Ahmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBlogsBreakingMaharashtraPoliticsSpacial

पावभाजीचा स्टॉल ते २५ वर्ष आमदार आणि राज्यमंत्री…असा होता अनिल राठोड यांचा राजकीय प्रवास

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- नगर शहराचा इतिहास असा आहे, की इथं मोठमोठे नेते आमदार झाले; परंतु दोनेपक्षा जास्त वेळा कुणालाही नगरकरांनी स्वीकारलं नाही. दादा कळमकर यांच्यापासून शहरात सामान्यांतून आमदार होण्याची सुरुवात झाली. कळमकर हे हाॅटेलचालक होते. त्यानंतर अनिल राठोड हे पावभाजी गाडीचालक आमदार झाले.

नगरसेवक वा अन्य कोणतंही पदाचा अनुभव नसताना त्यांना थेट आमदार होण्याचं भाग्य मिळालं. नगर जिल्हा सहकाराचा जिल्हा. अशी कोणतीही पार्श्वभूमी नसताना राठोड यांनी जिल्ह्यात शिवसेना रुजवली. वाढवली. चितळेरस्ता परिसरात अगदी साध्या घरात राहणारे अनिलभैय्या अनेकांनी पाहिले आहेत.

शिवसैनिकांसाठीच नाही, तर सामान्यांसाठीही त भैय्याच राहिले. कुणाला राॅकेल मिळालं नाही, कुणाला साखर मिळाली नाही, कुणावर अन्याय झाला, तिथं भैय्या हजर. कुणाशीही कधीही भिडायला तयार. कोणतीही आर्थिक ताकद नसताना त्यांनी नगर शहरावर २५ वर्षे अधिराज्य गाजविलं.

शहरात अनिल भैय्यांचा दरारा होता. नगरची नगरपालिका, नंतर झालेली महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता मिळविली. सामान्यांना नगरसेवक केलं. शिवसेनेवर त्यांची अचल निष्ठा राहिली. सामान्यांच्या पाठिशी भैय्या एखाद्या पहाडाप्रमाणे राहायचे.

त्यामुळं नगरकरांनीही आपली पूर्वीची आमदार बदलाची मानसिकता बदलली आणि भैय्याला सलग पाच वेळा विधानसभेत पाठविलं. कोपरगाव, राहाता, संगमनेर, अकोले, श्रीगोंदे वगळता अन्य कोणत्याही तालुक्यानं एकाच व्यक्तीला पाच वेळा विधानसभेत जाण्याची संधी दिली नाही.

रस्त्यावर भेटणारा, पंचतारांकित संस्कृतीपासून चार हात दूर राहणारा आणि सामान्यांच्या सुखदुःखात आपलंही सुखदुःख मानणारा भैय्या कायमच जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवित राहिला. एखाद्यावर विश्वास ठेवला, की त्यांनी त्याला कधीच दूर केलं नाही. उलट, जे दूर गेले, त्यांना त्यांनी नंतर माफ करून शिवसेनेशी जोडून घेतलं.

मंत्रिपद असताना आणि लाल दिव्याच्या गाडीतून जाताना त्यांनी जनतेशी नाळ कधीच तुटू दिली नाही. कुणीही हात केला, तरी त्यांची गाडी थांबत असे. सामान्यांचं गा-हाणं ऐकून ते दूर करून नंतरच ते मार्गस्थ होतं.

महसुलाशी कधीच संबंध न आलेल्या अनिल भैय्या यांच्याकडं युती सरकारच्या काळात महसूल राज्यमंत्रिपदासह अन्य मंत्रिपदं आली; परंतु त्यांच्याकडं अन्नपुरवठा मंत्रिपदाच्या असलेल्या कारभारातून त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button