरणांतून सोडण्‍यात येणा-या विसर्गाची माहिती दर दोन तासांनी जिल्‍हा नियंत्रण कक्षास कळविणे व केटी वेअरचे योग्‍य नियंत्रण करणे.

महसूल विभाग– गाव, तालुका व उपविभाग स्‍तरावरील पूर्वतयारी बैठका घेणे. आपत्‍ती व्‍यवस्‍थापन आराखडे तयार करणे व त्‍या अनुषंगाने सर्व विभागांना सतर्क करणे. नियंत्रण कक्ष 24X7 कार्यान्वित करणे व कर्मचा-यांच्‍या नेमणुका करणे. महसूल मंडळस्‍तरावर पर्जन्‍यमापक यंत्रे सुस्थितीत असल्‍याची खात्री करुन घेणे.आपत्‍ती व्‍यवस्‍थापनासाठी प्राप्‍त साधनसामग्री (बोट, लाईफ जॅकेट इत्‍यादी) सुस्थितीमध्‍ये असल्‍याची खात्री करुन घेणे. दैनंदिन पर्जन्‍याची आकडेवारी सकाळी 8-30 वाजेपर्यत जिल्‍हा नियंत्रण कक्षास कळविणे. लोकांना पूर्वसूचना देणेकामी संपर्क यंत्रणा तयार करणे. पूराची पूर्वसूचना मिळताच गाव पातळीवर तातडीने संदेश पोहचविणे व लोकांना सुरक्षितस्‍थळी  हलविण्‍याचे नियोजन करणे. तालुकास्‍तरावर शोध व बचाव पथक कार्यान्वित ठेवणे तसेच स्‍थानिक पट्टीचे पोहणारे नागरिकांचे संपर्कात राहणे त्‍यांना प्रशिक्षण देणे. संकटग्रस्‍त लोकांना सुरक्षित निवारास्‍थळी हलविणे व त्‍यांच्‍या अन्‍न पाण्‍याची सोय करणे. नैसर्गिक आपत्‍ती घटनांबाबत पंचनामा पथके स्‍थापन करणे व घटनांचा तात्‍काळ प्राथमिक अहवाल सादर करणे व रंगीत तालीम घेणे.

महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत – पूर्वतयारी बैठका घेणे.आपत्‍ती व्‍यवस्‍थापन आराखडा तयार करणे व अद्यावतीकरण करणे. नदी,नाले व गटारीची साफसफाई करणे व पाण्‍याचा निचरा त्‍वरीत होईल यादृष्‍टीने उपाययोजना करणे. नदी व नाल्‍यांवरील अतिक्रमणे हटविणे, धोकादायक  इमारतीचे सर्व्‍हेक्षण करणे व सुरक्षेच्‍या योग्‍य उपाययोजना करणे. आवश्‍यक तेथे स्‍थलांतराची व्‍यवस्‍था तात्‍काळ करणे. स्‍थलांतरासाठी आवश्‍यक ती वाहने उपलब्‍ध करुन देणे. नागरीकांच्‍या स्‍थलांतरासाठी तात्‍पुरत्‍या निवा-याची व्‍यवस्‍था करणे ( शाळा, मंगल कार्यालये इत्‍यादी) साथीचे रोग आटोक्‍यात आणण्‍यांच्‍या दृष्‍टीने प्रतिबंधात्‍मक औषधे, फवारणी या उपाययोजना करणे. नियंत्रण कक्ष 24X7 कार्यान्वित करणे व कर्मचा-यांच्‍या नेमणुका करणे.  साधनसामग्रीने सुससज्‍ज शोध व बचाव पथक कार्यरत ठेवणे.

आरोग्‍य विभाग– नियंत्रण कक्ष 24X7 कार्यान्वित करणे व साथीच्‍या रोगांच्‍या नियंत्रणासाठी पथके कार्यरत ठेवणे. नैसर्गिक आपत्‍तीच्‍या वेळी सर्व रुग्‍णालाय, प्राथमिक आरोग्‍य केंद्र  येथे व आपत्‍तीच्‍या ठिकाणी पुरेसे वैद्यकीय अधिकारी, औषधसाठा, सर्पदंशाच्‍या  लसी व अद्यायावत रुग्‍णवाहिका उलपब्‍ध ठेवणे.अकोले तालुक्‍यातील अतिदुर्गम भागाची विशेष दक्षता घेणे. साथीच्‍या रोगांचा प्रार्दूभाव होऊ नये  म्‍हणून प्रतिबंधक लसी व औषधी संबंधीतांना द्यावी. साथीचे रोगाचा अधिक पसार होऊ नये म्‍हणून आवश्‍यक त्‍या सूचना नगरपालिका व ग्रामपंचायतीमार्फत जनतेला देणे.जखमीवर तातडीने वैद्यकीय उपचार करणे, मृत व्‍यक्‍तीचे शवविच्‍छेदन करणे व  शवविच्‍छेदन अहवाल 24 तासांत सादर करणे.

पशुसंवर्धन विभाग- अतिदुर्गम भागातील (अकोले) पशुधनाची माहिती गोळा करणे जेणेकरुन आपत्‍तीनंतर  नुकसानीचा अंदाज बांधता येईल. अतिदूर्गम भागासाठी पथके कार्यान्वित करणे. साथीचे रोग पसरु नयेत यासाठी जनावरांचे लसीकरण करणे. पुरेसा औषधीसाठा व लसीची उपलब्‍धता करुन ठेवणे व बाधीत जनावरांचे पंचनामे करणे. मृत जनावरांचे शवविच्‍छेदन करणे व विल्‍हेवाट लावणे.

बांधकाम विभाग – जिल्हयातील  पाण्‍याखाली जाणारे रस्‍ते  तसेच जिल्‍हयातील पुलांचे सर्व्‍हेक्षण करणे. धोकादायक रस्‍ते व पूल वाहतुकीसाठी बंद करणे. नदीपत्रातील जुनाट पुलांचे अडथळे दूर करणे. पुलाखालील नळयांची साफसफाई करणे. अतिवृष्‍टी वा पुरामुळे रस्‍ते खचल्‍यास तातडीने दुरुस्‍ती करणे. पर्यायी रस्‍त्‍यांबाबत मार्गदर्शक फलक लावणे. धोकादायक सेल्‍फी ठिकाणांवर मार्गदर्शक फलक लावणे. रस्‍ते वाहतूक सुरळीत राहण्‍यासाठी साधनसामग्रीने सज्‍ज अशी पथके तैनात करणे. लघुपाटबंधारे  प्रकल्‍पांचे  सर्व्‍हेक्षण व दुरुस्‍ती करुन घेणे. प्रकल्‍पांचे सांडव्‍यावरुन पाणी वाहुन जाईल याबाबत दक्षता घेणे. पावसाळयात तलाव फुटण्‍याच्‍या घटना होतात त्‍या अनुषंगाने परिस्थितीचा अंदाज घेवून संभाव्‍य धोक्‍याबाबत परिसरातील  नागरिकांना सतर्क करणे व आपत्‍कालीन परिस्थितीचे अनुषंगाने अर्थमुव्‍हर्स व बुलडोझर इत्‍यादी तातडीने उपलबध करुन देणे.

शिक्षण विभाग – जिल्‍हयातील शाळा खोल्‍यांचे सर्व्‍हेक्षण करणे. निर्लेखन केलेल्‍या तसेच धोकादायक वर्ग खोल्‍यांमध्‍ये वर्ग भरविण्‍यात येवू नयेत. आपत्कालीन परिस्थिती दरम्‍यान तात्‍पुरते            निवा-यासाठी शाळांची उपलब्‍धता करुन देणे. शालेय विदयार्थ्‍यांना आपत्‍ती दरम्‍यान काय करावे व काय करु नये याबाबत मार्गदर्शन करावे.

महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी –  नियंत्रण कक्ष 24X7 कार्यान्वित करणे व दूरध्‍वनी  कार्यरत ठेवणे.  विद्युत सेवा पुर्ववत करण्‍यासाठी प्रशिक्षित कर्मचारी व साधनसामग्रीची उपलब्‍धता करुन ठेवणे. खंडीत वीज पुरवठा तातडीने सुरळीत करणे. जळालेले ट्रान्‍सफॉर्मर्स तातडीने नव्‍याने बसविणे. वीज खंडीत झाल्‍यावर कामाबाबत व तो कधी पूर्ववत होणार ही माहिती देणे. आपत्‍ती दरम्‍यान  विजेमुळे अपघात घडणार नाहीत यासाठी  वीजप्रवाह योग्‍य रितीने नियंत्रित करणे. विद्युत वाहिन्‍यांवर  पडलेली झाडे हटविणे,  पडलेले पोल तात्‍काळ पुन्‍हा लावणे. शासकीय  कार्यालये जसे जिल्‍हाधिकारी  कार्यालय, पोलिस विभाग्, रुग्‍णालये सर्व नियंत्रण कक्ष तसेच जिल्‍हास्‍तरीय व तालुकास्‍तरीय कार्यालयांचा विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेणे.

दूरसंचार विभाग – नियंत्रण कक्ष 24X7 कार्यान्वित करणे व कर्मचा-याच्‍या नेमणुका करणे. पावसाळी हंगामात दूरध्‍वनी जोडण्‍यांची तपासणी करुन पूर परिस्थिती  उदभवल्‍यास  दूरध्‍वनी सेवा विस्‍कळीत, नादुरुस्‍त होणार नाही याची खात्री करणे. पूरग्रस्‍त होण्‍याची शक्‍यता असलेल्‍या भागातील  दूरध्‍वनी केंद्र यंत्रणा कार्यान्वित राहील याची दक्षता घेणे. सेवा पुर्ववत करण्‍यासाठी प्रशिक्षीत कर्मचारी व साधनसामग्रीची उपलब्‍धता करुन ठेवणे. आपदग्रस्‍त भागात  मोबाईल  टॉवर सतत चालू  राहतील  याची खात्री करावी व त्‍यासाठी आवश्‍यक  जनरेटर्स  व इंधन याची आधीच व्‍यवस्‍था करावी. शासकीय  कार्यालये जसे जिल्‍हाधिकारी कार्यालय, पोलिस विभाग्, रुग्‍णालये सर्व नियंत्रण कक्ष तसेच जिल्‍हास्‍तरीय व तालुकास्‍तरीय कार्यालयांचे दूरध्‍वनी सुरळीत चालू असल्‍याची दर आठवडयाला खात्री करण्‍याची दक्षता घेणे व सेवा खंडीत न करणे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरण –  पाणीपुरवठयाच्‍या सर्व योजना सुरळीत असल्‍याची खात्री करणे.  पाणीपुरवठा योजना पुराच्‍या पाण्‍याने बाधीत वा खंडीत होणार नाही याची दक्षता घेणे. दुरुस्ती पथकाची नेमणुक करणे.आवश्‍यक उपकरणे जसे मोटार पंप पाईप यांचा साठा करणे व योग्‍य ठिकाणी ठेवणे. पाणीपुरवठयाचे उदभव दुषित होणार नाहीत याची खबरदारी घेणे. शुध्‍द पाणी पुरवठयाबाबत यंत्रणांशी योग्‍य समन्‍वय साधणे.

पोलिस विभाग –  शोध व बचाव कार्यासाठी साधनसामग्रीने सुसज्‍ज पथके कार्यान्वित करणे. पूरग्रस्‍त होण्‍याची शक्‍यता असणा-या ठिकाणी अगोदरच बिनतादी संदेश यंत्रणा कार्यान्वित करणे. पूरप्रवण भागातील  नदीकाठावरील व सखल भागातील नागरिकांचे स्‍थलांतर करणे. पूर येणा-या भागात बॅरीकेटस  लावणे जेणेकरुन वाहतूक बंद राहील. पुरामुळे वाहतूक बंद पडल्‍यास रस्‍ते व महामार्ग वाहतूकीसाठी त्‍वरीत मोकळे होतील या दृष्‍टीने पूर्व नियोजन करणे. ठिकठिकाणी पूर पाहणा-यांना प्रतिबंध करतील व मदत करणा-या  एजन्‍सीना  मार्ग मोकळा करुन देतील. अतिवृष्‍टीमुळे  पूरपरिस्थिती उदभवल्‍यास अडकलेल्‍या लोकांना तातडीने हलविण्‍याचे दृष्‍टीने नियोजन करणे. आपदग्रस्‍ताना सानुग्रह अनुदान व इतर साहित्‍य  वाटपाचे वेळी कायदा व सुव्‍यवस्‍था  राखणेचे नियोजन करणे व आपत्‍कालीन परिस्थितीत कायदा व सुव्‍यवस्‍था राखणे व वाहतुक व्‍यवस्‍था करणे.

अग्निशामक दल व होमगार्ड – शोध व बचाव कार्यासाठी पथके कार्यरत करणे. उपलब्‍ध  साधनसामग्री हाताळण्‍याचे प्रशिक्षण  कर्मचा-यांना देणे. संभाव्‍य आपदग्रस्‍त  ठिकाणे निवडून  आपत्‍तीवेळी  त्‍या ठिकाणी तातडीने  पोहचण्याचे नियोजन करणे. बाधीत क्षेत्रामध्ये अडकलेल्‍या लोकांची सुटका करणे व सर्व व्‍यक्‍तीचे सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर करणे. जखमी व्‍यक्‍तीना रुग्‍णालयामध्‍ये स्‍थलांतरीत करण्‍यास प्राधान्‍य दयावे. रस्‍त्‍यावर पडलेल्‍या झाडांमुळे निर्माण झालेला अडथळा दूर करुन वाहतुक सुरळीत करणे, तालुका प्रशासनाशी  समन्‍वय साधून पडझड झालेल्‍या  घरांमधून लोकांची सुटका करणे,   बाधीत क्षेत्रांमध्‍ये  घडणा-या घटना  तसेच नेमणुक करण्‍यात आलेलया कर्मचा-यांविषयी अग्निशमन नियंत्रण कक्षास माहिती देणे व अतिरिक्‍त मदतीबाबत कळविण्‍यात यावे.

राज्‍य परिवहन महामंडळ –संभाव्य पूरपरिस्थितीने बाधीत होणारे मार्गांचे सर्व्‍हेक्षण करणे व प्रवाशी सेवा चालू राहण्‍याच्‍या दृष्‍टीने नियोजन करणे. आपत्‍तीच्‍या ठिकाणी अडकलेल्‍या आपत्तीग्रस्‍तांना  सुरक्षितस्‍थळी पोहचविण्‍यासाठी तात्‍काळ गाडया उलपब्‍ध करुन देणे. पर्यायी मार्गाने वाहतुक सुरळीत होण्‍यासाठी प्रयत्‍न करणे व वाहने उपलब्‍ध करुन देणे. रस्‍त्‍यावरुन वा पुलावरुन पाणी वाहत असल्‍यास बसेस त्‍या पाण्‍यामध्‍ये उतरवू नयेत. सर्व चालक व वाहक यांना आपत्‍कालीन परिस्थितीच्‍या अनुषंगाने घ्‍यावयाची दक्षता व करावयाच्‍या उपाययोजना याबाबत प्रशिक्षण देणे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button