Maharashtra

कणकवली शहरातील उड्डाणपूल येत्या १५ ऑक्टोबर पर्यंत सुरु करा – पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

सिंधुदुर्ग – राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मधील कणकवली ते झाराप या टप्प्यातील बहुतांशी कामे पूर्ण झाली असून त्याअंतर्गत असणारा कणकवली शहरातील उड्डाणपूल येत्या १५ ऑक्टोबर पर्यंत सुरु करा, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

महामार्ग कामांची आढावा बैठक आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार वैभव नाईक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सतीश सावंत,

कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी रमेश पवार, बांधकाम विभागाचे उपअभियंता बी.एस.पोवार, उपअधीक्षक भूमी अभिलेख प्रकाश भिसे, दिलीप बिल्डकॉन चे प्रकल्प अधिकारी के.के. गौतम, संजय पडते, संदेश पारकर उपस्थित होते.

पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, कणकवलीतील उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास आले असल्याने या पुलावरील स्ट्रिट लाईट तातडीने सुरु कराव्यात तसेच महामार्गालगतचे सर्व्हिस रोड तातडीने सुरु करावेत.

या सर्व्हिस रोड साठी ज्या ठिकाणी जमीन संपादन करणे बाकी आहे. त्याठिकाणी भूमी अभिलेख खात्याने तातडीने मोजणी करावी व जमीन अधिग्रहित करावी.

या मोजणीसाठी नॅशनल हायवे ॲथोरिटीने ३० हजार रुपये प्रशासनाकडे जमा केले असल्याने याबाबतची कार्यवाही तातडीने व्हावी असे सांगून पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले, शहरी भागामध्ये ४५ मीटर व ग्रामीण भागात ६० मीटर रस्त्याची हद्द निश्चित करण्यात यावी.

महामार्गालगतच्या ज्या इमारती अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यांचा मोबदला त्यांना मिळाला आहे. ज्या इमारती अर्धवट पाडण्यात आल्या आहेत त्या ताब्यात घेऊन तातडीने पाडण्यात याव्यात.

महामार्गावर पंचायत समिती लगत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला कोणतीही इजा होऊ नये यासाठी संरक्षक कठडे बांधावेत व बॅरेकेटींग करण्यात यावे असे सांगून पालकमंत्री उदय सामंत यांनी महामार्गालगत कणकवली ते झाराप या दरम्यान दिलीप बिल्डकॉमने एस.टी बस थांबे तातडीने उभे करावेत.

त्याचबरोबर पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे महामार्गालगतची गटारांची काम दर्जेदार करावीत, पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होईल याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे.

कणकवली उड्डाण पुलाच्या ठिकाणी योग्य सर्व्हे करुन दिलीप बिल्डकॉनने आपल्या राखीव निधीमधून शौचालय उभारावे. या सर्व कामाकडे बांधकाम विभागाने लक्ष घालून संबंधित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button