ब्लॉग – थोडंसं मनातलं…जिल्हयातील कोरोनाचा वाढता प्रसार आणि बेजबाबदार लोकांची बेफिकीरी ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रांनो 
सध्या देशात करोना नावाचा व्हायरस संपूर्ण देशभर थैमान घालतोय आणि त्याची धग देशातील सर्व राज्यात पसरली आहे. कोरोना प्रदुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पाचव्यांदा 31जुलै  2020 पर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला आहे. तसेच कालच मा जिल्हाधिकारी साहेब यांनी सायंकाळी 7 ते सकाळी 5 या वेळेत जमावबंदीचे कडक आदेश दिले आहेत आणि अहमदनगर च्या प्रत्येक पोलिस स्टेशन च्या हद्दीत चेक पोस्ट तयार केली आहेत व बेजबाबदार लोकांवर  नजर ठेवण्या साठी कारवाई करण्यासाठी  पथके तयार केली आहेत. त्याचाच परिणाम म्हणून काल पोलीसांनी अनेक लोकांचेवर कायदेशीर कारवाई करून दंड आकारला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्या साठी राज्य सरकारने संपूर्ण राज्यात जिल्हाबंदी चे आदेश पारित केले आहेत. त्यामुळे कोणालाही पास असल्या शिवाय आणि वैद्यकीय  तपासणी दाखला व अतिमहत्वांच्या कारणाशिवाय एका जिल्ह्यातुन दुस-या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी बंदी घातली आहे. तसेच कालच मा जिल्हाधिकारी साहेब यांनी नगर जिल्ह्यातील व शहरातील कोरोना ग्रस्तांसाठी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे पाहून सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांची महत्वाची आणि तातडीची  बैठक बोलावली होती. त्या बैठकीत सुद्धा काही महत्वाचे निर्णय घेतले गेले. सायंकाळी व संचारबंदी च्या काळात विनाकारणा रस्त्यावर फिरणारे, घोळका करून बसणारे, रस्त्यावर थुंकणारेवर आणि शासकीय नियमाचे उल्लंघन करणारे लोकांवर कडक कारवाई करून दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत.

वास्तविक पाहता ज्या भागात लोकांची गर्दी होते त्या भागातील सर्व व्यवहार काही दिवसासाठी बंदच केले पाहिजेत. शहरात भरणारा भाजीपाला बाजार बंद जरी करता आला नाही तरी कमीत कमी नियमाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.  अहमदनगर जिल्ह्यातील सर्व रस्त्यावरील सिमा चेक पोस्ट उभारून बंद केल्या आहेत. तरीही अहमदनगर जिल्ह्यातील गावागावात बाहेरुन लोक आलेच आहेत. परंतु आता शासनाने कठोर भूमिका घेतली आहे याची जाणीव असू द्या. अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील  अनेक पाहुण्यांनी कोरोनाचा चांगलाच प्रसार केल्याचे दिल्याचे दिसुन आले आहे. कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांनी कशी काळजी घ्यावी या बाबतीत  शासनाने  याची सूचना वेळोवेळी दिलेल्या आहेत. तसेच वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली आहे.

परंतु स्थानिक लोक साथ देत नाहीत त्यामुळे प्रशासनाने अनेक ठिकाणी सरपंचावर नोटीस बजावली आहे.  परंतु ते तरी काय करणार? नाते गोती तोडता तर येत नाही तसेच काही  जावाई बापुना नाराज करणे सुद्धा काही सासरे मंडळीना अवघड जात आहे. त्यामुळे पुणे, मुंबई आणि इतर जिल्ह्यात नोकरी साठी असणारे नातेवाईक सध्या गावाकडे आपल्या पाहुण्या कडे येतात. परंतु चेक पोस्ट वर  त्यांची कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी केली जात नाही याचा “अर्थ” काय समजावा. किंवा ते लोकं गावात आल्यावर रितसर त्यांना 14 दिवसासाठी कोरांनटाईन केले जात नाही, आणि त्यामुळेच अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांसाठी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता तर जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांसाठी संख्या 500 चे वर गेली आहे.

तसेच रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सुद्धा चांगले आहे ही सुद्धा दिलासा देणारी बाब आहे.  अहमदनगर सध्या नाॅन रेड झोन मध्ये आहे. परंतु तरीही शहरातील जवळपास सहा भागात व उपनगरात काही भाग कंटेनमेंट झोन व बफर झोन म्हणून जाहीर केला आहे व सिलबंद केला आहे. प्रत्येक गावात किंवा शहरात मुंबई आणि पुणे येथील पाहुणे रावळे  किंवा जावाई यांना आश्रय दिला जातो. अर्थात आश्रय देणे आवश्यक आहे आणि त्यात चूक पण काही नाही. परंतु शासकीय आदेश पाळूनच काही पाहुणे आले तर त्यांना घरी ठेवायला हरकत नाही. आता प्रश्न पडतो की बाहेरून आलेल्या लोकांना कोणी अटकाव करायचा?

तसेच गावातील स्थानिक पातळीवर कोणी रोष ओढून घ्यायचा? हे आणि असे अनेक प्रश्न निर्माण होतात. अनेक वेळा भांडण तंटा सुद्धा होतो. तशा स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आहेत.  आता तर गावात बाहेरची मंडळी आलीतर सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी तंबी प्रशासनाने दिली आहे. वास्तविक पहाता अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सिमा आणि येणारे जाणारे रस्त्यावर चेक पोस्ट उभारली आहेत. त्या ठिकाणी पोलिस आणि इतर काही कर्मचारी ड्यूटी करतात. मग बाहेरच्या जिल्ह्यातील लोक अहमदनगर जिल्ह्यात येतातच कशी हा सुद्धा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुणे मुंबई आणि इतर जिल्ह्यातील लोकांना अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावात कोणाचे आदेशाने चेक पोस्ट वरील पोलिस सोडतात?

खरं तर अहमदनगर शहर व जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांसाठी संख्या ही बाहेरून आलेल्या लोकामुळेच वाढलेली आहे हे सत्य सुद्धा नाकारता येणार नाही अशा स्वरूपाच्या बातम्या अनेक वर्तमानपत्रात वाचायला मिळाल्या आहेत. बर बाहेरचा व्यक्ती गावात  आल्या नंतर त्याची माहिती गुप्त ठेवली जाते. त्या व्यक्तीला नियमानुसार कोरांनटाईन केले जात नाही किंवा त्यांना सरकारी दवाखान्यात तपासणी साठी पाठविले जात नाही. आणि या बेजबाबदार वागण्याचा तोटा सर्व जनतेला सहन करावा लागतो. त्यामुळे सरपंचावर गुन्हा दाखल करण्यापेक्षा ज्यांनी त्यांचेकडे आलेल्या पाहुण्यांना लपवून ठेवले आणि प्रशासनाला माहिती दिली नाही त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे व दंड आकारला पाहिजे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे.

तसेच चेक पोस्टवर ड्यूटी करणारे पोलिस यांना सुद्धा जबाबदार धरले पाहिजे. जर चेक पोस्टवर कडक पहारा असताना लोक जिल्ह्यातील गावाकडे येतातच कसे याकडे पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांनी लक्ष दिले पाहिजे. कामचुकारपणा करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचेवर कारवाई केली पाहिजे. काही लोक दादागिरी करतात तर काही लोक राजकीय दबाव निर्माण करतात. त्यामुळे अनेक पाहुण्यांना आश्रय दिला जातो. अशा बेजबाबदार लोकांना सुद्धा कायद्याचा वचक दाखवलाच पाहिजे.अहमदनगर जिल्ह्यात येणारे बाहेरचे लोक चेक पोस्टवर काही तरी “अर्थपुर्ण” जुगाड करूनच आल्यामुळे कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत आहे. प्रशासनाने याची दखल घेणे आवश्यक आहे.

फक्त गुन्हे दाखल करून हा प्रश्न सुटणार नाही तर दंड आकारला पाहिजे . आणि त्या साठी बाहेरून येणारे लोकांची प्रथम व्यवस्थित पणे सरकारी दवाखान्यात  कोरोना ची तपासणी करणे गरजेचे आहे.तसेच ज्या गावात असे नागरिक आले असतील त्यांना कोरांनटाईन केले पाहिजे त्या साठी सरपंच,  गावकरी आणि संबंधित अधिकारी यांना अधीकार दिले पाहिजे असे वाटते.कोरोना हा संसर्गजन्य विकार आहे. यासाठी सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर आणि नियम पाळले पाहिजेत.लाॅकडाऊन व जमावबंदीचे च्या काळात सुद्धा अनेक  बेजबाबदार लोकांनी शासकीय नियमाचे बिनधास्त पणे उल्लंघन केल्याचे दिसून आले. काही वेळा लाॅकडाऊन शिथील केल्या नंतर लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला.

आणि आजही गैरफायदा घेतच आहेत. शेवटी प्रशासनाने तरी कुठपर्यंत लोकांना समजून सांगावे.  लोकांना उपासमारीच्या संकटांना सामोरे जाऊ लागू नये म्हणून सरकार आणि जिल्हा प्रशासन यानी अनेक बाजारपेठा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. तसेच काही छोटे मोठे  उद्योग व्यवसाय सुरू होत केले आहेत. त्यामुळे निश्चितच लोकांना रोजगार मिळेल याची काळजी सरकारने घेतली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील रूग्ण दररोज वाढतच आहेत त्या साठी आपण योग्य ती काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे. पाहुणे रावळे आणि जावई आले असतील तर त्यांची तपासणी केली पाहिजे.

कोरोनाचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. आपण सुरक्षित रहावे म्हणून पोलिस प्रशासन, लोकप्रतिनिधी, सफाई कामगार, महापालिका प्रशासन, डाॅक्टर आणि नर्स, पत्रकार मंडळी, शिक्षक मंडळी, सामाजिक संस्था आणि समाजसेवक आपला जीव धोक्यात घालून सर्व शासकीय अधिकारी काम करतात याची जाणीव नागरिकांनी ठेवावी अशी अपेक्षा आहे. तसेच अनेक कोरोना योद्धे बळी गेले आहेत याची जाणीव आता आपणच ठेवली पाहिजे.

आता सरकारने लोकांना अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करण्यासाठी परवानगी देऊ नये.अनेक लोक वेगवेगळ्या क्लुप्ती वापरून गावाकडे येतातच. परंतु येताना कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नाही. हे असंच चालू राहिलं तर अजून किती तरी लोकांना या कोरोना महामारी ला बळी पडावे लागेल यात शंकाच नाही. त्यामुळे पाहुणे मंडळी ना नम्र विनंती आहे की, कृपया आपली तपासणी करूनच आपल्या गावाकडे यावे.

आपणचं आपल्या कुटुंब आणि नातेवाईकांना अडचणीत आणत आहोत याची जाणीव लोकांनी ठेवावी अशी अपेक्षा आहे.  बाहेर गावी नोकरी व शिक्षण, तसेच व्यवसाय निमित्ताने गेलेल्या लोकांना आपल्या मुळ गावी येऊन राहण्याचा पुर्णपणे  अधिकार आहे. तुम्हाला कोणी रोखणार नाही, परंतु तुम्ही सगळ्या चाचण्या आणि तपासणी करूनच गावाकडे यावे हिच अपेक्षा आहे.

त्यामुळे प्रशासनआणि पोलिस प्रशासन यांचे आदेश काटेकोर पालन करावे ही नम्र विनंती. आपल्या परिसरात नवीन संशयास्पद कोणी आढल्यास प्रशासनाचे निदर्शनास आणून दिले पाहिजे असे वाटते.आता राग द्वेष मनात ठेवून चालणार नाही. आपले जीवन वाचवण्यासाठी आपणच जबाबदारी घेतलीच पाहिजे.  प्रशासन आपल्या सोबत आहे. घरीच रहा सुरक्षित रहा.

ॲड शिवाजी अण्णा कराळे पाटील 
सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर 
99 22 545 545

Leave a Comment