Maharashtra

कोविड केअर, हेल्थ सेंटर, स्वॅब तपासणी, अलगीकरण, मनुष्यबळ सुविधांचा पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतला आढावा

कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : जिल्ह्यातील सद्य:स्थिती, कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमधील मनुष्यबळ, साधनसामग्री, अलगीकरणाबाबत नियमावली आदींबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज आढावा बैठक घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल,

शासक वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी सी केम्पी-पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी

डॉ. योगेश साळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे आदी उपस्थिती होते.

संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह आल्यास त्यांना ग्रामसमितीकडे पाठवा. त्याचबरोबर अलगीकरणात असताना काय करावे, काय करु नये याबाबत नियम तयार करुन ते सर्व खोल्यांमध्ये प्रदर्शित करा.

स्वॅबचे नमुने पाठवताना त्यावर मार्करचा, कलर कोडींगचा वापर करा. लॅबमधील क्षमता वाढविण्याच्यादृष्टीने लागणारे मनुष्यबळ तसेच इतर साहित्य तातडीने पुरवा, असे निर्देश पालकमंत्री श्री.पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी श्री.देसाई म्हणाले, रेड आणि हाय रिस्कमधील स्वॅबच्या नमुन्यासोबत माहितीचा संगणकीय अर्ज हवा. त्याला प्राधान्य द्या. प्रत्येक नमुन्याचा 10-10 चा गट करुन मार्करने त्यावर नाव लिहा.

संस्थात्मकअलगीकरणातील व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह आल्यास त्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारुन ग्राम समितीकडे पत्रासोबत पाठवा. पडताळणी करुन त्याचा पुढील निर्णय ग्राम समिती घेईल.

कोव्हीड केअर सेंटर आणि लॅबसाठी आवश्यक असणारे डिप फ्रीजची खरेदी करावी. कोल्हापुरी वारियर्सवर नोंदणी झालेल्या सुविधा कोव्हीड केअर सेंटर स्तरावर उपलब्ध करुन द्या.

तपासणी नाक्यावर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नोंदणी झाल्याचा लघू संदेश संबंधिताच्या मोबाईलवर गेला पाहिजे. त्यात त्याच्या अहवालाबाबतही समावेश असावा.

तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यासाठी झीप लॉकच्या बॅगचा वापर करण्याविषयी श्री.मित्तल यांनी यावेळी सूचविले. सीएचसी, सीएच विद्यमान बेड क्षमता व पुढील योजना,

अस्तित्त्वात असलेल्या सुविधा, सर्व वैद्यकीय पुरवठा व विद्यमान स्टॉकची उपलब्धता, मनुष्यबळ नियोजन करणारे डॉक्टर, सुविधा, पॅरामेडिकल कर्मचारी, आयुष बाबतची स्थिती,  सर्वेक्षण, संपर्क ट्रेसिंग, कोविड कामात सहभागी कर्मचाऱ्यांना प्रतिबंधक औषधांचा पुरवठा, कोविड  सुविधा व्यवस्थापन सॉफ्टवेअरची अंमलबजावणी याविषयीही चर्चा झाली.

जिल्हाधिकाऱ्यांचाही व्ही सी द्वारे आढावा

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही आज तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधून आढावा घेतला.

संस्थात्मक अलगीकरण, कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटर, स्वॅब कलेक्शनबाबतचे धोरण, त्याचबरोबर असणारी क्षमता आणि वापरली गेलेली क्षमता याबाबत तालुकानिहाय आढावा त्यांनी घेवून त्यांनी सूचना केल्या.

* संस्थात्मक अलगीकरणाच्या ठिकाणी मनुष्यबळ आणि पाण्यासह सुविधा हव्यात

* मुख्याध्यापकांना इन्चार्ज करुन शाळानिहाय शिक्षकांची संस्थात्मक अलगीकरणासाठी नेमणूक करा

* बाहेरुन चोरुन येणाऱ्यांवर विशेषतः कर्नाटक सीमा भागात लक्ष ठेवा.

* तहसीलदार, बीडीओ यांनी गावांना भेटी द्या.

* ग्रामस्तरीय समित्यांना अधिक कृतीशील बनवा

* गावांमधील प्रवेशांवर नियंत्रण ठेवा

* सर्व ग्राम आणि प्रभाग समित्यांनी येणाऱ्या या सर्व लोकांवर कडक नजर ठेवावी

* दारावर रेड स्टिकर लावावेत.

* क्वारंटाईन लोक घरात किंवा एकल स्वरुपात संस्थात्मक अलगीकरणात एकटे राहू शकतात.

* ग्रामस्थांनी अन्न, औषधे आणि आवश्यक वस्तू वगळता अलग ठेवलेल्या लोकांशी वस्तूंची देवाणघेवाण करू नये.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button