नागवडे यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणावा लागेल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कुकडीच्या पाणी प्रश्नी नेहमीच स्वार्थी राजकारण करून कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना वेठीस धरणारे आ.बबनराव पाचपुतेच पाणीप्रश्नी खऱ्या अर्थाने झारीतील शुक्राचार्य असून त्यांची वकिली करून घन:शाम शेलार यांना बदनाम करण्याचा उद्योग संदीप नागवडे यांनी बंद करावा अन्यथा त्यांचा शैक्षणिक सेवेतील खरा चेहरा आम्हाला जनतेपुढे आणावा लागेल,असा इशारा श्रीगोंदा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष श्री.अख्तर शेख यांनी दिला.

भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी राष्ट्रवादीचे नेते श्री. घन:शाम शेलार हे पुणे जिल्ह्यातील नेत्यांची मर्जी राखण्यासाठी नौटंकी करतात अशी टीका केली होती त्याला उत्तर देताना श्री.शेख पुढे म्हणाले,आ.पाचपुते ३१ वर्ष आमदार असून त्यातील १३ वर्ष मंत्री होते.त्यांनी पाणी प्रश्नी कधीही पुणे जिल्ह्याने अन्याय केला म्हणून अवाक्षर काढले नाही.

ते केवळ आपले मंत्रिपद अबाधित राहावे म्हणून केलेली हुजरेगिरी होती काय ? असा सवाल श्री.शेख यांनी केला. श्री.घन:शाम शेलार यांनी कुकडी,घोड,साकळाई व तालुक्यातील विविध विकास प्रश्नावर अभ्यासपूर्ण व प्रामाणिक लढा दिला.१९९५ साली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही कुकडीचे पाणी तालुक्याला मिळावे म्हणून प्रामाणिक प्रयत्न केले.

केवळ त्यांच्या प्रयत्नानेच भरीव निधी मिळून कुकडीचे पाणी श्रीगोंदा तालुक्याला मिळालेले आहे,हे त्यांचे तालुक्यासाठी खूप मोठे योगदान आहे याची जनतेला जाणीव आहे.म्हणूनच ऐनवेळी जाणते राजे आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी श्री.शेलार यांना विधानसभेची उमेदवारी दिली असताना केवळ १४ दिवसांत मतदार संघातील ९९ हजार मतदारांनी त्यांना मतदान केले.

ही त्यांच्या संघर्षाची पावती असून त्यांना पाचपुते किंवा नागवडे यांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. श्री.शेलार यांनी कोणत्याही सत्तेविना जनतेच्या प्रश्नासाठी केलेला संघर्ष व त्यामुळे विकासात मिळालेले त्यांचे भरीव योगदान

जनतेच्या दृष्टीआड करण्याच्या दुष्ट हेतूने गोबेल्स नीती वापरून त्यांना बदनाम करण्याचे उद्योग बंद झाले नाहीत तर तुमच्या बोलवित्या धन्याने त्यांच्या ४० वर्षांच्या राजकीय जीवनात तालुक्याची कशी वाताहात लावली व तुम्ही शैक्षणिक सेवेतील लावलेल्या दिव्यांचा जाहीर पंचनामा केला जाईल,असाही इशारा श्री.शेख यांनी दिला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment