लॉकडाऊनच्या नव्या नियमांनुसार प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात – पालकमंत्री

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 नागपूर, दि. 20 : कोरोना प्रादुर्भावाचा धोका अद्याप टळलेला नसून बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्रशासनातर्फे कोरोनाबाधित रुग्णांसाठी तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींसाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या नवीन नियमांनुसार प्रशासकीय यंत्रणांनी पूर्वीप्रमाणेच परस्पर समन्वय ठेवून कार्य करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नागपूर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची आढावा बैठक घेण्यात आली.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांची यावेळी उपस्थिती होती.

नागपूरमधील सततच्या वाढत्या कोरोनाबाधितांच्या प्रादुर्भावानुसार प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये नियमावलीचे कठोरपणे पालन करण्यात यावे. स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने आढावा व समन्वय बैठका घेऊन पुढील कार्यवाही करावी.

शहरातील प्रतिबंधित क्षेत्र सोडून शासनाने घालून दिलेले नॉर्म्स पाळून इतर भागातील दैनंदिन व्यवहाराबाबतचा यावेळी आढावा घेण्यात आला. घराबाहेर पडताना मास्क वापरणे अनिवार्य आहे.

हात धुणे वा सतत सॅनिटाईज करणे, तसेच शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरपणे पालन करणे आवश्यक राहणार आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारांवर कठोर कार्यवाही करण्याच्या सूचनाही पालकमंत्री डॉ. राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, शहर बस सेवा, स्थानिक वाहतूक व्यवस्था, शाळा, महाविद्यालये, जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये सुरु असलेले उद्योगधंदे याबाबतही यावेळी पालकमंत्र्यांनी आढावा घेतला.

परप्रांतीय मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. तसेच स्थलांतर अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतींमधील उद्योग, कारखाने सुरु करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे.

त्यासाठी स्थानिक तरुणांना सध्या चांगली संधी असून, त्यांना अल्प कालावधीत प्रशिक्षण द्यावे. त्यामुळे उद्योगांना लागणारे मनुष्यबळही अल्पावधीत मिळेल आणि स्थानिकांना रोजगारही मिळेल. त्यामुळे स्थानिकांना  रोजगारात प्राधान्य देण्याच्या सूचनाही डॉ. राऊत यांनी दिल्या.

शेतकरी खरीप हंगामापूर्वीच्या शेतीची मशागत करण्याच्या कामात गुंतला असून, कृषी सेवा केंद्रांमधून खते, बी-बियाणे, कीटकनाशके व आवश्यक साधनसामुग्री खरेदीसाठी सुरुवात होईल. त्यासाठी शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागू नये. तसेच बांधकाम क्षेत्राशी निगडीत आवश्यक साधनसामुग्री खरेदी-विक्रीबाबतही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

Leave a Comment