Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

संगमनेर शहरातील काही भाग कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन जाहीर

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- संगमनेर शहरातील काही भाग कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन जाहीर करण्यात आला असून घोषित केलेल्‍या कन्टेन्मेंट झोन क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तु विक्री सेवा इ. व बफर झोन क्षेत्रातील अत्‍यावश्‍यक सेवा वगळता सर्व आस्‍थापना, दुकाने, वस्‍तु विक्री सेवा इ. दिनांक २४ मेपासून दिनांक ०१ जून, २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.

या क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्‍थान तसेच सदर क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करण्‍यात येणार आहे. संगमनेर शहरातील रहीमतनगर, उम्‍मतनगर, डोंगरे मळा, पठारे वस्‍ती हा भाग कन्टेन्मेंट झोन, भारत नगर, जुना जोर्वे रोड, अलकानगर, कोल्‍हेवाडी रस्‍ता, वाबळे वस्‍ती हा भाग बफर झोन घोषित करण्यात आला आहे.

यासाठी नविन जोर्वे नाका हा प्रवेशासाठीचा मार्ग असणार आहे. याशिवाय, शहरातील ईस्‍लामपूरा, कुरण रोड, विजय नगर, अपना नगर, गुंजाळ आखाडा हा भागही कन्टेन्मेंट झोन तर बिलाल नगर आणि पुनर्वसन कॉलनी हा भाग बफर झोन घोषीत करण्यात आला आहे. या भागासाटी अलका फ्रुट कॉर्नर, कोल्‍हार-घोटी हायवे हा प्रवेशासाठीचा मार्ग असेल.

राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्‍हीड १९) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथ रोग अधिनियम १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २,३,४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याअन्‍वये जिल्‍हाधिकारी हे त्‍यांचे कार्यक्षेत्रात कोव्‍हीड-१९ वर नियंत्रण आणण्‍यासाठी व त्‍यांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे, त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणून घोषीत करण्‍यात आलेले आहेत.

त्यानुसार, हे आदेश जारी करण्यात आले आहेत. संगमनेर शहरातील हॉटस्पॉटची मुदत दिनांक २३ मे, २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आहे. संगमनेर शहरातील रहीमतनगर व ईस्‍लामपूरा भागातील दोन व्‍यक्‍तींना कोरोना विषाणूची लागण झालेली असल्‍याचा अहवाल प्राप्‍त झालेला आहे. या क्षेत्रातून कोरोनाचा मोठया प्रमाणात संसर्ग होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे संगमनेर शहरातील रहीमतनगर, उम्‍मतनगर, डोंगरे मळा, पठारे वस्‍ती तसेच ईस्‍लामपूरा, कुरण रोड, विजय नगर, अपना नगर, गुंजाळ आखाडा हे क्षेत्र कन्टेन्मेंट झोन व भारत नगर, जुना जोर्व रोड, अलकानगर, कोल्‍हेवाडी रस्‍ता, वाबळे वस्‍ती, बिलाल नगर, पुनर्वसन कॉलनी हे क्षेत्र बफर झोन म्‍हणून घोषित करण्यात आले आहे.

दिनांक २४ मे ते दिनांक ०१ जून २०२० या कालावधीत कन्टेन्मेंट झोन व बफर झोन मध्‍ये प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्‍यासाठी स्‍थानिक प्रशासनाने खालील प्रमाणे कार्यवाही करावी. सार्वजनिक ध्वनीक्षेपकाद्वारे आदेश उद्घोषित करण्‍यात यावा.

कंट्रोल रुम स्‍थापन करुन २४x७ कार्यरत ठेवावी. सदर ठिकाणी ३ ते ४ अधिकारी / कर्मचारी यांची नेमणूक करण्‍यात येवून प्रत्‍येक शिफ्टमध्‍ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक प्रसिध्‍द करण्‍यात यावेत. संगमनेर शहरातील उपरोक्‍त कन्टेन्मेंट झोन व बफर झोन या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, संगमनेर हे सनियंत्रण अधिकारी म्‍हणून कामकाज पाहतील. सदर क्षेत्रामध्‍ये सेवा देणा-या सर्व शासकीय कर्मचारी यांना सनियंत्रण अधिकारी यांनी ओळखपत्र द्यावेत.

प्रवेशाच्या ठिकाणी तातडीच्‍या वैद्यकीय सेवा व जीवनावश्‍यक वस्‍तुंची वाहतुक व वितरण व्‍यवस्‍थेशिवाय इतरांना प्रतिबंध करण्‍यात यावा. प्रवेशाच्या ठिकाणी ये-जा करणा-या व्‍यक्‍तींची थर्मल स्‍कॅनरद्वारे स्क्रिनिंग करण्‍यात यावी. कंट्रोल रुम मध्‍ये रजिस्‍टर ठेवून त्‍यामध्‍ये नोंदी घेण्‍यात याव्‍यात व नागरीकांना आवश्‍यक त्‍या जीवनावश्‍यक वस्‍तु सशुल्‍क पु‍रविण्‍यात याव्‍यात. तसेच प्राप्‍त होणा-या सर्व तक्रारींचे निरसन करण्‍यात यावे.

सदर क्षेत्रातील रहिवाशी यांना आवश्‍यक असणा-या बाबी जसे दुध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्‍यादी बाबी योग्‍य ते शुल्‍क आकारुन शासकीय यंत्रणेमार्फत पुरविण्‍यात याव्‍यात. त्‍याकामी जीवनावश्‍यक वस्‍तुंचे व्‍हेंडर निश्चित करुन, पथके तयार करुन खरेदी व विक्री, वाहतुक इत्‍यादी बाबींचे सुक्ष्‍म नियोजन करावे. या क्षेत्रातील सर्व बँकांनी बँकींग सुविधा बॅंक प्रतिनिधी मार्फत उपलब्‍ध करुन द्याव्‍यात. पोलीस विभागाने सर्व पर्यायी रस्‍ते बंद करुन प्रवेशाची ठिकाणे सरकत्या बॅरिकेडस द्वारे खुले ठेवावेत.

प्रतिबंधीत भागामध्‍ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक असल्‍याचे निदर्शनास आल्‍याने येथील नागरीकांच्‍या हालचालींवर निर्बंध आणणे आवश्‍यक ठरले आहे. त्‍यामुळे सदर भागातील नागरिकांना विविध कारणांसाठी शासकीय आस्‍थापनांकडून देण्‍यात आलेल्‍या वाहन वापर व वाहतुकीची सवलत रद्द करण्‍यात येत आहे.

या क्षेत्रातील इतरत्र कर्तव्‍यार्थ असलेल्‍या व्‍यक्‍तींना प्रतिबंधीत क्षेत्रातून कर्तव्‍याच्‍या ठिकाणी जाणे आवश्‍यक असल्‍यास, अश्‍या व्‍यक्‍तींची त्‍यांच्‍या कर्तव्‍याच्‍या ठिकाणी वास्‍तव्‍याची सुविधा संबंधीत आस्‍थापनांनी उपलब्‍ध करुन दयावी. जेणेकरुन कोरोना संक्रमणशील क्षेत्रातील त्‍यांच्‍या हालचालींवर निर्बध घालणे शक्‍य होईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

कोणतीही व्‍यक्‍ती/संस्‍था/संघटना यांनी उक्‍त आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे नमूद करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button