कोरोना संकटातील मदतीचे संगमनेर मॉडेल दिशादर्शक – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिर्डी,दि.17 : कोरोना हे मानव जातीवरील संकट आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रभावीपणे काम करत असून या संपूर्ण लॉकडाऊन काळामध्ये संगमनेरकरांनी दाखवलेली माणुसकी ही कौतुकास्पद असून परप्रांतीय मजूर,

रोजंदारी करणारे कामगार यांच्यासाठी विविध संघटनांनी सुमारे 3 हजार 500 डबे देण्याच्या उपक्रमासह लॉकडाऊन काळात सातत्यपूर्ण केलेले मदतकार्य हे राज्यासाठी मॉडेल ठरणारे असल्याचे गौरवौद्गार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

संगमनेर येथील नवीनभाई शहा मंगल कार्यालयात जय हिंद युवा मंच, राजवर्धन फाउंडेशन आणि विविध संघटनांच्या वतीने मागील तीस दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नछत्र उपक्रमास श्री. थोरात यांनी भेट दिली. यावेळी आ.डॉ. सुधीर तांबे आदी उपस्थित होते.

लॉकडाऊन काळामध्ये संगमनेर शहरात श्री. थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे व सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन महिन्यांपासून विविध सेवाभावी संघटनांच्या वतीने शहरातील गरजू व अत्यंत गरीब नागरिकांसह परप्रांतीय मजुरांना जेवणाची पाकीटे घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या उपक्रमांतर्गत दररोज सुमारे 3 हजार 500 जेवणाचे डबे गरिबांना घरपोच केले जात आहे. याबरोबरच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या सेवाभावी उपक्रमाचे महसूलमंत्री नामदार थोरात यांनी कौतुक केले.

याप्रसंगी नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले, लॉकडाऊन काळामध्ये संगमनेरवासियांनी परप्रांतीय मजूर व गोरगरिबांना केलेली मदत ही इतरांसाठी दिशादर्शक आहे. संकटाच्या काळामध्ये संगमनेरकरांनी नेहमी एकजूट दाखविली असून संकटाचा मुकाबला केला आहे.

या कठीण परिस्थितीमध्ये संगमनेर तालुक्यातून व शहरातून माणुसकी दिसून आली आहे. परप्रांतीय नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था, औषधोपचाराची व्यवस्था, आंघोळीची व्यवस्था याचबरोबर त्यांना त्यांच्या गावी पोहोच करण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

विविध सेवाभावी संस्थांच्यावतीने दररोज सुमारे 3 हजार 500 पाकिटांचे वाटप करण्यात येत आहे. हे अत्यंत कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे विविध सेवकांनी या मदत कार्यात पुढाकार घेत घरपोच भाजीपाला व अन्नछत्र पुरविण्याचे कार्यही केले आहे. हीच माणुसकी कायम जपत आपल्याला यापुढे कोरोनाचा मुकाबला करायचा आहे.

या काळात नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर तसेच सॅनिटाझरचा वापर करावा. याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहनही श्री. थोरात यांनी केले.

आमदार डॉ.तांबे म्हणाले, संगमनेर शहर हॉटस्पॉट आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य हॉटस्पॉट उपाययोजना लागू केली आहे.

आगामी काळामध्ये नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे सर्वांसाठी गरजेचे आहे. पावसाळ्यााच्या सुरुवातीला काही साथींचे आजार येऊ शकतील यामध्ये घाबरून न जाता सर्वांनी गरजेनुसार वैद्यकीय सल्ला घ्यावा. या संकटात काम केलेल्या कोरोना वॉरियर्सचे अभिनंदन त्यांनी केले.

Leave a Comment