Maharashtra

खते, बियाणे थेट बांधावर उपलब्ध करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अकोला –  खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात खते, बियाणे व अन्य कृषी निविष्ठांची उपलब्धता करण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधापर्यंत ह्या निविष्ठा पोहोच करण्यासाठी शेतकरी गटांमार्फत यंत्रणेने पोहोच करुन द्यावी, 

शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत बियाणे खतांची कमतरता भासू देऊ नका, असे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी यंत्रणेला दिले. अकोला येथे खरीप हंगाम २०२० च्या विभागीय जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते.

खरीप हंगाम २०२० चा विभागीय जिल्हा आढावा अकोला येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आला. या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री दादाजी भुसे हे होते. यावेळी अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीस विधानपरिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर,

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार,  विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आलोक तारेणिया आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. भुसे यांनी  वाशीम, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला या क्रमाने जिल्हानिहाय आढावा घेतला. त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व सर्व संबंधित अधिकारी  उपस्थित होते.

३२.६० लक्ष हेक्टर  क्षेत्रावर पेरणीचे नियोजन

अमरावती विभागात लागवड योग्य क्षेत्र ३५.१४ लाख हेक्टर इतके असून खरीप हंगामाचे क्षेत्र हे ३२.३२ लाख हेक्टर इतके आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याने आपापले नियोजन सादर केले. त्यानुसार अमरावती विभागात खरीप हंगामात यंदा बुलढाणा जिल्ह्यात ७.४८ लक्ष हेक्टर, अकोला जिल्ह्यात ४.८१ लक्ष हेक्टर, वाशिम ४.०४ लक्ष हेक्टर,  अमरावती ७.२८ लक्ष हेक्टर आणि यवतमाळ ८.९९ लक्ष हेक्टर असे एकूण ३२ .६० लक्ष हेक्टर  क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे.

उत्पादकता वाढीसाठी लक्षांक

यंदाचे वर्ष हे उत्पादकता वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात यंदा पिकनिहाय उत्पादकता वाढीसाठी लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यात सोयाबीन पिकासाठी १३५३० हेक्टर क्षेत्रावर १५ हजार ७२२ मे.

टन, कापूस ११५४६ हेक्टरवर २५५३८ मे. टन, तूर ४४५२ हेक्टरवर ४६०८ मे.टन, मूग ९८३ हेक्टरवर ५५१ मे टन, उडीद ७५६ हेक्टरवर ४१३ मे टन, खरीप ज्वारी ७०० हेक्टरवर ६४६ मे टन तर मका ३६५ हेक्टरवर ७२६ मे टन इतका उत्पादनाचा लक्षांक ठरविण्यात आला आहे.

बियाणे, खतांची उपलब्धता

यंदा विभागात बियाणे उपलब्धतेसाठी ही नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सोयाबीन पिकासाठी  ५.५८ लाख क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून त्यापैकी सार्वजनिक क्षेत्राकडून  २.८८ लाख क्विंटल व खाजगी कंपन्यांकडून २ .७० लाख क्विंटल बियाण्याची उपलब्धता होणार आहे.

बी.टी कापूस बियाण्याची आवश्यकता ६०.६४ लाख पाकिटांची असून  ७८.३८ लाख पाकिटांची उपलब्धता होणार आहे. तूर पिकासाठी .३९ लाख क्विंटल बियाणे आवश्यक आहे,

मुगाचे .०७ लाख क्विंटल, उडीद .०६ लाख क्विंटल, मका.०५ लाख क्विंटल, खरीप ज्वारी .०६ लाख क्विंटल आवश्यकता असून याप्रमाणे बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली आहे.

विभागात खतांचे ५.४९ लाख मे.टनाचे आवंटन मंजूर असून ३१ मार्च २०२० अखेर विभागात ०.९२ लाख मेट्रिक टन शिल्लक साठा आहे. खरीप २०२० साठी ६.१९ लाख मे.टन खतांची मागणी करण्यात आली आहे.

बियाणे, खतांची कमतरता भासणार नाही याची खबरदारी घ्या

श्री. भुसे उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, शासनाने यंदाचे वर्ष हे उत्पादकता वाढ वर्ष म्हणून जाहीर केले आहे.

त्यादृष्टीने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खतांची कमतरता भासणार नाही याची खबरदारी घ्यावी. युरियाचा ५० हजार मेट्रिक टन साठा राज्यात उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांना युरीया कमी पडणार नाही मात्र जमिनीचा पोत चांगला रहावा यासाठी शेतकऱ्यांनी युरियाचा वापर हा कमीत कमी वा आवश्यक तितकाच करावा, यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून घरचे बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. तथापि, याबाबत सूक्ष्म नियोजन करुन शेतकऱ्यांना बियाणे उपलब्धता करावी.

थकबाकीचा विचार न करता पीक कर्ज द्यावे

पीक कर्जाबाबत भुसे यांनी स्पष्ट केले, जे जे शेतकरी मागणी करतील त्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे. शेतकऱ्यांकडे असलेल्या थकबाकीचा विचार न करता, पीक कर्ज द्यावे.

शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंका व बॅंकांचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही भुसे यांनी यावेळी दिला.

त्या त्या जिल्ह्यात पीक कर्ज वितरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दर चार दिवसांनी आढावा घेऊन कोणीही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश भुसे यांनी दिले.

टोळधाडीमुळे नुकसानीबाबत सतर्कता

विदर्भाच्या काही भागात टोळधाड आल्यामुळे सतर्कता बाळगण्याचे आदेश भुसे यांनी दिले आहेत. यासंदर्भात टोळधाड ही ज्या ज्या ठिकाणी येते तेथे फवारणीसाठी शासनाने मोफत औषध उपलब्ध करुन दिले आहे.

शिवाय टोळधाड मुळे पिकांचे, फळ बागांचे नुकसान झाल्यास त्याचे पंचनामे करण्याचे आदेशही देण्यात आले असल्याचे कृषी मंत्री भुसे यांनी सांगितले.

१५ जून पर्यंत खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी

शेतकऱ्यांकडील कापूस, तूर, हरभरा, मका, ज्वारी या शेतमालाची खरेदी प्रक्रिया येत्या १५ जून पर्यंत पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश श्री. भुसे यांनी दिले. यावेळी ते म्हणाले,

खरेदी केंद्रांवर येणारा माल हा शेतकऱ्याचाच आहे की नाही याची पडताळणी करण्यात यावी. शेतकऱ्याच्या नावाखाली व्यापारी माल विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले.

लॉकडाऊन मध्ये शहरात वा शहरानजीक निवासास असणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या शेतावर शेती कामासाठी जाण्या-येण्यास, वाहने इंधन इ. ने-आण करण्यास पोलीस प्रशासनाने मुभा द्यावी, असे निर्देश श्री. भुसे यांनी दिले.

लॉकडाऊन काळात शेतकरी ते ग्राहक साखळी विकसित

शेतकऱ्यांनी लॉकडाऊन काळात आपली जबाबदारी पूर्णतः पार पाडली. त्यांनी लोकांना घरपोच भाजीपाला व शेतीमाल पोहोचविला. शेतकरी ते ग्राहक ही साखळी चांगल्या पद्धतीने विकसित झाली आहे.

त्याच धर्तीवर शेतकरी गटांमार्फत थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी निविष्ठा पोहोचविण्याच्या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात दर्जेदार बियाणे, खते व अन्य कृषी निविष्ठा मिळण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे प्रश्न समन्वयाने सोडविण्यास शासन कटीबद्ध असून त्यासाठी समाजानेही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन श्री. भुसे यांनी केले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button