क्लासिक व्हील कंपनीत भूमिपुत्रांना डावलून ठेकेदार मार्फत परप्रांतीय कामगारांचा भरणा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- एमआयडीसी येथील क्लासिक व्हील कंपनीत स्थानिक भूमिपुत्रांना डावलून कामगार कायदे पायदळी तुडवून ठेकेदार पध्दतीने परप्रांतीय कामगारांची भरती केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

कंपनीच्या या मनमानी कारभाराच्या विरोधात मनसे कामगार सेनेच्या वतीने कंपनीचे गेट बंद करुन आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा मनसे कामगार सेनेचे उपचिटणीस नंदू गंगावणे यांनी दिला आहे. टाळेबंदी काळात कंपनीचे काम बंद असल्याने अनेक कामगारांना सुट्टी देण्यात आली होती.

सध्या कंपनीचे कामकाज पुर्ववत सुरु झाले आहे. मात्र सदर कंपनीत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासद असलेल्या जुन्या कामगारांना कामावरुन हटवून ठेकेदाराच्या माध्यमातून कंत्राटीपध्दतीने परप्रांतीय कामगारांचा भरणा सुरु करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक भूमिपुत्रांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे.

अनेक कामगारांना कामाअभावी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शासकीय नियमाप्रमाणे 80 टक्के भूमिपुत्र आणि 20 टक्के इतर कामगार भरण्याचे निर्देश आहे. मात्र कंपनीत कायद्याचे उल्लंघन करून परप्रांतीय भरले जात असल्याचे संघटनेचे म्हणने आहे.

सर्व कामगारांची टाळेबंदीमुळे आर्थिक परिस्थिती बिकट असून, जुन्या कामगारांना सेवेत पुन्हा घ्यावे, कामगार काद्यांची अंमलबजावणी न करणार्‍या क्लासिक व्हील कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय व सहा. कामगार आयुक्त कार्यालयात देण्यात आले आहे.

सदर प्रश्‍न मार्गी न लागल्यास मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ.मनोज चव्हाण, कार्याध्यक्ष संतोष धुरी, सरचिटणीस गजानन राणे, चिटणीस सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे गेट बंद करुन सर्व कामगार आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment