अहमदनगर ब्रेकिंग : बाबासाहेब तांबेंची राजकारणातुन निवृत्ती !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सातत्याने दुष्काळाच्या खाईत लोटलेल्या पारनेर तालुक्यातील एका छोट्याशा गावात गोरेगाव मध्ये जन्मलेलो आम्ही.तालुक्याच्या राजकीय पटलावर कधीही न दिसणारं आमचं गाव गोरेगाव.मी बाबासाहेब तांबे गावचा एक तरुण,त्या काळात गावातील ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि या गोरे गावचा सरपंच झालो. सर्व जागा विरुद्ध शून्य या फरकाने निवडणूक जिंकली.

निवडणूक जिंकल्यानंतर मिळवलं काय तर भाडे कराराच्या जागेत असणारे ग्रामपंचायत कार्यालय एक टेबल आणि दोन लोखंडी खुर्च्या बस्स एवढंच. खरंतर ही शून्यातून सुरुवात होती. चांगले सहकारी मिळाले आम्ही काम करत राहिलो.गावात गटार,रस्ते,पाणी,विज,रोजगार अशा अनेकानेक समस्या होत्या.जणू समस्यांचा डोंगर समोर उभा होता.एक एक समस्या सोडवायची होती.गावातील लोकांचं हित ही सांभाळायचं होत.ग्रामपंचायत कार्यालय पहिले महत्वाचे होते. प्रथम ग्रामपंचायतचे कार्यालय स्वमालकीचे उभारले. गावातील विजेची सोय केली. पिण्याच्या पाण्याची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली.

 समस्या निराकरण करता करता पाच वर्षे निघून गेली. पुन्हा ग्रामपंचायत निवडणूक आली, आमच्या कामाचा ठसा आम्ही जनतेच्या मनावर  उमटवला. गावच्या जनतेने आम्हाला पुन्हा संधी दिली, ती देखील व्हाईटवॉश..! सर्व जागा विरुद्ध शून्याच्या फरकाने..! आता आमची जबाबदारी वाढली होती.

 लोक समस्या घेऊन येत होते. जसं शक्य होईल तसं आम्ही त्यांच्या समस्यांचं समाधान शोधत होतो. वाड्या-वस्त्यांवर वीज पोहोचवण्याचं काम केलं, चारचाकी गाडी प्रत्येक वाडी-वस्तीवर जाईल असे रस्ते तयार करण्याचे धोरण अवलंबले. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली. तालुक्‍याचे नेतृत्व कै.मा.आमदार आदरणीय वसंतरावदादा झावरे पाटील यांनी संधी दिली आणि तिथेदेखील मला कृषी उत्पन्न बाजार समितीचा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

परिसरातील नव्हे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविता आल्या. शेतकरी मित्रांना न्याय देता आला. त्यानंतर पंचायत समितीची निवडणूक लागली. गावात चाललेल्या कामांचा धडाका पाहून, नेतृत्वगुण हेरून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे मा.उपाध्यक्ष नामदार विजयराव औटी साहेबांनी पंचायत समितीची उमेदवारी दिली. त्या निवडणुकीतही राज्यात विक्रमी मताधिक्क्याची ची नोंद होईल, अशी निवडणूक जिंकली. पाच वर्षातील अडीच वर्षे पंचायत समितीच्या उपसभापती पदाची संधी मिळाली.

 तिथेही रोजगार हमी योजना यशस्वीपणे राबविली. तालुक्यात आणि गावातही सर्वाधिक शेतकऱ्यांना शेकडो विहिरींचा लाभ मिळवून दिला. अनेक लोकांना घरकुल योजनेचा लाभ देता आला. असंख्य शेती उपकरणे, विविध योजनांचा लाभ गावातील तसेच परिसरातील लोकांना मिळवून दिला.पुन्हा ग्रामपंचायत ची निवडणूक लागली,सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत सर्वच जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला होता,आता ही हॅट्रिक ची संधी होती आणि आव्हान ही होते

पण गावच्या विकासाचा आणि माझ्या राजकीय जीवनाचा चढता आलेख गोरेगावकारांनी कायम ठेवला आणि इतिहास घडविला..!पुन्हा तिसऱ्यांदा अकरा शून्य च्या फरकाने आम्ही निवडणूक जिंकली.ही सर्व पुण्याई कामी आली आणि पुढील पाच वर्षासाठी जिल्हा परिषदेची निवडणूक लागली. तिथेही संधी मिळाली त्या संधीचं सोनं करणार नाही मग ती गोरेगावची जनता कसली

प्रत्येक जण स्वतः आपणच  उमेदवार म्हणून कामाला लागला. स्वखर्चाने लोक प्रचारात उतरली.सगळ्या राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती घडली,विजयी घोडदौड कायम ठेवत जिल्हा परिषद निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली..! जिल्हानियोजन ला पक्षाकडे मतांची संख्या नसतानाही सर्वपक्षीय मित्रपरिवाराने तिथेही इतिहास घडवला..!जिल्हा परिषदेत पक्षाचा गटनेता म्हणून माझी नोंदणी झाली.विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी पक्षाने माझी निवड केली

जिल्हापरिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन समितीच्या सभापती पदाचा मान माझ्या रूपाने गोरेगावला मिळाला.गोरेगावचं नाव जिल्हाभर पोहोचलं.संपूर्ण जिल्ह्यात काम करता आलं,त्यासोबतच गावचं ही भलं करता आलं.जिल्हापरिषदेच्या इतिहासात विक्रमी संख्येने पशु चिकित्सालये ( जनावरांचे दवाखाने) नव्याने उभारता आले.कित्येक कोटींचा निधी पशुसंवर्धन विभागाला आणला.कृषी समितीचा कधीही नजरेत न येणारा विभाग चर्चेत आणला तो कामाच्या जोरावर

प्रगतशील शेतकरी पुरस्कार,आदर्श गोपालक पुरस्कार, असे नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडले.अनेक लोकांना जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ देता आला.गावाला ही या पदामुळे न्याय देता आला.गावात भूमिगत गटार योजना पूर्ण केली.गावठाणातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीट चे केले.बॉटल पाम आणि सुपारीची झाडे संपूर्ण गावात रस्त्याच्या लगत लावली.गोरेश्वर मंदिर तीर्थक्षेत्राचा ‘ क ‘ वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश केला.त्या माध्यमातून भरगोस निधी मिळाला.मंदिराजवळ नदी काठी घाट बांधला.भव्य स्टेज उभारले

जवळपास 10 हजार लोकं बसतील एवढे मोठे क्षेत्र पेव्हिंग ब्लॉक बसवले.आज कित्येक गोर गरीब आणि श्रीमंतांची ही लग्न,इतर कार्यक्रम या ठिकाणी पार पडतात. या ठिकाणी राज्य पातळीवरील चांगले संगीताचे कार्यक्रम होतात.तालुक्यातील भव्य कार्यक्रमांपैकी एक गणेश फेस्टिव्हल तसेच नवरात्र उत्सव भरवले गेले.गावात लाखो लोकांनी भेट दिलेला भक्ती पंढरी हा भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही सहकाऱ्यांनी गावच्या प्रत्येकाच्या योगदानातून राबविला

गावात सर्वत्र हायमॅक्स दिवे बसवले.गावातील सर्वच अंगणवाडी च्या इमारती,जिल्हा परिषदच्या वस्ती शाळा,मुख्य शाळा,यांच्या नव्याने इमारती उभारल्या.पशु वैद्यकीय दवाखाना    नव्याने उभारला.गावाला सततच्या विजेच्या समस्येतून सोडवण्यासाठी गावाला स्वतंत्र सबस्टेशन उभारले.जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात आदर्श निर्माण करणारी वातानुकूलित ग्रामपंचायत उभारली,छत्रपती शिवाजी महाराज वतानुकुलीत सभागृह ग्रामपंचायत मध्ये उभारले.तालुक्यात आदर्श असे भव्य वातानुकूलित ‘शिवगड’ भक्त निवास उभारले

गावातील प्रत्येक वाडी वस्तीवर जाण्यासाठी रोजगार हमीच्या माध्यमातून रस्ते तयार केले. गाव तालुक्याला आणि जिल्ह्याला जोडणारे दोन्ही मुख्य रस्ते कोटींच्या निधीतून पूर्ण करता आले.गावात सभामंडप उभारले.समाज मंदिरे उभारले.अनके बचतगटांना जिल्हापरिषदेच्या माध्यमातून लाभ मिळवून दिला. जिल्ह्यात विक्रमी क्षेत्रावर गावात रोजगार हमीचे काम करता आले.त्यामुळे जलसिंचन होण्यास मदत झाली.डोंगर माथ्यावरून पाणी गावात प्रत्येक ओढ्या नाल्यावर केटिवेअर बांधून पाणी अडवले गेले.गावात प्रत्येक वाडीवस्तीवर स्ट्रीट लाईट बसवली.

गावाच्या दृष्टीने महत्वकांक्षी अशी काळू धरण ते गोरेगाव पाणी योजना मंजूर करून पूर्ण केली.ज्या योजनेचा लाभ पाडळी, हिवरे कोरडा,व माळकूप गावाला ही झाला.आजीवन गावची पाण्याची समस्या मिटली.वाडी वस्तीवर गावची पाणीपुरवठा लाईन पसरवली.एकाच ठिकाणाहून संपूर्ण गावाला पाणीपुरवठा सुरळीत केला.गावातील सर्व जिल्हा परिषदच्या शाळांना कंपाऊंड बांधले.सर्व शाळा डिजिटल करण्यासाठी पाठपुरावा केला.गावातील लोकांच्या गाव,तालुका,जिल्हा पातळीवर समस्या सोडवता आल्या.

अनेक लोकांना वैयक्तिक लाभाच्या योजना देता आल्या.या गोष्टींचे मनोमन समाधान आहे.चौथ्यांदा ग्रामपंचायत निवडणूक माझ्या नेतृत्वात लढली गेली आणि आम्ही ऐतिहासिक निर्णय घेऊन संपूर्ण महिलराज आणले.सर्वची सर्व जागी महिला उमेदवार दिले आणि निवडूनही आणले.विधानसभेला ऐन वेळी उमेदवारी मिळाली.तालुक्यातून 25 हजार मते मिळाली.पण पराभव झाला.पुढे पंचायत समितीच्या निवडणूकित पत्नीचा धनशक्ती विरोधात पराभव झाला.ही सल गावकऱ्यांच्या जिव्हारी लागली.त्यांनी पत्नीलाच सरपंच करण्यासाठी आग्रह धरला.जनतेतून सरपंच निवड करायची पहिलीच  निवडणूक होती संपूर्ण गावाच्या मतातून सरपंच निवडला जाणार होता.माझ्या नेतृत्वात लढलेली ही पाचवी ग्रामपंचायत निवडणूक या वेळी परिस्थिती वेगळी होती,काही लोकं विरोधात गेली

पण जनतेनं विजयाची माळ आमच्या गळ्यात टाकली.सरपंच पद हजार पेक्षा जास्त मताधिक्याने तर सर्व जागाही शेकड्यांच्या फरकाने निवडून दिल्या.तालुक्यात एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून आपल्या गोरेगावने नावलौकिक मिळवला आहे.तालुक्यालाच नव्हे तर राज्याला  दिशादर्शक असे अनेक उपक्रम आपल्या ग्रामपंचायत च्या माध्यमातून साकारले गेले.

तालुका आणि जिल्हा पातळीवर नेतृत्व करण्याची संधी देणाऱ्या आदरणीय कै.मा.आमदार वसंतरावदादा झावरे पाटील व नामदार विजयवराव औटी साहेब यांचे देखील मी शतशः आभार मानतो.

सलग 25 वर्षे ग्रामपंचायतची एकहाती सत्ता गावाने दिली.भरभरून प्रेम दिले,ओळख दिली.त्या प्रेमाला शक्य तेवढा न्याय देण्याचा माझ्या कुटुंबाने प्रयत्न केला.परंतु आजची राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत आहेत.

आज राजकारणाची व्याख्या बदलत चालली आहे.लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.पूर्वी शब्द,विकास,काम,या गोष्टींना किंमत होती.आज ती उरलेली नाही.तरुण पिढीचं राजकारण आता वेगळं वळण घेत आहे.नवनवीन संकल्पना राजकारणात रूढ होत आहेत.आता वेळ आली आहे राजकारणातून निवृत्त होण्याची.या निर्णयामुळे आपणाला वेदना होतीलही परंतु आपल्यातीलच नवीन लोकांना पुढं येता येईल,नेतृत्व करता येईल.ज्यांच्यात क्षमता आहे त्यांनी पुढं यावं.काम करावं,आपलं नेतृत्व सिद्ध करावं.आम्ही जिवापाड जपलेलं हे गोरेगाव..जे आज मॉडेल व्हिलेज झालंय ते असंच गावचं नाव अजून मोठं करत सांभाळावं..!

ज्या लोकांनी मोठ्या हिंमतीने आज पर्यंत या ग्रामविकास पॅनल ला साथ दिली,मोठ्या निवडणुकांमध्ये आपल्या सोबत राहिले आणि जे विरोधात राहिले अशा सर्वच लोकांचे उत्तरदायित्व आज आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे.मी बाबासाहेब तांबे जरी निवडणूक लढवणार नसलो,माझे कुटुंब निवडणूक लढवणार नसले तरी माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी मी तन-मन-धनाने  सोबत राहणार आहे.माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीशी,नव्हे एक पाऊल पुढे राहून त्यांच्या सर्व निवडणूका मध्ये त्यांना निवडून आणण्याची 100 % जबाबदारी माझी राहील.याचा विश्वास सर्व सहकाऱ्यांना आणि सर्व जनतेला देतो.गाव चांगल्या लोकांच्या हाती राहील याची काळजी मी तर घेईलच.परंतु आपण सर्व घेणार याची मला खात्री आहे.

या दिवशी एक निर्णय आपण सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो की मी आणि माझ्या कुटुंबातील सदस्य या पुढील आयुष्यात कोणतीही निवडणूक लढवणार नाही.

मी राजकारणातून निवृत्ती घेणार याचा गोड अर्थ कुणी असा काढू नये की मी रणांगण सोडले ; माझे मावळे आपल्यासाठी सक्षम पर्याय आहेत.मी त्यांच्या पाठशी नाही तर सोबत उभा आहे.


ग्रामपंचायत सरपंच पदावर काम करत असलेली माझी पत्नी कार्यकाल पूर्ण होईपर्यंत अतिशय तत्परतेने आपल्या सेवेत काम करत राहील.आमच्या घराचे दरवाजे गावातील प्रत्येक माणसासाठी सदैव उघडे राहतील.जमेल ते सहकार्य निश्चित आपणाला केले जाईल. 

आपले सर्वांचे नतमस्तक होऊन आभार..!
सर्वांना निरोगी आणि कोरोना मुक्त
सुखदायी आयुष्यासाठी शुभेच्छा..!

– सदैव आपलाच
बाबासाहेब रामभाऊ तांबे

Leave a Comment