अहमदनगर मध्ये कोरोना वाढला…जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी उतरले रस्त्यावर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  गेल्या दोन दिवसांमध्ये अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळण्याचा वेग वाढला आहे. जिल्ह्यामध्ये दोनच दिवसांमध्ये ५० हून अधिक कोरोना बाधित सापडले असून त्यापैकी जास्त रुग्ण नगर शहरातील आहेत.

या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना आरोग्य विभागाकडून ताब्यात घेण्यात येत आहे. तसेच अनलॉक सुरू झाल्यापासून ज्या भागात जास्त गर्दी होत आहे, तेथील गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजनाही सुरू केल्या आहेत.

नगर शहरातील महत्त्वाचा असणारा चितळे रोड सुद्धा पत्रे लावून बंद करण्यात आला आहे. नगर शहराच्या अंतर्गत भागात हॉटस्पॉट जाहीर करण्यात आल्याने नगरची ऐतिहासिक दिल्लीगेट वेस सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे

शहरातील सिद्धार्थनगर, नालेगाव, तोफखाना या दाट लोकवस्ती असलेल्या भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे खुद्द जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रस्त्यावर उतरले आहेत.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी नालेगाव भागात जाऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली.हॉटस्पॉटमधून कोणीही बाहेर व बाहेरून हॉटस्पॉटमध्ये कोणी येणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

रुग्णांमध्ये नालेगाव, सिद्धार्थनगर व तोफखाना या दाटवस्तीमधील रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी तातडीने नालेगाव, सिद्धार्थनगर व तोफखाना हे तीन परिसर हॉटस्पॉट म्हणून जाहीर केले आहेत.

या परिसराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. येथील अत्यावश्यक सेवेची दुकानेही बंद करण्यात आली असून या सेवा महापालिकेकडून देण्यात येणार आहेत.

मात्र, हा परिसर दाटवस्तीचा असल्यामुळे येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे अहमदनगर महापालिका व जिल्हा प्रशासनही विशेष खबरदारी घेत आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नालेगाव येथे जाऊन पाहणी केली.

यावेळी पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, शहर अभियंता सुरेश इथापे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment