Ahmednagar NewsCorona Virus Marathi News

अहमदनगर ‘कोरोनामुक्ती’साठी आता हे मिशन

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- कोरोनाच्या लढाईत भारतीय जैन संघटना मैदानात उतरली असून, 1 ऑगस्टपासून ‘मिशन झिरो अहमदनगर’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. भारतीय जैन संघटना, जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार असून, बाजारपेठा तसेच कन्टेन्मेंट झोनमध्ये अधिकाधिक कोरोनाच्या अँटीजेन टेस्ट केल्या जाणार आहेत.

या टेस्ट पूर्णपणे मोफत केल्या जाणार असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य आदेश चंगेडिया व शहर अध्यक्ष प्रशांत गांधी यांनी दिली आहे. कोरोनामुक्त अहमदनगर हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भारतीय जैन संघटनेने प्रशासनाच्या सहकार्याने अधिकाधिक नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

त्यानुसार भारतीय जैन संघटनेच्या व्हॅन कन्टेन्मेंट झोन आणि बाजारपेठेत उभ्या राहणार आहेत. या व्हॅनमध्ये अँटीजेन कीट ठेवण्यात येणार असून, बाजारपेठेत गेल्यानंतर ज्यांना कोरोनाची काही लक्षणे जाणवतात त्यांनी टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले जाणार आहे.

त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले जाणार आहे. त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले परंतु कोणतीही लक्षणे जाणवत नसलेल्या म्हणजेच बाधिताच्या एक-दोन दिवसांपूर्वी संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही या उपक्रमात अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे.

ज्या-ज्या नागरिकांना काही लक्षणे जाणवतात अथवा जाणवत नसले तरी ते बाधितांच्या संपर्कात आलेले असल्यास त्यांची जागेवरच अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे. टेस्टसाठी येणार्‍या प्रत्येकाचे प्रथम स्कॅनिंग करून त्याच्या तापाचे रिडींग घेतले जाणार आहे. त्यानंतर त्याची अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे.

या टेस्टचा रिपोर्ट लगेचच म्हणजे तासाभरातच मिळणार असल्याने बाजारपेठेत ‘झिरो पेशंट’चे उद्दिष्ट साध्य करता येणार आहे, असे आदेश चंगेडिया यांनी सांगितले. आज बरेच लोक कोरोना टेस्ट करण्यास घाबरतात. त्यामुळे ते पॉझिटिव्ह असले तरी टेस्ट न झाल्याने इतरत्र फिरत राहिल्यास कोरोना प्रादुर्भाव अधिक वाढत जातो.

‘मिशन झिरो अहमदनगर’च्या माध्यमातून संभाव्य कोरोना रुग्णाची वेळीच टेस्ट केली जाणार असल्याने बाजारपेठेत त्यांच्यापासून पसरणारा कोरोना थांबवता येणार आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणी जाऊन रांगेत उभा राहून पैसे खर्च करून टेस्ट करण्याचा उपद्व्याप टळणार आहे.

कन्टेन्मेंट झोन आणि बाजारपेठेत अँटीजेन टेस्ट केल्यास कोरोनाला पसरण्यापासून थांबवता येणार असल्याने भारतीय जैन संघटनेने हा उपक्रम हाती घेतला आहे. 1 ऑगस्टपासून या उपक्रमाचा शुभारंभ होणार असून सुरुवातीला जैन संघटनेच्या तीन व्हॅन बाजारपेठा आणि कन्टेन्मेंट झोनमध्ये उपलब्ध केल्या जाणार आहेत.

त्यानंतर या व्हॅनची संख्या वाढवून 7 वर नेली जाणार आहे. या 7 व्हॅनच्या माध्यमातून शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये नागरिकांची अँटीजेन टेस्ट करणे सहज शक्य होणार आहे. ज्या भागात या व्हॅन जाणार आहेत त्या भागातील लोकप्रतिनिधी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आवाहन करून अधिकाधिक नागरिकांना अँटीजेन टेस्ट करण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे.

ही संपूर्ण टेस्ट पूर्णतः मोफत असून, नागरिकांना त्याचा कोणताही खर्च करावा लागणार नाही. सर्व खर्चाचा भार भारतीय जैन संघटना उचलणार असल्याचे चंगेडिया यांनी सांगितले. या मिशन झिरो अहमदनगरसाठी भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, जिल्हा रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे, जिल्हा प्रशासन म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे सहकार्य आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button