Maharashtra

कोरोनाच्या उपचारासाठी मुंबईत लाखभर खाटा उपलब्ध करण्याचा प्रयत्न

मुंबई, दि. १५: कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

त्यासाठी एक लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत असून बीकेसी, वरळी एनएससीआय येथे व्यवस्था पूर्ण झाली असून नजीकच्या काळात गोरेगाव, मुलुंड, दहीसर, वरळी दुग्ध वसाहत येथेही लवकरच अशा प्रकारे कोरोना केअर सेंटर्स उभारली जातील. सोमवारपासून बीकेसी येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करण्याचे काम सुरू होईल.

याच ठिकाणी एक हजार खाटांचे अतिदक्षता विभाग देखील सुरू केला जात असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. दरम्यान, मुंबईतील खासगी रुग्णालयातील ६० टक्के खाटा कोरोनाच्या रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे असे :

•   आज ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासमवेत बीकेसी येथील कोरोना केअर सेंटरची पाहणी केली. यावेळी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएचे अधिकारीदखील उपस्थित होते.

•  वरळी येथील एनएससीआय डोम मध्ये ६०० रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच्या लगत असलेल्या नेहरु प्लॅनेटोरियम येथेही सुमारे ५०० खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे.

•  गोरेगाव येथील सुविधा आठवडाभरात सुरू होईल. बीकेसी येथील कोरोना केअर सेंटर केवळ २० दिवसांमध्ये तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये १००८ खाटांची सुविधा असून तेथे नव्याने १००० खाटांचे अतिदक्षता विभाग देखील उभारले जात आहे.

•    मुंबईत कोरोना केअर सेंटरचे एक आणि दोन अशा प्रकारात वर्गीकरण करण्यात आले तेथे क्वारंटाईन आणि आयसोलेशनची व्यवस्था असेल. मुंबईत कोरोना केअर सेंटर २ मध्ये सुमारे एक लाख आयसोलेशन खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

•    जूनपर्यंत रुग्ण दुपटीचा वेग पाहता अधिक काळजी घेण्यात आहे. मात्र ज्या गणितीय शास्त्रानुसार मुंबईत रुग्ण वाढीचा अंदाज वर्तविण्यात आला होता, तेवढ्या रुग्णांची वाढ झालेली नाही. लॉकडाऊनचा चांगला परिणाम झाल्याचे दिसून येते.

•    मुंबईतील खासगी रुग्णालयातील सुमारे ७५ टक्के खाटा वापरात नाही आहेत. अपघात, बाळंतपण, डायलेसिस, पक्षाघात, हृदयविकार या आजारांच्या रुग्णांना प्राधान्य देत उर्वरित खाटांमधील ६० टक्के खाटा कोरोनाच्या रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात, त्यासाठी खासगी रुग्णालयांना राज्य शासन, महापालिकांमार्फत त्यांचे देयके दिले जातील.

अशा मागणीचा प्रस्ताव आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे सादर केला आहे. त्यावर येत्या एक दोन दिवसात निर्णय होऊ शकतो.

•   राज्यभरातील आरोग्य विभागातील १७ हजार ३३७ रिक्त पदे आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील ११ हजार पदे तसेच विविध महापालिकांमधील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यास मान्यता मिळाली आहे.

लॉकडाऊनच्या काळात ही पदे भरण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये आरोग्य व्यवस्था बळकटीकरणावर विशेष भर दिला जात आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button