परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कामे करा – पालकमंत्री

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अमरावती, दि. 20 : क्वारंटाईन सेंटरमध्ये संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या नागरिकांना परिपूर्ण सुविधा मिळाव्यात.

क्वारंटाईन सेंटरमध्ये पुरेशी स्वच्छता, आवश्यक साधने उपलब्ध असली पाहिजेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कामे करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज जेल रोडवरील क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. या ठिकाणी आजमितीला 49 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह क्वारंटाईन सेंटरचे अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, सद्यस्थितीत आपण सर्वजण विविध अडचणींचा मुकाबला करत आहोत. मात्र, या काळात अधिक काटेकोरपणे काम करण्याची गरज आहे.

त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काम करावे. संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेल्या नागरिकांना पुरेशा सुविधा मिळाल्या पाहिजेत. जेवणाचा दर्जा उत्कृष्ट असावा.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही. काहीही हयगय झाल्यास कठोर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी विविध उपायांची अंमलबजावणी शासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे दक्षतेचे काटेकोर पालन आवश्यक आहे.

स्वच्छतागृहाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पाणी, हँडवॉश, सॅनिटायझरची व्यवस्था असावी, आरोग्यरक्षणासाठी आवश्यक त्या सर्व साधनांची उपलब्धता क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवावी, त्याचप्रमाणे, नागरिकांच्या तक्रारींचे वेळीच निराकरण करावे. याबाबत यापुढे कुठलीही तक्रार येता कामा नये, असेही निर्देश त्यांनी दिले.

परिसरात कुठेही अस्वच्छता पुन्हा दिसता कामा नये. सोशल डिस्टन्सिंग पाळले गेलेच पाहिजे. सकारात्मकतेने कामे करावीत.

नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती दक्षता घ्यावी. सर्वांनी मिळून योग्य दक्षता घेऊन संकटाचा मुकाबला करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

यावेळी पालकमंत्र्यांनी क्वारंटाईन सेंटरमधील भोजन कक्ष, स्वच्छतागृहे, निवास व्यवस्था आदींची पाहणी केली.

Leave a Comment