Maharashtra

रूग्ण दुपटीचा वेग (डबलींग रेट) १४ दिवसांवर आणण्यात यश – मुख्य सचिव अजोय मेहता

मुंबई, दि. २६ : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग (डबलींग रेट) 14 दिवसांवर आणण्यात यश आले आहे.

मुंबईमध्ये 75 हजार खाटा तयार असून कॉन्टॅक्ट ट्रेसींगसाठी ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम राबविली जात आहे. राज्यात कोरोना चाचण्यांची संख्यादेखील दिवसागणिक वाढत असून राज्यात लवकरच 27 नवीन प्रयोगशाळा सुरु होतील. त्यामुळे राज्यातील प्रयोगशाळांची संख्या 100 होणार आहे, अशी माहिती मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज येथे दिली.

मंत्रालयातून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना मुख्य सचिव बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे डॉ.प्रदीप व्यास, मुंबई महानगरपालिका आयुक्त आय.एस.चहल उपस्थित होते.

यावेळी झालेल्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे असे :

मुख्य सचिव म्हणाले :

· राज्यात सध्या 35 हजार 178 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

· 9 मार्चपासून आतापर्यंत 52 हजार 667 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 15 हजार 768 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

· राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी तीन दिवसांवरुन 14 दिवसांवर आणण्यास यश मिळाले आहे. लोकांमधील जागरुकता आणि लॉकडाऊनमुळे रुग्ण दुपटीचा कालावधी वाढविणे शक्य झाले आहे.

· राज्यात टेस्टींग, ट्रेसींग आणि आयसोलेशन या बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला.

· 9 मार्चला राज्यात केवळ दोन प्रयोगशाळा होत्या आज 72 प्रयोगशाळा कार्यान्वित असून नव्याने 26 लॅब येत्या काही दिवसात कार्यान्वित होतील. त्यामध्ये रत्नागिरी येथे एक, आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 18 खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या प्रयोगशाळा सुरु होतील.

· मार्चमध्ये दिवसाला 600 ते 700 चाचण्यांची असणारी क्षमता 13 हजारांहून अधिक झाली आहे.

· राज्यात सर्वेक्षण पथकांची संख्या दिवसांगणिक वाढत असून सध्या 16 हजार सर्वेक्षण पथक कार्यरत असून 66 लाख लोकांचे सर्वेक्षण आतापर्यंत झाले आहे.

· कॉन्टॅट ट्रेसींगवर भर दिल्याने कोरोनाची साखळी तोडण्यामध्ये यश मिळाले आहे.

· राज्याचा मृत्यूदर एप्रिलमध्ये 7.6 एवढा होता. तो आता 3.25 टक्के इतका खाली आला आहे.

· कोरोनावर उपचारासाठी 11 तज्ज्ञ डॉक्टरांचे कृतीदल नेमण्यात आले आहेत. त्यांनी उपचाराचा प्रोटोकॉल तयार केला. तो सर्व जिल्ह्यांना देखील पाठविण्यात आला. हे डॉक्टर्स 24 तास उपलब्ध असून कुठल्याही जिल्ह्याला उपचाराबाबत आवश्यकता असल्यास ते त्यांना संपर्क करु शकतात.

· राज्यभरात त्रिस्तरीय उपचारपद्धती करण्यात येत असून सुमारे 80 टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास :

· राज्यात सुमारे 1 हजार 114 लोकांना (3.6 टक्के) ऑक्सीजन, व्हेंटीलेटरची आवश्यकता आहे.

· कोविड केअर कॉर्नर 1600, कोविड हेल्थ सेंटर 432, कोविड हॉस्पिटल 277 एवढी संख्या असून त्यामध्ये 2 लाख 70 हजार आयसोलेशन बेड उपलब्ध आहेत.

· 24 हजार 345 बेड्सना ऑक्सीजनची सुविधा आहे.

· राज्यातील 20 टक्के रुग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता असून तर 10 टक्के रुग्णांना आयसीयूची गरज आहे.

· राज्यात तीन हजार व्हेंटीलेटर उपलब्ध असून अतिदक्षता विभागातील 8 हजार 400 बेड्स उपलब्ध आहेत.

· राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या एक हजार रुग्णालयातून मोफत उपचार मिळतील.

· राज्यातील 95 टक्के कोरोना रुग्ण महापालिका क्षेत्रातील असून त्यातील 70 टक्के रुग्ण मुंबई व परिसरातील आहेत.

मुंबई महानगरपालिका आयुक्त आय.एस.चहल :

· मुंबईत 31 हजार 789 पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यातील 8 हजार 400 रुग्णांना घरी सोडण्‍यात आले आहे. सध्या 22 हजार रुग्णांचर उपचार सुरु असून त्यातील 15 हजार 800 रुग्णांना लक्षणे नाहीत.

· मुंबई महापालिका परिसरातील मृत्यूदर हा सध्या 3.2 टक्के असून तो 3 वर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.

· मुंबईत कॉन्टक्ट ट्रेसींगवर भर देण्यात येत असून त्यासाठी ‘चेस द व्हायरस’ ही नवी मोहीम हाती घेण्यात येत आहे. याअंतर्गत एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकट सहवासातील 15 जणांना सक्तीने संस्थात्मक कॉरंटाईन केले जाणार आहे.

· कम्युनिटी लीडर नेमले असून त्यांना सहा प्रकारचे काम नेमून देण्यात आले आहे. त्यामध्ये कोमॉर्बीड रुग्णांची माहिती देणे. संस्थात्मक कॉरंटाईनमध्ये मिळणाऱ्या जेवणाची माहिती देणे, स्वच्छतागृहांची स्वच्छता, खासगी दवाखाने उघडले की नाही याची माहिती ते देतील. यासाठी प्रत्येक वार्डमध्ये वॉररुम उघडण्यात आली आहे.

· मुंबई महापालिका प्रत्येक बेडला विशिष्ट ओळख क्रमांक देणार असून त्या माध्यमातून उपलब्ध बेडच्या संख्येबाबतची माहिती ऑनलाईन होणार असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील आठवड्यापासून ते कार्यान्वित होईल.

· मुंबई महापालिकेची हेल्पलाईन असलेल्या 1916 क्रमांकासाठी मार्गिका वाढविण्यात येत असून उद्यापासून त्यावर कार्यवाही सुरु होईल. यामुळे नागरिकांचा प्रतिक्षा कालावधी कमी होईल.

· रुग्णालयातील खाटांसाठी डॅशबोर्ड तयार करण्यात येत असून दर अर्धा तासात रिकाम्या झालेल्या खाटांची माहिती तेथे अपलोड होईल.

· मुंबईत सध्या 75 हजार खाटा तयार असून त्यामध्ये सीसीसी 1 आणि डीसीएच यांची संख्या 44 हजार आहे.

· ज्या कोरोना रुग्णांना डायलेसीसची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी coviddialysis.in  हे पोर्टल तयार करण्यात आले असून डायलेसीससाठी उपलब्ध असणाऱ्या मशीनची माहिती मिळणार आहे. या सुविधेमुळे डायलेसीस अभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी करण्यात यश मिळणार आहे.

· रुग्णवाहिकांची संख्या 456 करण्यात आली आहे. सर्व रुग्णवाहिकांच्या चालकांना पीपीइ किट्स उपलब्ध करुन देण्यात आले आहे. उबेर ॲपचे यासाठी सहकार्य घेण्यात येत असून या ॲपवर रुग्णवाहिकांचे लोकेशन दिसणार आहे.

त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात रुग्णवाहिकांची कार्यक्षमता अधिक वाढून रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होईल.

· मुंबईतील 33 खासगी रुग्णालयांमध्ये 3 हजार 600 बेडस्‍ नॉनकोविड रुग्णांसाठी तर 2 हजार 624 बेडस्‍ कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर अतिदक्षता विभागातील 100 टक्के खाटा देखील उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सर्व खाटांच्या वितरणाबाबत नियंत्रण कक्षाबाबत देखरेख केली जात आहे.

· भारतीय प्रशासन सेवेतील सात अधिकाऱ्यांना शासकीय रुग्णालयांच्या नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तिथे वॉररुम करण्यात येणार असून कोविड वॉर्ड, आयसीयू वार्ड सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख करण्यात येणार आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button