Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingCorona Virus Marathi News

गणेशोत्सव आणि बकरी ईद साधेपणाने साजरे करण्याचे जिल्हा पोलीस दलाचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- अहमदनगर 19 जुलै – कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात गणेशोत्सव आणि बकरी ईद सण साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी केले आहे.

कोरोना संसर्गाच्या वाढत चाललेल्या केसेस विचारात घेता गणेशोत्सव व बकरी ईद अतिशय साधे पद्धतीने साजरे करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे आणि मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

त्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.

कोविड -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महानगरपालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडप बाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावे.

यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.

श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता 4 फूट व घरगुती गणपती 2 फुटांच्या मर्यादित असावी. यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे.

मूर्ती शाडूची/ पर्यावरण पूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे.

गणेश मूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनाचे वेळी किंवा 2021 भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळी करता येणे शक्य आहे.

जेणेकरून आगमन/ विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतः व कुटुंबीयांचे कोरोना साथीच्या रोगांपासून रक्षण होईल. उत्सवा करिता वर्गणी/ देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा.

जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

सांस्कृतिक कार्यक्रम ऐवजी आरोग्यविषयक उपक्रम/ शिबिरे उदा. रक्तदान शिबिरे आयोजन करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता या बाबत जनजागृती करण्यात यावी.

आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनिप्रदूषणाच्या संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.

श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक द्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.

प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे ( फिजिकल डिस्टन्सिंग) तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. श्री गणेशाचे आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नये.

विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीने विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे.

संपूर्ण चाळीतील/ इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी.

कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.

तसेच यानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्याचे देखील अनुपालन करावे. गणेशोत्सवाप्रमाणे बकरी ईद साजरी करताना पुढील नियमांचे पालन करावे.

कोविड -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात व जिल्ह्यात सर्व धार्मिक कार्यक्रमास बंदी आहे. त्या अनुसरून बकरी ईदची नमाज मस्जीद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी आपले घरीच साजरी करावी.

सध्या कार्यान्वित असणारे जनावरे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास ऑनलाइन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरून संपर्क करून जनावरे खरेदी करावी.

नागरिकांनी शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करावी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही. बकरी ईद निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.

कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने व स्थानिक प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. जिल्ह्यातील नागरिकांनी या सूचनांचे काटेकोर पद्धतीने पालन करावे, असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button