Best Sellers in Electronics
Breaking

थोडंसं मनातलं : आता काय कोरोना बरोबरच जगावे लागते की काय कुणास ठाऊक ” ?

ॲड शिवाजी अण्णा कराळे

नमस्कार मित्रहो
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची वाढती संख्या आणि बेजबाबदार लोकांचे वर्णन बहुतेक कोरोना बरोबरच जगायला लावील अशी शक्यता आता नाकारता येत नाही. अहमदनगर मध्ये सध्या कोरोना बाधीत लोकांचे उपचारासाठी पुरेशी व्यवस्था निर्माण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. सध्या सरकारी दवाखान्यात पुरेसे व्हेंटीलेटर नाहीत तसेच पुरेसे बेड पण मिळत नाहीत. एक मात्र चांगले झाले की, आता रूग्णांची कोरोना संदर्भातील वैद्यकीय तपासणी सरकारी दवाखान्यातच होते.असे असतानाच अनेक पाहुणे मंडळीनी कोरोनाचा वाणोळा दिल्याचे दिसुन आले आहे. काही लोकांनी तर पुणे मुंबई आणि इतर जिल्ह्यात नोकरी साठी असणारे नातेवाईक आपल्या कडे आल्याचे लपवून ठेवले.

त्यावर गावातील सरपंच अथवा दक्षता समिती यांनी विचारणा केली तर आपसात भांडण तंटा सुद्धा झाला आहे. आता उद्या पासून हाॅटेल आणि लाॅज सुरू होणार आहेत अशी घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे आता नाईट लाईफ पुन्हा सुरू होऊ शकते. हाॅटेल चा धंदा हाच मुळात रात्री जास्त उशिरापर्यंत चालतो. तसेच शहरातील बेकायदेशीर व्यवसाय करणारे लाॅज चे दिवस पण चांगले येतील. अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील सर्व व्यवहार व व्यवसाय हे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. मग असे असतानाच अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन व महापालिका प्रशासन यांनी कठोर केलेल्या संचारबंदीचे काय होणार?

म्हणजे पुन्हा एकदा सर्व नियम धाब्यावर बसवायचे आणि व्यवसाय करायचे असे म्हटलं तर काही वावगे ठरणार नाही. हाॅटेल व लाॅजिंग व्यवसाय सुरू करण्या बाबत सर्व सामान्य जनतेची कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. ते व्यवसाय पण सुरू झाले पाहिजेतच, कारण हाॅटेल व लाॅजिंग व्यवसाय यावर अनेक कुटुंब अवलंबित आहेत हे पण सत्य आहे. परंतु फक्त सध्याची कोरोनाची परिस्थिती पहाता हाॅटेल व लाॅजिंग सुरू करणे अवश्यकच होते का हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झाला आहे. अगोदरच कोरोनाच्या वाढत्या संक्रमणा मुळे अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील सर्व जनता हैराण झाली आहे.

तशातच गेल्या दोन तीन महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने वाढत जाणारा लाॅकडाऊन आणि लोकांची बिघडलेली अर्थिक घडी व्यवस्थित कधी होणार हे अनिश्चित आहे. अजून सुद्धा पुर्णपणे सर्व व्यवहार, व्यवसाय आणि दुकाने सुरू झाली नाहीत. अशी पार्श्वभूमी असतानाच दररोज वाढतच जाणारी कोरोना ग्रस्तांची संख्या ही सुध्दा डोकेदुखी ठरत आहे. अहमदनगर शहरातील जवळपास सहा भागात कंटेनमेंट झोन व बफर झोन म्हणून जाहीर केला आहे व सिलबंद केला आहे. कोरोना प्रदुर्भाव टाळण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी कठोर भूमिका घेतली आहे आणि रात्री संचारबंदी कठोर केली आहे.

परंतु आता हे हाॅटेल आणि लाॅज सुरू झाले तर रात्री ची गर्दी पुन्हा पुर्वीच्या प्रमाणे सुरू होईल आणि निश्चित कोरोनाचाप्रसार होऊ शकतो. प्रत्येक हाॅटेल व लाॅजिंग मध्ये शासकीय नियमाचे काटेकोर पालन केले जाते की नाही हे कोण तपासणी करणार? मग आता पोलिस प्रशासन यांनी इतर सर्व शासकीय कामं सोडून दररोज फक्त हाॅटेल व लाॅजिंग यांचीच तपासणी करायची का? या प्रकरणात अनेक मोठी अर्थिक तडजोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन व महापालिका प्रशासन यांनी यांनी बाबतीत योग्य भूमिका घेतली पाहिजे.

सध्या देशात करोना नावाचा व्हायरस संपूर्ण देशभर थैमान घालतोय. त्याची बरीच झळ अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील लोकांना बसली आहे. ज्या शहरात एकही कोरोना बाधीत नव्हता तिथे आज पाचशे च्या वर संख्या वाढत गेली आहे. त्याला जबाबदार सुद्धा जनताच आहे. जनतेला कोरोना हा खुप सोपा वाटला त्यामुळे जनतेने बिनधास्त पणे सर्व शासकीय नियमाचे उल्लंघन केले. वास्तविक लाॅकडाऊन शिथिल केल्याचा गैरफायदा पण घेतला आहे. अनलाॅकडाऊन मध्ये जवळपास सर्व व्यवसाय सुरू झाले. लोकांना रोजगार मिळाला आणि त्यांची उपासमार थांबली. पण हे फार दिवस टिकले नाही. बेजबाबदार लोकांनीच बेकायदेशीर व्यवसाय केले आहेत आणि त्याचा परिणाम सर्व सामान्य लोकांना झाला आहे आणि होत आहे.

आता सरकारने पर्यटन स्थळे सुरू झाली म्हणजे त्यांचा धंदा होईल असे जाहीर केले आहे. परंतु त्याचे दुष्परिणामांचा सामना करावा लागेल याची जाणीव असू द्या. वास्तविक पहाता अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी प्रशासन खुप चांगले काम करत आहे. तरीही केवळ आणि केवळ जनतेच्या बेफिकीरीने वागणूकी मुळेच कोरोनाचा प्रसार झाला आहे. आता तर अशी भिती वाटायला लागली आहे की, येथून पुढे कोरोना सोबत जगावे लागते की काय कुणास ठाऊक. कारण आता पोलिस प्रशासन व महापालिका प्रशासन कोरोना प्रदुर्भाव टाळण्यासाठी जनजागृती करून आणि दररोज केसेस करून थकलं आहे. आता कठोर पर्याय म्हणून कदाचित औरंगाबाद शहराचे धर्तीवर काही दिवस कर्फ्यु लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकांना उपासमारीच्या काळात अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था तसेच प्रशासन यांनी अन्नधान्याची मदत केलीच आहे. जर सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन आणि सवलती देऊन सुद्धा जर काही बेजबाबदार लोकच ऐकतच नसतील तर कदाचित प्रशासन आणखी कठोर भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजुनही वेळ गेलेली नाही. जनतेनी आपलाच जीव वाचवण्यासाठी नियमानुसार वर्तन करणे गरजेचे आहे. तसेच पोलिस प्रशासन आणि आरटीओ यांनी संयुक्तिक मोहीम राबवून दिवसभर रस्त्यावर विनाकारण फिरणारे वाहने यांचे बाबतीत कडक कारवाई करून दंड आकारला पाहिजे असे वाटते. आता सुद्धा कित्येक ठिकाणी ट्रॅफिक जॅम झाले होते. जनता सुरक्षित रहावी म्हणून अनेक कोरोना योद्धे बळी गेले आहेत याची जाणीव आता आपणच ठेवली पाहिजे.

तसेच आजही अनेक कोरोना योद्धे आपला जीव धोक्यात घालून कामं करत आहेत याची जाणीव आता आपणच ठेवली पाहिजे. आणि जर आपणच नियमाला हरताळ फासणार असाल तर काही दिवसातच प्रत्येक घरोघरी कोरोना बाधीत रूग्ण सापडतील आणि आपल्या परिवाराला कोरोना बरोबरच जगावे लागणार आहे हे सुद्धा नाकारता येणार नाही. त्यामुळे नागरिक हो अजुन ही भय संपले नाही याची जाणीव असू द्या. शासकीय आदेश पाळूनच कामं धंदा, व्यवसाय, नोकरी व मोलमजुरी करण्यासाठी घराबाहेर जावे अन्यथा घराबाहेर पडू नये हि हात जोडून नम्र विनंती आहे. घरीच रहा सुरक्षित रहा. धन्यवाद

ॲड शिवाजी अण्णा कराळे
सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर
99 22 545 545

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button