Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

पालकमंत्र्यांच्या हस्ते आत्मभान अभियान लोगोचे अनावरण

चंद्रपूर, दि. 23 : कोरोनाविषयी सर्वांना माहिती व्हावी व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आत्मभान अभियान राबविले आहे.

या अभियानाचे लोगो अनावरण 21 मे रोजी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर, चंद्रपूर क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार वाढू नये. यासाठी जिल्हा प्रशासन महत्त्वपूर्ण उपाययोजना राबवित आहे. नागरिकांना कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती व्हावी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कोरोना विषयक जनजागृती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.ही जनजागृती मोहीम आता आत्मभान अभियान याअंतर्गत होणार आहे.

असे आहे आत्मभान अभियान :

सोशल मीडिया, पोस्टर, चित्रफिती, ऑनलाईन स्पर्धा, ऑडिओ, गीत, नागरिकांचे कोरोना विषयक सर्वेक्षण इत्यादी अनेक मार्गातून आत्मभान अभियान नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे.

लॉकडाऊन  पाळणाऱ्या  नागरिकांना पुढील काळामध्ये कोरोना संदर्भात जागृत करणे व प्रत्येक घरामध्ये यासंदर्भात माहिती पोहोचविणे आवश्यक आहे.

याचा प्रमुख उद्देश म्हणजे नागरिकांना सोप्या भाषेत कोरोना संदर्भात जनजागृती व्हावी. आत्मभान अभियान मध्ये स्वयंप्रेरणेने विनामूल्य योगदान देणारे कलाकार तसेच काही क्षेत्रातील नामवंतसुद्धा यामध्ये भाग घेणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती तसेच प्रशासनातील अनेक विभाग या आत्मभान अभियानात जनजागृतीसाठी सहभागी होणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.