यांच्या’ साठी कोरोना ही आपत्ती नव्हे इष्टापत्ती !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- खाजगी डॉक्टरानो प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार थांबवा जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांसाठी कोरोना ही आपत्ती नव्हे तर इष्टापत्ती झाली आहे. संपूर्ण नगर जिल्ह्यावर कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे .रुग्ण व मृतांची संख्या वाढते आहे. त्यामुळे रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन,आय सी यु आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत.

त्यामुळे खाजगी डॉक्टरांनी याचा काळाबाजार सुरु केला आहे. वेगवेगळ्या पेकेजच्या नावाखाली आणि दुर्घटना होण्याचा धाक दाखवून रुग्ण व नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात आहेत . ही आंतरराष्ट्रीय आपत्ती असताना नगरमधील खाजगी त्याला पैसे कमावण्याची संधी मानत आहेत.हे म्हणजे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे असून, कोरोना काळात तरी डॉक्टरांनी माणुसकी दाखवावी. गैर मार्गाने पैसे कमावण्याचे धंदे थांबवावेत अन्यथा शिवसेना स्टाईल धडा शिकवला जाईल असा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी दिला आहे.

असे गैरप्रकार करणाऱ्या डॉक्टरांची मान्यता रद्द करावी व हॉस्पिटलचे परवाने रद्द करावे अशीदेखील मागणी त्यांनी केली आहे .याबाबतचे निवेदन त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे , जल संधारण मंत्री ना. शंकरराव गडाख, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरब्बीकर ,मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना दिले आहे. यात त्यांनी म्हंटले आहे की ,नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येमुळे वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.कोविड सेंटर मध्ये देखील बेड्स उपलब्ध होत नाहीत . त्यात खाजगी वैद्यकीय आस्थापनांनी आपल्या पेकेज मध्ये भरमसाठ वाढ केली आहे.

काही नामांकित हॉस्पिटल्स तर कोरोना रुग्ण दाखल करून घेताना दोन दोन पाच पाच लाख रुपये आगाऊ भरून घेत आहेत . नंतरच रुग्णाला प्रवेश देत आहेत . त्यातही रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी नातेवाईकांना डॉक्टरांच्या हातपाया पडावे लागते आहे. रुग्ण दाखल झाला की त्याला काही पूर्वीचे रोग आहेत का ? आणि त्याची मेडिकल विमा पॉलिसी आहे का ? असे दोन प्रश्न हमखास विचारले जातात, जर या दोन्ही प्रश्नाची उत्तरे हो आली तर रुग्णाला लक्षणे नसली तरी त्याला थेट आय सी युत ढकलले जाते .नातेवाईकाच्या हातात सलाईन , इंजेक्शन आणि औषधांची भली मोठी यादी टेकवली जाते .

दररोजची औषधें देताना व उपचार करतांना डॉक्टर व नर्सेस पी पी ई किट घालतात. दिवसभर त्यांच्या अंगात एकच पी पी ई किट असते. दररोज रुग्णाला एकच ऑक्सिजन सिलेंडर लावले जाते. व्हेंटिलेटर न लावता त्याचे बिल आकारले जाते . प्रत्यक्ष बिलात एकेका दिवशी तीन तीन ऑक्सिजन सिलेंडर लागले, तितकेच पी पी ई किट वापरले असे दाखवले जाते .डिस्चार्ज देतांना रुग्णाच्या पॉलिसीची रक्कम तर संपवलीच जाते त्यासोबत त्याच्याकडून उर्वरित रकमेचा भरणा करून घेतला जातो . अन्यथा पेशंट सोडला जात नाही.

अनेक नामांकित रुग्णालयात बिल वाढविण्याचा प्रकारात ओव्हर डोस होतो.आणि रुग्णाची परिस्थिती गंभीर होते व रुग्ण दगावतो . नगरमधील नुकत्याच दगावलेल्या काही नामांकित रुग्णाबाबत असे प्रकार घडले आहेत हे आम्ही आमच्या डोळ्याने पहिले आहे.मयत रुग्णाच्या नातेवाईकाकडून देखील अंत्यविधी साठी पैसे उकळले जातात. ऍम्ब्युलन्स सेनेटाईज करणे आणि पी पी ई किट खरेदीसाठी अतिरिक्त पैसे भरून घेतले जातात वास्तविक हे पैसे पालिकेच्या अंत्यविधी करणाऱ्या ठेकेदाराला पालिकेकडून मिळतात तरी देखील असे अवैध मार्गाने पैसे कमावण्याचे प्रकार सुरु आहेत.

हे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे नाही तर काय आहे? असा सवाल गिरीश जाधव यांनी विचारला आहे. अंत्यविधीसाठी ठेकेदाराने मागितलेले ५००० रुपये अनेकांकडे नसतात . त्यामुळे मृताचे नातेवाईक अंत्यविधीला किंवा सावडायला येत नाहीत .याबाबत पालिका आयुक्त , जिल्हा शल्य चिकित्सक , पालिका आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता सर्व जण खाजगी रुग्णालयात दाखल पेशंट बाबत आमची जबाबदारी नाही असे छातीठोक पणे सांगत आहेत. या गैर प्रकारांना ते सोईस्कर पणे पाठीशी घालत आहेत.

याबाबत खाजगी डॉक्टर व अधिकाऱ्यांची मिलीभगत तर नाही ना असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. वास्तविक कोरोना रोगावर कोणतेही औषध नाही.कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाला भीती दाखवून त्याच्याकडून नाही नाही त्या उपचारासाठी पैसे घेतले जात आहेत. ५० – ५० हजारांची इंजेक्शने टोचण्याच्या नावाखाली गोरगरीब लोकांचे लचके तोडले जात आहेत . तरीदेखील पेशंट मरतच आहेत. खाजगी कोविड सेंटर मध्ये तर दाखल होताना लाखभर रुपये भरून घेतले जात आहेत. हे टाळून जर नगरकरांनी जिल्हा रुग्णालयाकडे सरकारी उपचारासाठी धाव घेतली तर तेथे रुग्ण व नातेवाईकांना कर्मचारी हीन वागणूक देतात.

तेथे रुग्णांची किंवा प्रेतांची हेळसांड होते हे लक्षात आल्याने नगरकर तिकडे फिरकत नाहीत.असेच जर चालू राहिले तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. अनागोंदी होईल . कोरोनाचा कहर लोकांच्या जीवावर बेतल्यास लोक कायदा हातात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गैर प्रकाराना वेळीच आळा घालावा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment