Ahmednagar NewsAhmednagar South

२१ वर्षीय मुलाने विहिरीत पडलेल्या आईला मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  नुकतेच पोहण्यास शिकलेल्या अवघ्या एकवीस वर्षीय मुलाने विहिरीतील पाण्यात चार तास मोठ्या धिराने आईला वाचवत मृत्यूच्या दाढेतून परत आणले.त्याच्या या धाडसाचे बोधेगाव परिसरातून कौतुक होत आहे. बोधेगाव येथील मीराबाई आबासाहेब घोरतळे (वय अंदाजे ५०) या बुधवारी दिवसभर स्वतःच्या शेतातील ऊस पिकांची खुरपणी करत होत्या. सायंकाळी साडे पाच-पावणेसहाच्या सुमारास काम आटोपून शेतातील जनावरांना शेडमध्ये बांधत होत्या.

त्याच वेळी एका गोऱ्ह्याने मीराबाईला पाठीमागून धक्का दिला. या धक्क्याने त्यांचा तोल शेजारील विहिरीत गेल्याने आवाज झाला.त्या आवाजाने आईला शेतातून घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या मीराबाईच्या एकवीस वर्षीय मुलाने (अमोल) विहिरीकडे धाव घेतली असता विहिरीत आईने दोन गटांगळयाही खाल्ल्या.

तोच त्यांच्या हातात मोटारीचा पाइप हाती आल्याने त्यास त्यांनी धरून ठेवले.तोवर मुलाने दोन दोरखंड जवळील झाडाला बांधून विहिरीत उडी घेऊन तिला धरून तो दोर तिला कमरेला बांधून पाइप अन् दोरखंडाच्या साहाय्याने तिला बुडण्यापासून वाचवले.मात्र, पाण्याने ओल्या झालेल्या सर्वांगामुळे स्वतःसह आईला घेऊन वर काढण्याचा त्याचा प्रयत्न दोनवेळा अयशस्वी झाला.

घाबरलेल्या आईला घट्ट धरून ठेवत ‘आता मी आहे ना, मग जरी कोणी आले नाही, तरी रात्रभर म्हटले तरी आपण असेच पाण्यात राहू पण घाबरु नको’, असे म्हणत मुलगा धीर देत होता. दरम्यान, विहिरीत उतरताना स्वतःचा फोन काठावर असल्याने मदतीसाठी गावांत कोणाशी संपर्क करता आला नाही आणि फोनवर आलेल्या एकाही कॉलला त्यास प्रत्युत्तर देता आले नाही.

या घटनेबाबत कोणासही मागमूस नसल्याने सायंकाळी सहापासून विहिरीत अडकलेल्या दोघा माय -लेकरांना आहे याच परिस्थितीत सुमारे चार तास पाण्याशी अन् अंधाराशी सामना करत मृत्यूशी झुंज द्यावी लागली. विहिरीतून मदतीसाठी आवाज दिला. मात्र, घटनास्थळापासून जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत कोणीही नसल्याने त्यांना लवकर मदत मिळू शकली नाही.

याच वेळी नळाला पाणी आल्याने घरी एकटीच असलेल्या अल्पवयीन मुलीने सर्व पाणी भरून ठेवले. पाणी भरल्यावर रात्री नऊच्या सुमारास घरी आलेल्या वडिलांना शेतातून अजून आई आणि भाऊ परत न आल्याची कल्पना दिली.

ही माहिती समजताच गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शेताकडे वडील आबासाहेब घोरतळे, प्रमोद तांबे, राधाकिसन घोरतळे, राम घोरतळे, गणेश उगले, गौराम ढेसले यांच्यासह नजीकच्या वस्तीवरील रहिवाशांनी धाव घेतली. शेतात पोहोचताच गाडी आढळून आली.

मात्र, मीराबाई आणि अमोल सापडून न आल्याने आबासाहेब, प्रमोद आणि राधाकिसन यांनी विहिरीकडे धाव घेतली. तत्पूर्वी प्रमोद तांबे याने मारलेल्या हाकेला ओ देत अमोलने विहिरीत पडलो असल्याची कल्पना दिली. तोपर्यंत नजीकच्या वस्तीवरील आणि गावातील इतरही नागरिक मदतीसाठी आले.

भाजीपाल्याच्या क्रेटमध्ये बसवून मीराबाईला आणि इतर दोरखंडाच्या सहाय्याने अमोलला विहिरीतून बाहेर काढण्यात रात्री दहाच्या सुमारास यश आले. दरम्यान, महिनाभरापूर्वीच पोहायला शिकलेला अमोल पोहण्यात सरावलेलाही नव्हता. मात्र आई जीवन मरणाच्या दारात उभी असताना पुढचा मागचा विचार न करता दोरखंड झाडाला बांधून थेट विहिरीत उडी घेवून रात्रीच्या अंधारात चार तास आईला वाचवले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button