Maharashtra

कोरोनाचे संकट दूर करणे ही सामूहिक जबाबदारी – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 15 : कोरोनाचे संकट दूर करणे ही सामूहिक जबाबदारी असून शासकीय यंत्रणांनी त्यासाठी कसून प्रयत्न करण्याचे आदेश उपमुख्‍यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

कोरोनाच्या संकटाचा सामना करतांना आर्थिक अडचणी किंवा मनुष्‍यबळाच्या अडचणी असतील तर त्याबाबत स्‍पष्‍टपणे सूचना करण्‍याचे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून उपमुख्‍यमंत्री पवार यांनी आज विधानभवनातील (कौन्सिल हॉल) झुंबर हॉलमध्‍ये बैठक घेतली.  बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ,

विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्‍कलिंगम,  जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड,

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल,

शांतनू गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,  ससूनचे अधिष्‍ठाता डॉ. मुरलीधर तांबे,

आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, मुख्‍य अभियंता एस.एस. साळुंके आदींसह  विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्‍हा प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्‍य विभाग, जिल्‍हा परिषद यांचा विस्तृत आढावा घेतला.

पुणे जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या-त्यांच्या  राज्यात परत पाठविण्‍यासाठी राज्यनिहाय समन्‍वय अधिकारी नेमण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी आवश्‍यक ते सर्व उपाय योजण्‍याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाअसून सार्वजनिक आरोग्‍य, वैद्यकीय शिक्षण आणि पोलीस विभागाला निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही ते  म्‍हणाले.

आगामी काळात मान्सूनचे आगमन होणार आहे. कोरोनाशी मुकाबला करताना मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या  कामाकडे दुर्लक्ष होता कामा नये, असेही उपमुख्‍यमंत्री पवार यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगर पालिका यांनी त्याबाबत आवश्‍यक ती दक्षता घ्यावी. खरीप हंगामाचा उल्‍लेख करुन उपमुख्‍यमंत्री पवार यांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते यांचा तुटवडा भासता कामा नये,

यासाठी आवश्‍यक ती खबरदारी घेण्‍याच्‍या सूचना केल्या. येत्या सोमवारपासून बाजार समित्या सुरु करण्यात  याव्‍यात, असेही त्यांनी सांगितले.

पुणे महापालिकेच्‍या तुलनेत पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोनावर नियंत्रण मिळवले असल्‍याने तेथे अटी-शर्तींच्या अधीन राहून उद्योग सुरु करण्‍यास परवानगी देण्यात आली आहे.

उद्योग किंवा औद्योगिक आस्थापनांच्या प्रमुखांना कामगार किंवा मजुरांची वाहतूक, त्यांची निवास व्यवस्था, मास्कचा वापर याबाबत आवश्‍यक ते निर्देश देण्याच्या  सूचनाही त्यांनी  केल्या.

विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विभागाची, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्याची माहिती दिली.

आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणे महापालिका आणि  आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्‍यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

जमाबंदी आयुक्‍त एस. चोक्‍कलिंगम यांनी ससून हॉस्पीटलमधील उपलब्‍ध मनुष्‍यबळ, साधनसामुग्री, डॉक्टर-परिचारिका यांच्या भरतीबाबत माहिती दिली.

पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई व जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल,

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे अधिष्‍ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनीही त्यांच्यावर सोपविण्‍यात आलेल्या  जबाबदारीबाबत तसेच करण्‍यात आलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button