Maharashtra

कोरोना विषाणू पासून जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न कौतुकास्पद

वर्धा : कोरोना विषाणू  महामारीने जगभर प्रसार केला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हा प्रशासन  काम करीत आहे. मात्र  वर्धा जिल्ह्याने राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजना या इतर जिल्ह्यासाठी सुद्धा मार्गदर्शक आहेत.

वर्धा जिल्हा प्रशासन आणि नागरिकांनी जिल्ह्याला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी असेच प्रयत्न करावेत, असे निर्देश नगर विकास, आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात  कोविड संदर्भात आढावा बैठक घेतली यावेळी श्री.तनपुरे बोलत होते. या बैठकीला  आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार,  मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे,

अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम मडावी,

जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले,  उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्याचा कोविड संदर्भात आढावा घेताना त्यांनी सध्या जिल्ह्यात कोरोनाचा एकही ॲक्टिव्ह रुग्ण नसल्याबाबत समाधान व्यक्त केले.

बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या जीवनावश्यक व इतर वस्तूंच्या वाहनासोबत येणाऱ्या व्यक्ती जिल्ह्यातील स्थानिकांसोबत मिसळणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्याने राबवलेले अनलोडिंग वाहनतळ  हे इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा मार्गदर्शक असल्याचे सांगितले.

शिवाय इतर जिल्हा व राज्यातून येणाऱ्या व्यक्तींसोबतच संपूर्ण घर विलगीकरण करण्याचा निर्णयही चांगला आहे. यामुळे कोरोनाला थांबविण्यास ९० टक्के  आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला.

खरीपाचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बियाणे आणि खतांची टंचाई होणार नाही याची काळजी घ्यावी.

शेतकऱ्यांचा कापूस तात्काळ विकला जाईल यासाठी व्यवस्थित नियोजनपूर्वक काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यात सामाजिक संस्थांनी चांगले सहकार्य केले आहे. जिल्हा प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या समन्वयाने हा जिल्हा अद्याप सुरक्षित आहे.

मात्र आता  आपल्या जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरू झाल्यामुळे यापुढे जास्त काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

जिल्ह्यातील ८ हजार ४०० मजूर, कामगार,  जिल्ह्यातील विविध ६१  निवरागृहात होते. येथील सामाजिक संस्था,  कंपन्या, कंत्राटदार यांच्यामुळे जिल्हा प्रशासनाला त्यांची काळजी घेणे सोपे झाले.

यापैकी सुमारे ४ हजार कामगारांना परत पाठविले आहे.

जिल्ह्यात घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत रेशन कार्ड नसणाऱ्या १० हजार ९० कुटुंबांपैकी ८ हजार १३२ कुटुंबांना रेशन कार्ड वितरित करण्यात आले आहेत.

उर्वरित रेशन कार्ड या महिनाअखेरीस वितरित करण्यात येतील.  याशिवाय  ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा गरजूंना तात्पुरते कार्ड वाटण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button