दूधप्रश्नी ‘जाणते राजे’ गप्प का? ; राधाकृष्ण विखेंचा खा. शरद पवारांवर घणाघात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. विविध समस्या शेतकऱ्यांसमोर असतानाही शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. याविरुद्ध आवाज उठवणीसाठी नुकतेच शेतकऱ्यांसह अनेक पक्षीयांनी आंदोलनही केले. 

आता यावरून आ. राधाकृष्ण विखे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघात केला आहे. ते म्हणाले,  ‘दूध उत्पादकांच्या अडचणी वाढत आहेत. त्यांची आंदोलनेही सुरू आहेत. सरकारमध्ये सहभागी असलेले ‘शेतकऱ्यांचे कैवारी’ आणि ‘जाणते राजे’ही यावर काहीच का बोलत नाहीत,’ असा सवाल भाजप नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

त्यांनी थेट नाव घेतलेले नसले तरी त्यांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे असल्याचे दिसून येते. संगमनेर तालुक्यातील मनोली येथील एका दूध संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. विखे पाटील म्हणाले,  दूध दराचा विषय घेवून काही शेतकरी संघटना रोज सरकारला आंदोलनाचे इशारे देतात, पण त्यांचे आंदोलन कुठे दिसत नाही.

उसाच्या भावासाठी आंदोलन करणारे शेतकरी संघटनेचे नेते दूध उत्पादकांच्या प्रश्नावर आक्रमक नाहीत. आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांचेच दूधसंघ आहेत. त्यामुळे दर वाढवून देण्यासाठी त्यांचाच विरोध असल्याचे आता लपून राहीले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणारे जाणते राजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गप्प बसण्याची भूमिका कशी घेवू शकतातॽ’ असा सवालही विखे पाटील यांनी उपस्थित केला.

दरम्यान,  दूध आंदोलन झाल्यांनतर सरकारकडून अनेक वेळा आश्वासने दिली जातात. केवळ काही काळासाठी दूध उत्पादकांना 1 किंवा 2 रुपये भाव वाढ देऊन हा प्रश्न सुटणारा नाही, तर दूध व्यवसायासाठी शाश्वत धोरण ठरवले पाहिजे. तसेच दूध उत्पादक शेतकर्‍यांना किमान हमी भाव कसा मिळेल हे सरकारने पाहिले तरच दूध उत्पादक आणि व्यवसाय टिकणार असल्याचे मत अनेक दूध उत्पादकांनी  व्यक्त केले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment