सर्व समन्वयाने नाशिक जिल्ह्याची स्थिती नियंत्रणात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नाशिक, दि. 18 : गेल्या दहा-पंधरा दिवसातील चांगल्या प्रयत्नांमुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोना स्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याचे दिसत आहे.

कोरोना विरोधातील लढाई ही दीर्घकाळ चालणारी आहे, येणाऱ्या काळात कोरोना रुग्ण दाखल होतील त्यासोबतच ते कोरोनामुक्त होत राहतील, ही निरंतर चालणारी प्रक्रिया असेल.

त्यामुळे कोराना विरोधातील लढा त्यासोबतच सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन व्यवहार व अर्थकारण सुरु ठेवण्यासाठी व कमीत कमी बंधनात जनजीवन सुरळीत राहील यासाठी आता प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या आहेत.

आज जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्य:स्थितीबाबत झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री.भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वासराव नांगरे पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे,

ग्रामीण जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य उपसंचालक डॉ.एम.आर.पट्टणशेट्टी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे,

अपर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपील आहेर,

नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाचे नोडल अधिकारी डॉ.आवेश पलोड, मालेगाव येथील नोडल अधिकारी डॉ.हितेश महाले आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, संपूर्ण जग बंद, देश बंद, राज्य बंद आणि जिल्हा बंद अशा सारख्या उपाययोजनांमधून कोरोना सारख्या साथरोगाच्या आजाराशी लढतांना प्रथमच अशा प्रकारच्या समस्येचा अनुभव आला.

त्यामुळे त्यातील अडचणी समजल्या. या अडचणींवर मात करत असतांना लोकांच्या मनातील भय कमी झाले. सजगता निर्माण झाली. शासन प्रशासकीय पातळीवरही शिकत गेलो, निर्णय घेत गेलो सर्व काही नवीन होते.

या साथरोगाशी लढतांना उपाययोजनांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर निश्चितता व अनिश्चिततेचा सामना संपूर्ण जग करते आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्ह्यात कालपर्यंत हाताबाहेर जाणारी मालेगांवची स्थिती आज पूर्णत: आटोक्यात आहे.

रुग्ण बरे होत आहेत व त्याचबरोबर नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झालेले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागाची परिस्थितीही नियंत्रणात आहे.

नाशिक शहरात शहरातील कोरोना बाधितांची संख्या नगण्य असून लवकरच आपण सर्व या समस्येतून बाहेर पडू अशा आशा प्रकारची अपेक्षाही यावेळी पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी व्यक्त केली.

प्रत्येक आजारात रुग्ण कमी होणे व जास्त होणे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. तिच प्रक्रिया या आजारालाही लागू आहे. त्यामुळे भविष्यात कुठल्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तरी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा त्यासाठी सज्ज आहे.

जिल्ह्यातील कोरोना साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी सर्व यंत्रणा अत्यंत सकारात्मक भावनेतून काम करत आहेत. त्याचे दृश्य परिणाम सर्वच पातळीवर दिसू लागले आहेत.

डॉक्टरांच्या संख्येत वाढ झाली आहे. नेमून दिलेले उपचार  विलगिकरण केंद्रात पूर्ण केल्यानंतर, आजाराची कोणतीही लक्षणे नसलेल्या व वास्तविकरित्या बऱ्या झालेल्या रुग्णाला विनाकारण विलगीकरण केंद्रात राहण्याची आता आवश्यकता राहिलेली नाही.

नवीन डिस्चार्ज धोरणामुळे अशा व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. नव्याने डिस्चार्ज पॉलिसीमुळे घरी गेलेल्या रुग्णाच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार झाल्याचे एकही उदाहरण जिल्ह्यात नाही.

त्यामुळे वेगाने होणारा प्रसार मंदावला आहे, असे स्पष्टपणे दिसत असल्याचे यावेळी बोलतांना श्री भुजबळ यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अत्यंत मेहनत घेऊन आजार नियंत्रणात ठेवण्यात यश मिळविले असून भविष्यातही सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे प्रशासन कोरोनाशी यशस्वीपणे लढा देत राहील, असेही यावेळी श्री.भुजबळ यांनी सांगितले.

बंद काळातील कामगारांचे वेतन अदा करण्यात यावे

लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा देणाऱ्या कंपन्या व आस्थापना वगळता सर्व कंपन्या व आस्थापना बंद होत्या.

या कालावधीत बंद असलेल्या कंपन्यांकडून कामगार व मजूर वर्गाला पगार दिला जात नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत, अशा तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कामगार उपायुक्तांना सूचना देण्यात याव्यात.

तसेच कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्या समन्वयातून वेतन व पगार देण्याबाबत निर्णय घेण्यात यावा, याबाबतच्या विशेष सूचना या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनास दिल्या आहेत.

मालेगावच्या पावरलूम बाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची शिफारस करणार

मालेगावातील पावरलूम बंद असल्यामुळे तेथील अर्थकारणावर व सर्व सामान्यांच्या जनजीवनावर मोठा परिणाम होत असून जिल्हाधिकारी,

जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या माध्यमातून पावरलूम चालक-मालक यांचेशी चर्चा सुरु असून वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून पावरलूम कामगांराच्या समस्यांवर खावटी योजना अथवा सवलतीची योजना देण्याबाबतची शिफारस करणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, माहापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी विविध मुद्यांवर माहिती बैठकीत सादर केली.

Leave a Comment