Maharashtra

कोरोना : कर्तव्य बजावताना मरण पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना हुतात्मा निधीतून १० लाख रुपयांची मदत

जळगाव, दि. 27 (जिमाका) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावताना मरण पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना हुतात्मा निधीतून 10 लाख रुपयांची मदत देण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत गृहमंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदार अनिल पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, रविंद्र पाटील आदिंसह माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यातील पोलिसांना विविध रुग्णालयांमध्ये उपचारादरम्यान सहाय्य मिळण्यासाठी 20 एप्रिलपासून कोविड-19 हेल्पलाईन (9132953295) सुरू करण्यात आली आहे.

या हेल्पलाईनच्या माध्यमातून प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे समुपदेशन व मार्गदर्शन केले जात आहे. याअंतर्गत 10 मे, 2020 पर्यंत 170 कॉल प्राप्त झाले आहेत.

पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून 1.5 लाख N-95 मास्क, 6 लाख थ्री प्ले मास्क असे एकूण 7.5 लाख मास्क, 25 हजार लिटर सॅनिटाझर, 22 हजार फेस शिल्ड, 44 हजार हँडग्लोज व ड्रोन अशा एकूण 4 कोटी रूपयांच्या साधनसामग्रीचे वाटप करण्यात आलेले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावताना पोलिसांचे आरोग्य अबाधित रहावे, यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारींना पोलीस कल्याण निधीतून सॅनिटायझर, गॉगल्स, पीपीई किट खरेदीचे अधिकार देण्यात आलेले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी प्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक आहे. याकरीता सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना रोग प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आर्सेनिक-30 व कॅम्पर-1 एम या व्हिटॅमिन सी आणि डी च्या गोळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.

कोरोना बाधित पोलीसांना पोलीस कल्याण निधीतून 1 लाख रुपये अग्रिम स्वरूपात अदा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आतापर्यंत कल्याण निधीतून 3 कोटी रक्कम कोरोना बाधित पोलिसांना अग्रीम स्वरुपात देण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनेंतर्गत कोविड-19 प्रतिबंधात्मक साहित्य खरेदीसाठी कार्यालयीन खर्च या शिर्षकाखाली 9 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. कोरोना बाधित पोलिसांना महाराष्ट्र कुटुंब आरोग्य योजनेंतर्गत नामांकित हॉस्पिटलमध्ये रोकडरहित (Cashless) उपचार केले जात आहेत.

या योजनेंतर्गत राज्यातील धुत अँड एजीएम हॉस्पिटल औरंगाबाद, हॉरिझॉन हॉस्पिटल, ठाणे,आदित्य बिर्ला अँड डि वाय पाटील हॉस्पिटल, पिंपरी-चिंचवड या दवाखान्यांमध्ये इलाज सुरू आहेत.

या दवाखान्यांमध्ये कोरोना विषाणूचे  बाधित पोलिसांच्या उपचाराकडे जातीने  लक्ष देऊन त्यांचेवर योग्य प्रकारे उपचार करण्यात येत आहेत. प्रत्येक विभागात कोविड कक्षाची स्थापन करण्यात आली असून कोरोना बाधित पोलिसांची योग्यरित्या काळजी घेता यावी म्हणून त्यांच्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि राज्यातील पोलिसांना कोरोनाची झालेली लागण या पार्श्वभूमीवर 50 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे संसर्गजन्य जागी कर्तव्य न देण्याचा व 55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना रजा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही राज्य शासनाने घेतला असल्याचे गृहमंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाचे संकट टाळण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय यंत्रणा एकदिलाने काम करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्क्रिनिंग वाढविण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत.

त्याचबरोबर आंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेची तपासणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर लॉकडाऊन सुरु झाल्यापासून सर्व धर्मियांचे सण, उत्सव अत्यंत साधापण्याने साजरे करण्यात येत असल्याबद्दल गृहमंत्र्यांनी सर्वधर्मीय गुरुंचे अभिनंदन करुन आभारही मानले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button