Spacial

थोडंसं मनातलं : महापालिकेतील “नाजुक” कहाणी, माता न तु आहेस “वैरीणी”-

ॲड. शिवाजी अण्णा कराळे

नमस्कार मित्रांनो, 

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांसाठी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तसेच अनेक रूग्ण बरे झाले आहेत तसेच अनेक उद्योग व्यवसाय सुरू झाल्याने रोजगार उपलब्ध झाला व नागरिकांच्या अर्थिक अडचणी दूर झाल्या त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एकीकडे कोरोनाचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी व कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन चांगले काम करत आहे. तर दुसरीकडे महापालिकेचे काही जबाबदार लोकं रंगीले चाळे करत आहेत.

अशा या लाॅकडाऊन व संचारबंदी च्या काळात सुद्धा काही भयानक व माणुसकीला काळीमा फासणा-या अशा काही घटना  घडतात की सर्व शहर हादरून जाते. आजकाल ज्यांना सर्व सामान्य लोक समजातील देव समजले जाते अशा काही डाॅक्टर महोदयांना नेमकं काय झालंय हेच समजत नाही. काही डाॅक्टर साहेब व अधिकारी असे  बेजबाबदार पणे का वागतात हेच समजत नाही.

काही दिवसांपूर्वी  काही डाॅक्टर मंडळी यांचेवर कोरोनाचे रूग्णा बाबतीत प्रशासनास माहिती  कळविली नाही म्हणून, तर काही डाॅक्टर यांनी नियमाचे उल्लंघन केले म्हणून तर एका डाॅक्टर महोदय यांनी विनापरवाना गर्भपात केला म्हणून अहमदनगर मधील वेगवेगळ्या पोलिस स्टेशन ला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डाॅ सुनिल गंधे यांनी गर्भपात केलेल्या  त्या महिलेच्या जिवितास पोटातील बाळा मुळे धोका निर्माण झाला होता म्हणून गर्भपात केला असावा असे अनेक जण आता खासगीत बोलतात. कारण त्यांचेकडे मॅटर्निटी होम चा परवाना आहे. खरे काय आणि खोटे काय हे फक्त डाॅ गंधे आणि सीव्हील सर्जन यांनाच माहित. परंतु सध्या तरी डाॅ गंधे यांचेवर नगर तालुका पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे कमी होते की काय म्हणून कालच महापालिकाचे आरोग्य अधिकारी डाॅ अनिल  बोरगे, अग्नीशामक विभागाचे शंकर मिसाळ आणि कर्मचारी बाळू घाटविसावे यांचे सह एका नर्स असणा-या  महिलेवर तिच्याच लहान मुलाच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या नर्स  महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला ती महिला सुद्धा महापालिकाची कर्मचारी आहे. वर्तमानपत्रात आलेली बातमी वाचल्यावर असे लक्षात येते की, महापालिकेची कर्मचारी असलेल्या नर्स महिलेच्या घरात डाॅक्टर अनिल बोरगे, अग्नी शामक दलाचे शंकर मिसाळ आणि कर्मचारी  बाळू घाटविसावे यांनी रात्री जबरदस्तीने घरात घुसून दारूची पार्टी केली.

त्या महिलेच्या लहान मुलाने अनेक दिवसांपासून घडत असलेल्या या प्रकारास  विरोध केला असता उलट त्या लहान मुलाला  या तीन जणांनी सिगारेट चे चटके दिले, बुटाने मारले व गच्चीवरून फेकून देण्याची व जिवे मारण्याची धमकी दिली. जर खरोखरच जबरदस्तीने हे घरात घुसले असतील  तर सदरचे महिलेने पोलिस स्टेशनला स्वतः होऊन या तीनही जणांचे विरोधात फिर्याद का दाखल केली नाही ?. तसेच हा प्रकार एकदोन वर्षापासून चालू होता तर ती महिला गप्प का बसली?

या मध्ये एक तर सदरचा प्रकार त्या नर्स महिलेच्या  सहमतीचा असावा किंवा डाॅ अनिल   बोरगे हे वरिष्ठ अधिकारी असल्याने व शंकर मिसाळ याने तिला नोकरी साठी  व घर घेण्यासाठी मदत केल्यामुळे हा प्रकार  दबावाखालती चालत असावा असे वाटते आहे. आता तर तोफखाना  पोलिस प्रशासन यांनी भादवि 324,323, 504 , 506 सह 34 व बालकांचा कायदा 75  इ. कायद्या नुसार गुन्हा दाखल केला आहे. खर तर त्या मुलाला या तीन जणांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून व मारण्याचा कट केला म्हणून त्यांचेवर  गुन्हा दाखल होणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. उलट गुन्हा दाखल करण्यासाठी खुप वेळ त्या मुलाला पोलिस स्टेशन मधे बसवून ठेवले.

जेव्हा अहमदनगर मधील सुज्ञ पत्रकार महोदय यांनी या प्रकरणात लक्ष घालायला सुरुवात केली तेव्हा कुठे गुन्हा दाखल करण्यात आला. खरंच त्या सर्व पत्रकारांचे मनापासून आभार.  वास्तविक हे प्रकरण जर खरंच “नाजूक ” असेल तर भविष्यात त्या लहान मुलाला नक्की धोका संभावतो आहे. त्या मुळे सन्माननीय पोलिस अधिकारी यांनी तपास करताना या सर्व बाबींचा विचार करून गुन्ह्याचा तपास करणे आवश्यक आहे. या अगोदर अनैतिक संबधाचे आड आले म्हणून अनेक ठिकाणी खूनाचे गुन्हे घडले आहेत.

मुंबई मध्ये पोलिस अधिकारी कुरुंदकर याने तर आपलीच सहकारी पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हिचा अनैतिक संबधातुन खून केल्याचे उघड झाले. अहमदनगर च्या कोतवाली पोलिस स्टेशन मधे सुद्धा काही दिवसांपूर्वी असाच “नाजुक”  प्रकार घडला होता. पुढे तो प्रकार आपसात मिटला अशी चर्चा आहे. हे वरिष्ठ अधिकारी असे का बेजबाबदार पणे वागतात हेच समजत नाही. आता महापालिकेच्या नर्सच्या मुलाला जर आपल्या जन्मदात्या आई बद्दल सर्व गोष्टी माहिती असतील तर निश्चितच तो सुरक्षित नाही असे वाटते.

पुरावे नष्ट करण्याचा हेतु मनात ठेउन कोणतेही पाऊल उचलले जाऊ शकते या बाबतीत पोलिस प्रशासन यांनी  खबरदारी घेणे आवश्यक आहे. आता प्रश्न पडतो तो म्हणजे  महापालिकेच्या या अधिकारी वर्गाला पार्टी करण्या साठी स्वतंत्र स्वतः चे घर किंवा हाॅटेल नाहीत का? तसे डाॅक्टर बोरगे महोदय हे महापालिकेत कायमच वादग्रस्त ठरत आलेले आहेत. यापूर्वी सुद्धा त्यांचेवर कारवाई झालेली आहे तसेच अनेक नगरसेवक व लोकप्रतिनिधी यांचेबरोबर सुद्धा त्यांचे खटके उडाले आहेत.

शंकर मिसाळ यांनी तर आग विझवण्या ऐवजी आग लावण्याचाच कार्यक्रम केला आहे. वास्तविक पहाता मन,भावना या प्रत्येक माणसाला असतातच या बद्दल आमचे दुमत नाही. पण कोणती गोष्ट कुठं, कधी करावी याला पण काही मर्यादा असतात.समजा या तीनही लोकांच्या कुटुंबातील एखाद्या महिलेच्या बाबतीत अशी घटना घडली असती तर यांनी सहन केली असती का ? केवळ महिलेला दोष देऊन हे मोकळे झाले असते, आपण पुरूष आहोत म्हणून कसेही बेजबाबदार पणे वागायचे का?

आपल्या एका चुकी मुळे आपल्या सर्व कुटुंबातील व्यक्तीला चार लोकात खाली मान घालून जगावे लागते हे का लक्षात येत नाही. परंतु या तीनही लोकांनी आत्ता तरी महापालिका प्रशासन बदनाम केले आहे हे निश्चित झालं आहे. पुढं कोर्टात त्या केसचे काय होणार, या आरोपींना शिक्षा होईल का नाही हे काळच ठरविल. परंतु ब-याच वेळी असे नाजुक प्रकरणात कोर्टाचे बाहेरच अर्थपूर्ण तडजोडी होऊन मिटवामिटवी केली जाते.

जर खरोखरच जबरदस्तीने हे तीनही लोकं त्या महिलेच्या घरात घुसले असतील तर तसा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता आणि संबंधित महिलेची फिर्याद घेणे आवश्यक होते. या प्रकरणात सदर नर्स महिला सुद्धा सहभागी असल्याने तिलाही आरोपी करण्यात आले आहे. या महिलेला आपल्या पोटच्या पोरा पेक्षा हे अधिकारी व कर्मचारी महत्वाचे वाटले आणि म्हणून तीने सुद्धा मुलाला मारहाण केली, त्यामुळे माता न तु “वैरीण” असे म्हटलं तर काही वावगे ठरणार नाही.

याचाच सरळ अर्थ असा की सदरचा नाजुक  प्रकार जबरदस्तीचा नाही तर एकमेकांचे सहमतीचा असावा असे वाटते. परंतु चाईल्ड लाईन व त्या मुलाच्या तक्रारी वरून आरोपीवर फक्त जामीनपात्र गुन्हाच दाखल करण्यात आल्याचे समजते. याचाच अर्थ या तीनही आरोपींना कोणीतरी अधिकारी आणि पदाधिकारी पाठीशी घालत आहेत असाच होतो. वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या पदावरील अधिकारी यांनी असे कृत्ये करणेच गैर आहे. या प्रकारामुळे अहमदनगर महापालिकेत खळबळ उडाली आहे.

वास्तविक या सर्व आरोपींना निलंबित केले पाहिजे. वास्तविक पाहता या  समाजात खुप चांगले काम करणारे आणि रूग्णाची काळजी घेऊन सेवा करणारे अनेक चांगले डाॅक्टर व नर्स व हाॅस्पिटल आहेत. या अशा प्रकारचे काही चुकीचे वागणारे डाॅक्टर मुळे इतर चांगले डाॅक्टर सुद्धा विनाकारण बदनाम होतात. अर्थात असे झारीतील शुक्राचार्य फक्त डाॅक्टर व्यवसायातच नाहीत तर समाजातील प्रत्येक क्षेत्रात असे काही महाभाग आहेतच. कधी कधी कामाचे ठिकाणी महिलेचे लैंगिक शोषण होते तर कधी वरिष्ठ अधिकारी शोषण करतात.अशा घटना अनेक ठिकाणी घडताना दिसतात. काही ठिकाणी महिलेकडून पुरूषांना ब्लॅकमेल केले जाते तर काही

ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आपल्या पदाचा दुरूपयोग करून महिलांना त्रास देतात. पण कधी कधी सहमती असताना ठेवलेले रिलेशन हे दुसरे कुणी पाहिले तर त्याचे रूपांतर जबरदस्ती मध्ये केले जाते हे वाईट आहे. मग अशा लोकांचे  चुकीचे वगणे इतर सर्वांसाठी मारक व धोक्याचे ठरते , त्यामुळे असे बेजबाबदार अधिकारी आणि पदाधिकारी यांना पाठीशी न घालता यांचा खरा चेहरा समाजासमोर आणलाच पाहिजे, या मध्ये सर्व समाजसेवी संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे. त्यामुळे महापालिकेच्या या नाजुक प्रकरणात नेमकं काय झालंय याचा व्यवस्थित तपास करून त्या लहान मुलाच्या जिवितास धोका होणार नाही याची काळजी मा पोलिस प्रशासन यांनी घ्यावी हि विनंती.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button