Ahmednagar NewsSpacial

देह व्यापार सोडून ‘त्यांनी’ जपली सामाजिक बांधिलकी!

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- देह व्यापार सोडून या महिलांनी आता मास्क तयार करून त्यांची विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केलाय. करोनावर मात करत जीवन जगायचं, असा महत्वपूर्ण संदेश देहव्यापार करणाऱ्या महिलांनी दिला आहे.

मास्क तयार करून करोना योध्यांना त्यांनी मोफत दिले. नंतर मात्र हे मास्क स्नेहालय संस्थेत माफक दरात विक्रीसाठी ठेवण्यात आले.

देह व्यापाराचा मूळ व्यवसाय सोडून अत्यल्प आणि बिनभरवशाचे उत्पन्न असलेल्या वेगळ्या व्यावसायिक विश्वात पाऊल ठेवत या महिलांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

कोपरगावातून सुरू झालेले हे ‘न्यू नॉर्मल’ आता नगरपर्यंत पोहोचलं आहे. करोनावर मात करून जगायला शिकायला हवं, हे देहव्यापार करणाऱ्या क्षेत्रातील महिलांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय.

स्थानिक प्रशासनाने काही व्यावसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सुरक्षित अंतर ठेवावे, मास्कचा वापर करावा, असे काही प्रमुख नियम आहेत. मात्र या महिलांचा व्यवसाय असे नियम पाळून करणं शक्यच नाही.

मुळात या व्यावसायात एरवी उपेक्षित, शोषित आणि इतर सर्व मार्ग बंद झालेल्या महिलाच आलेल्या असतात. इतरवेळीही त्यांचा जगण्याचा संघर्ष सुरूच असतो. करोनानं मात्र, त्यांचा हा संघर्षही करण्याचा मार्गही हिरावून घेतला आहे.

नव्या नियमांनुसार त्यांचा जुना व्यवसाय करणं आता अशक्य झालं आहे, त्यामुळं त्यांच्यासह त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचीही उपासमार होत आहे.

म्हणूनच कोपरगावमधील या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी आपला व्यवसायच बदलण्याचं ठरवलं. सध्याच्या काळात गरज असलेले मास्क त्यांनी बनवायला सुरवात केली.

समाजाकडून त्यांची उपेक्षा होत असली तरी त्यांनी सतत सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवली आहे. जेव्हा जेव्हा देशावर अपत्ती येते, तेव्हा या महिलाही मदतीला आपला खारीचा वाटा घेऊन धावून येतात.

आपल्या एक दिवसाची कमाई त्या मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान सहायत्ता निधीसाठी देतात. यावेळीही त्यांना अशी मदत करायची होती, पण त्यांचाच व्यवसाय बंद. त्यामुळं नव्यानं सुरू केलेल्या व्यावसायातून त्यांनी हे सामाजिक कार्य साधलं.

पहिल्या टप्प्यात तयार केलेले सुमारे ३५० मास्क त्यांनी कोपरगाव तालुक्यातील खासगी सरकारी कर्मचाऱ्यांना मोफत दिले. ग्रामीण रुग्णालय, प्रयोगशाळा, खासगी कर्मचारी यांना मास्कचे वाटप करण्यात आलं.

आता या महिलांनी तयार केलेले मास्क माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोपरगावच्या महिलांचा हा उपक्रम इतर ठिकाणीही स्वीकारला जाऊ लागला आहे.

नगरमध्येही महिलांच्या एका गटानं मास्क निर्मिती सुरू केली आहे. उत्कृष्ट दर्जाचे हे मास्क असून या महिलांच्या नव्या रोजगाराला हातभार लावण्यासाठी नागरिकांनी ते खरेदी करावेत, असं आवाहन स्नेहालयाच्या संघटक ज्योती वाघमारे, माधुरी वाघ, अलका गायकवाड यांनी केलंय.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button