Breaking

थोडंसं मनातलं…. घर दोघांचं असतं,दोघांनी सावरायचं असतं…. ॲड शिवाजी कराळे 

Best Sellers in Electronics

नमस्कार मित्रहो 
कोविड-19 मुळे सध्या संपूर्ण देश वेगवेगळ्या संकटांना सामोरे जात आहे. मार्च महिन्यापासून देशभर लाॅकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील जवळपास  सर्व व्यवहार व व्यवसाय पुर्णपणे बंदच ठेवले होते. त्यामुळे सर्व सामान्य जनतेला त्रास झाला आणि त्यांची अर्थिक घडी विस्कळीत झाली होती. परंतु जसजसा कोविड-19 आटोक्यात येऊ लागला तसतसे सरकारने काही अटी शर्तीवर उद्योग व्यवसाय, बाजारपेठा, कंपन्या, इतर छोटे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व शहरातील लोकांना “दिलासा” मिळाला आहे.
आता कुठे तरी जनतेचे जनजीवन सुरळीतपणे चालू होईल यात शंकाच नाही. लाॅकडाऊन च्या काळात अनेक लोक बेरोजगार झाले,तर काहींची हातावर पोट आहेत त्यांना अर्थिक अडचणींचा फटका बसला आहे. जवळपास सर्वच कामगार, नोकरदार , मोलमजुरी करणारे, व्यावसायिक, व्यापारी आपापल्या घरीच बसून होते. त्यामुळे प्रत्येक घरातील कामवाली मावशी कामाला येत नसल्याने घरातील महिलांनाच घरकामा बरोबरच स्वयंपाक, धूणे भांडे हे कामे सुद्धा करावी लागली. त्याच बरोबर प्रत्येक सदस्यांच्या आवडी निवडी सुध्दा जपाव्या लागल्या. घरात दिवसभर सगळे एकदम एकत्रित जमा होत असल्याने त्यांचेत कधी “सुसंवाद” तर कधी फक्त “वाद” च निर्माण झाले. ते वाद इतके झाले की, घरातील कोर्टात आणि पोलिस स्टेशनला गेले. अनेक महिलांनी पती आणि त्याचे वृध्द आई वडील आणि घरातील इतर सदस्यावर “घरगुती छळ” केला म्हणून दिलासा सेंटर आणि पोलिस स्टेशनला तक्रारी दाखल केल्या आहेत.
त्यामुळे घरातील लहान मुलांना त्याचे परिणाम भोगावे लागले. काही महिलांनी ख-या तक्रारी केल्या तर काहीनी विनाकारण त्रास देण्यासाठी तक्रारी दाखल केल्या. या तीन महिन्यातील लाॅकडाऊन च्या काळात खरं तर एकमेकांना समजून घेतले पाहिजे होते. आपल्या घरातील नोकरी धंदा करणारे पुरूष माणसं केवळ आणि केवळ कामधंदा सुरू नसल्यानेच घरी बसून होते. परंतु तरीही ते आपले कुटुंब उपाशी रहाणार नाही याची काळजी घेत होतेच. तरीही त्यांना दररोज टोमणे ऐकावे लागत होते. त्यामुळे त्यांनी सुद्धा पत्नीच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. तसेच जवळपास 40% पुरुष विनाकारण आपल्या पत्नीला वेगवेगळ्या स्वरूपात त्रास देत होते ही बाब सुद्धा समोर आली. वास्तविक घरातील महिलांना घरात किती कामं असतात हे या लाॅकडाऊन च्या काळात अनेक पुरूषांना  समजले असेलच.
आपसातील प्रेम हे माणसं जवळपास असली की कळत नाही आणि माणसं दूर गेली की विनाकारण एकटं एकटं वाटतं हा माणसाचा स्वभावच असतो. तसंच काहीसं लाॅकडाऊन च्या काळात अनेक कुटुंबातील लोकांचे बाबतीत घडले. वास्तविक पहाता लाॅकडाऊन चा काळ सुसह्य होणारा नसला तरी सर्व कुटुंबातील व्यक्ती एकत्रित येऊन विचाराची देवाणघेवाण करून सुसंवाद साधून गोडीगुलाबीने रहाण्याचा होता. परंतु अनेक ठिकाणी महिलांवर घरगुती छळ झाले अशा प्रकारच्या बातम्या वाचनात आल्या. काही कुटुंब अगदी टोकाची भूमिका घेउन घटस्फ़ोट घेण्यापर्यन्त गेले तर काही कुटुंबीय आपसातील वाद विसरून पुन्हा एकत्रित आले. लाॅकडाऊन च्या काळात काही वाद हे अर्थिक समस्या निर्माण झाल्या म्हणून झाले तर काही विनाकारणच झाले.

मी पुरूष हक्क संरक्षण समिती चे काम करत असल्याने अनेक पुरूषांनी आमचे समितीकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु आम्ही कुटुंब तोडण्या पेक्षा कुटुंब जोडण्यात यशस्वी झालो आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. खर तर आपल्या घरातील वाद आपणच मिटवले पाहिजेत. पुर्वी लोक नेहमीच म्हणायचे की, “कोर्ट कचेरी आणि दवाखान्याची पायरी चढायची वेळ दुश्मनांवर सुद्धा येऊ नये”. पुर्वी सर्रासपणे एकत्रित कुटुंब पद्धती होती त्यामुळे नातवंडांना आजी आजोबा चे प्रेम आणि शिकवण मिळत होती. कुठल्याही संकटांना सामोरे जाण्याची ताकद त्या एकत्रित कुटुंबात निर्माण होत होती. आता मात्र चित्र उलटंच बघायला मिळतय. मुलीच्या संसारात आईचा हस्तक्षेप जास्त वाढला, तसेच सासुसासरे म्हणजे “डस्टबीन” आहेत अशी संकल्पनाच झाली.
त्यामुळे “तो” आणि “ती” एकटेच रहायला लागले आणि कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले गेले. खरोखरच ज्या आईवडीलांनी कष्टाने आपल्या मुलांना वाढवले असते त्याच आईवडिलाना सुनेच्या हट्टापायी मुलाला सोडून एकाकी जीवन जगावे लागते. परंतु काही मुली सुद्धा खुपच चांगला संसार सुखाचा करतात. त्यांना एकत्र कुटुंबात रहायला आवडते तसेच नव-या कडील आणि माहेर कडील सर्व लोकांना एकत्र आणते. म्हणजेच समाजात फक्त मुलीच चुकीचे  वागतात असे नाही तर कधी कधी पुरूष पण चुकतातच. पण समाजात “मिटविणा-या” पेक्षा “पेटविणा-यांची” संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणुन काही समाजसेवी संघटना किंवा ज्यांना कायदाच समजत नाही असे काही पारावर बसून गप्पा करणारे लोक आणखीनच “तेल” घालतात आणि त्याचा परिणाम म्हणून दोघांना ही कोर्टात चकरा मारतच जीवन जगावे लागते.
सध्या मोबाईल मुळे अनेक कुटुंबातील लोकं एकमेकांना विसरून चालले आहेत. घरातील प्रत्येक व्यक्ती जवळ मोबाईल असल्याने जो तो मोबाईल मध्ये गुंतवून जातो. त्यामुळे अनेक कुटुंबातील लोकं “अबोल” झाली आहेत एकमेकांना चिडचिड करत आहेत. आणि त्याचाच परिणाम म्हणुन कुटुंब व्यवस्था बिघडायला लागली आहे आणि सतत आपसात विनाकारण गैरसमज निर्माण होत आहेत. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींना समजून घेतले पाहिजे. तसेच घरातील सुसंवाद आणि विश्वास वाढला पाहिजे तरच कुटुंब पद्धती टिकेल नाहीतर कुटुंब व्यवस्था बिघडायला वेळ लागणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. एक गोष्ट मात्र निश्चितच आहे की, ” घर दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं असतं, एकानं पसरविलं तर दुस-यानं आवरायचं असतं”
अजूनही कोविड-19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आला नाही. सरकारने टप्प्याटप्प्याने लाॅकडाऊन व संचारबंदी शिथील केली आहे. त्यामुळे आता लोकं कामंधंदा करण्यासाठी घराबाहेर जात आहेत म्हणून “कौटुंबिक कलह” काही प्रमाणात का होईना पण कमी झाले आहेत, आणि ते कलह कायमच कमी व्हायला पाहिजेत अशीच अपेक्षा आहे. धन्यवाद.
ॲड शिवाजी अण्णा कराळे
सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button