बिग ब्रेकिंग : महानगर बँकेकडून खातेदाराची फसवणूक !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- भोसरी येथील जी एस महानगर सहकारी बँकेने एका खातेदाराने जमा केलेले सात लाख 25 हजार आणि दोन लाख 75 हजार रुपयांचे दोन धनादेश खातेदाराच्या खात्यावर जमा न करता खातेदाराची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 2016 या कालावधीत घडला. याबाबत खातेदाराच्या फिर्यादीवरून बँकेचे चेअरमन आणि संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबासाहेब बाळासाहेब जासूद (रा. विमाननगर, पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभिजित कस्तुरे (रा. आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ, चिंचवड), कुमार मुरलीधर नरावडे (रा. खडकी, पुणे) यांच्यासह जी एस महानगर सहकारी बँकचे चेअरमन आणि सर्व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी बाबासाहेब यांचा भारतात आणि भारताबाहेर इंजिनिअरिंगचा व्यवसाय आहे. 2015 साली बाबासाहेब यांच्या कंपनीची लंडन येथील एका कंपनीसोबत पार्टनरशिप झाली.

त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी बाबासाहेब यांना कर्जाची आवश्यकता होती. त्यावेळी आरोपी कुमार नरावडे हा बाबासाहेब यांना भेटला. एका बँकेतील व्यवस्थापक त्याच्या ओळखीचे असल्याचे सांगत त्याने बाबासाहेब यांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. आरोपी कुमार मुरलीधर नरावडे याने बाबासाहेब यांची बँकेच्या अधिका-यांशी ओळख करून देऊन बाबासाहेब यांच्याकडून कार्यालय आणि शेतजमिनीची कागदपत्रे घेऊन गेला.

त्याद्वारे कर्ज मंजुरी पत्र कर्ज प्रकरण दाखल होण्याअगोदर दाखून विश्वास संपादन केला. कर्ज बैठकीच्या वेळी कुमार याच्या सांगण्यावरून बँकेचे व्यवस्थापक गुलाबराव शेळके यांनी बाबासाहेब यांना अट घातली की, बाबासाहेब यांना मिळणा-या कर्जातून एक कोटी 76 लाख 50 हजार रुपये कुमार याला द्यावे. कारण त्याचे कर्ज खाते एनपीए झाले आहे. मार्च अखेरला त्याचे खाते सुरळीत करू आणि एप्रिल महिन्यात वाढीव कर्ज देऊन तुम्हाला व्याजासहित तुमची रक्कम परत करू असा विश्वास दिला.

यासाठी बाबासाहेब यांनी नकार दिला. त्यावर गुलाबराव शेळके यांनी, ‘बँक किती पॉवरफुल आहे. तुमचे कर्ज कुठेही मंजूर होणार नाही’ असा बाबासाहेब यांच्यावर दबाव टाकला. नाईलाजाने बाबासाहेब यांनी तीन कोटी टर्म लोन आणि दोन कोटी खेळते भांडवल कर्ज घेण्यासाठी सहमती दर्शवली. बँकेने बाबासाहेब यांना कर्ज मंजूर केले. त्यातील एक कोटी 76 लाख 50 हजार रुपये बाबासाहेब यांच्या परस्पर कुमार याच्या कर्ज खात्यात वळवून कुमार याचे खाते सुरळीत केले. त्यानंतर पुढील सहा ते सात महिने बाबासाहेब यांना त्यांचे पैसे दिले नाहीत.

दरम्यान बाबासाहेब यांनी कर्जाची रक्कम खात्यावर तशीच ठेवली. बँकेने त्याच रकमेतून कर्जाचे हप्ते वळती करून घेण्यास सुरुवात केली. यावरून बाबासाहेब आणि गुलाबराव शेळके यांच्यात वाद झाला. हातात घेतलेले काम, ग्राहकांच्या तक्रारी आणि मार्केटमधील पत संपल्यामुळे बाबासाहेब यांची वार्षिक कोट्यवधीची उलाढाल 50 लाखांवर आली. बाबासाहेब यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर कुमार याने त्यांना दोन टप्प्यात 13 लाख 40 हजार रुपये दिले. घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी बाबासाहेब यांना शेती विकावी लागली.

तरीही गुलाबराव शेळके यांनी धमकी दिली की, जर खाते नियमित ठेवले नाही तर मालमत्ता विकून कर्जाची वसुली केली जाईल. तुम्हाला धंद्यासाठी पैसे हवे असतील तर आणखी एखादी मालमत्ता बँकेकडे ठेऊन त्यावर कर्ज घ्या, असा सल्ला देखील शेळके यांनी बाबसाहेब यांना दिला. या भीतीपोटी बाबासाहेब यांनी बजाज फायनान्सकडे असेलेली मालमत्ता बँकेला देऊन दोन कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यातले दीड कोटी रुपये बँकेने परस्पर बजाज फायनान्सला दिले आणि उरलेले 50 लाख बँकेने धंद्यासाठी न देता परस्पर कर्जाचे हप्ते म्हणून वळते करून घेतले.

सिबिल खराब होऊ नये म्हणून बाबासाहेब यांनी अनेक दिवस हप्ते भरले. मात्र, बँकेचा दुष्ट हेतू लक्षात आल्यानंतर त्यांनी हप्ते भरणे बंद केले. याबाबत बाबासाहेब यांनी बँकेच्या संचालक मंडळाला कळवले आहे. दरम्यान गुलाबराव शेळके यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा उदय शेळके यांनी बाबासाहेब यांना कुमारने घेतलेल्या पैशाची हमी दिली, तत्पूर्वी खाते सुरळीत ठेवावे नाहीतर नाईलाजाने मालमत्ता ताब्यात घ्यावी लागेल अशी उदय शेळकेने बाबासाहेब यांना धमकी दिली. त्यावर उदय शेळकेनेच उपाय सांगितला की,

बाबासाहेब यांनी अजून मालमत्ता देऊन त्यावर कर्ज करून देतो व ते कर्ज थकीत कर्जात भरून खाते सुरळीत ठेवावे. मालमत्ता जप्त होईल या भीतीपोटी बाबासाहेब शेतजमीन गहाण ठेवण्यास तयार झाले. पुन्हा उदय शेळकेने सर्व कर्ज खाती एनपीए असताना बाबासाहेब यांच्या पार्टनरशिप कंपनीला मार्च अखेर पुन्हा एक कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज देऊन ती रक्कम बाबासाहेब यांची कंपनी राज सिस्टीमच्या थकीत कर्ज खात्यात भरून खाते सुरळीत केले. दरम्यान, बँकेने कुमार नरवडे याला वाचविण्यासाठी संजय मोरे,

अनिल दरक (औरंगाबाद) व इतर अनेक लोकांना कर्जे देऊन त्या कर्जातील रक्कम कुमार याला दिल्याचे आढळून आले आहे. याबाबत बँकेचे सर्व संचालक मंडळ, चेअरमन उदय शेळके, कुमार नरवडे आणि शरद नरवडे यांच्यावर औरंगाबाद येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.तसेच कुमार नरावडे याची कर्ज वसुली चालू असताना सुद्धा त्याला बँकेने परत कोट्यवधी रुपयाचे कर्ज दिलेले आहे. बँकेच्या रिकव्हरी प्रोसेस चालू असताना बाबासाहेब यांना डीआरटी मधून स्टे मिळाला आहे.

दरम्यान, बाबासाहेब यांनी त्यांच्या दुसऱ्या कंपनीच्या खात्यावरून सात लाख 25 हजार रुपयांचा धनादेश दिला होता. हा धनादेश कंपनीच्या खात्यातून पास होऊन गेला. मात्र महानगर बँकेच्या कुठल्याही कर्ज खात्यावर जमा झाला नाही. बँकेने बाबासाहेब यांची सव्वा सात लाख रुपयांची रक्कम परस्पर गायब केल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर बाबासाहेब यांनी दुसरा दहा लाख रुपयांचा धनादेश दिला. तो धनादेश खात्यावर जमा झालेला आहे. परंतु त्यातील दोन लाख 75 हजार रुपये देखील बँकेने गायब केली आहे.

बँकेने एकूण दहा लाख रुपयांची रक्कम परस्पर गायब करून बाबासाहेब यांची आर्थिक फसवणूक केली आहे.बाबासाहेब यांना या प्रकरणात, सहकार खाते आणि पोलीस स्टेशन येथे कुठेही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.त्यामध्ये मोठमोठ्या राजकारणी लोकांचा महानगर बँक व कुमार नरावडे यांच्यावर वरदहस्त असल्याचे फिर्यादी बाबासाहेब यांचे म्हणणे आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment