शहीद धनाजी होनमाने यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पंढरपूर, दि.18 : गडचिरोली जिल्ह्यामधील भामरागड तालुक्यातील पोरयकोटी- कोरपर्शी  जंगलात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने शहीद झाले.

त्यांच्यावर आज मूळ गावी पुळूज येथे शासकीय इतमामात आणि भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुळूज ग्रामस्थांनी व उपस्थितांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला.

कोरोना विषाणूमुळे सामाजिक अंतराचे पालन करीत गावकरी अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते. आज दुपारी 12:30 वाजता शहीद पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आले.

त्यांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर पार्थिव अंत्यसंस्कार स्थळी आणण्यात आले. यावेळी  शहीद धनाजी होनमाने  यांचे मोठे बंधू विकास होनमाने यांनी अग्नी  दिला.

यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, आमदार यशवंत माने आदींनी शहीद धनाजी होनमाने यांच्या कुटुबियांची भेट घेवून सांत्वन केले.

शासनाच्या वतीने शहीद धनाजी होनमाने यांना श्रद्धांजली वाहिली. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद होनमाने यांनी दाखविलेले शौर्य महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.

त्यांच्या बलिदानाची जाणिव प्रत्येकामध्ये राहील, अशा शब्दांत पालकमंत्री भरणे यांनी  श्रद्धांजली वाहिली.  तसेच शासनाकडून सर्वप्रकारची मदत कुटूंबियास केली जाईल, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

कोल्हापूर परिक्षेत्राचे  विशेष  पोलीस महानिरीक्षक सुहास वारके जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,

प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, पोलीस निरीक्षक किरण अवचर, अरुण पवार, श्री.भस्मे  यांनी पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.

पोलीस दलांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक सुहास वारके यांनी शासनाच्या आणि पोलीस दलांच्या वतीने शोकसंदेश वाचून दाखवला.

Leave a Comment