Maharashtra

लॉकडाऊनमध्ये अडकलेले ४१ हजार ६९८ मजूर रेल्वेने स्वगृही रवाना

अलिबाग, जि.रायगड,दि.२२ (जिमाका) : लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, ओरिसा व राजस्थान या राज्यातील तब्बल ४१ हजार ६९८ मजूर/व्यक्तींना विशेष रेल्वेने त्यांच्या स्वगृही सुखरुपपणे पाठविण्यात आले.

आतापर्यंत उत्तरप्रदेशकरिता १०, मध्यप्रदेशकरिता ५, झारखंडकरिता-५, बिहारकरिता-५, ओरिसाकरिता व राजस्थानकरिता-१ रेल्वे सोडण्यातआल्या आहेत.

स्वत:च्या राज्यात, स्वत:च्या गावाकडे, स्वत:च्या घरी जायला मिळत असल्याने या सर्वांनी भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाला भरभरुन धन्यवाद दिले.

ही सर्व प्रक्रिया पालकमंत्री कु.आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, पंकज दहाणे, कोकण विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (महसूल), सिद्धराम सालीमठ, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, उपजिल्हाधिकारी मनोज गोहाड,

उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, तहसिलदार विशाल दौंडकर, अमित सानप यांच्या एकत्रित नियोजनाने सुरळीत पार पडली.

कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण भारतभर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विविध राज्यातील काही मजूर विविध जिल्ह्यात अडकले होते.

तसे मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि ओरिसा येथील मजूर/व्यक्ती रायगड जिल्ह्यातही अडकले होते. शासन आणि जिल्हा प्रशासन या मजूरांची व्यवस्थित काळजीही घेत होते.

लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर मात्र या नागरिकांकडून त्यांच्या स्वगृही जाण्याची मागणी जोर धरु लागल्याने रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शासनस्तरावर प्रयत्न केले.

पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी  रेल्वेने जाणाऱ्या सर्व प्रवाशांना  सुखरुप आपल्या गावाकडे जात असल्याबद्दल आणि कुटुंबाशी भेटण्याचा आनंद मिळणार असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

जिल्ह्यात अडकलेल्या सर्वांची जेवण व राहण्याची देखील चांगली व्यवस्था करण्यात आली होती. त्यांना आपल्या गावी जाता यावे, यासाठी शासनाने व प्रशासनाने देखील संबंधित राज्यांशी उत्तम समन्वय साधला.

बाहेरच्या राज्यातील व्यक्तींना सुखरूप जाता यावे आणि आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित गावी येता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाचे सातत्याने प्रयत्न सुरूच आहेत.

रेल्वेत बसण्यापूर्वी या सर्व मजूर/व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यांना स्वगृही जाण्यासाठी  त्यांचे आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे.

या सर्वांना नवी मुंबई, रायगड जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून पनवेल रेल्वे स्टेशन येथे बसने आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती.  शिवाय रेल्वेने जाणाऱ्या या सर्वांच्या सोबत जेवणाचे पार्सल, मास्क, साबण, सॅनिटायझरही देण्यात आले होते.

रेल्वे विभागानेदेखील रेल्वेगाडी सॅनिटाईज करणे व रेल्वे स्थानकावर निर्जंतूकीकरण फवारणीची उत्तम व्यवस्था केली होती. गावी जायला मिळत असल्याने या सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान होते,

ओढ होती. शेवटी रेल्वे निघतानाही या प्रवाशांनी महाराष्ट्र शासनाचे, प्रशासनाचे, रेल्वे स्टेशनवर उपस्थित प्रत्येकाचे  टाळ्या वाजवून मन:पर्वूक आभार मानले.

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close