Blog : माझा हाडामासाचा ‘पांडुरंग’ हरपला!

Published on -

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- गाडीच्या काचेवर पाणी साचलं तर ‘वायफर’ने दूर करता येतं. मात्र, माणसाच्या मनाला वायफर लावता येत नाही. काही आठवणी, माणसं आयुष्यभरासाठी कोरले जातात.

अजूनही विश्वास बसतं नाही, “कॅमेरामन……सोबत मी पांडुरंग रायकर हा आवाज यापुढे ऐकायला मिळणार नाही. मला बोट धरुन माध्यमात आणणारा हात सोबत असणार नाही. पांडुरंग सर माझ्यासाठी माणसांच्या गर्दीतला आधार होता.काही क्षणात हा मैत्रीचा आधार निखळला.

कॅमेऱ्यासमोर असो नाहीतर कॅमेऱ्यामागं पांडुरंग सरांनी मला प्रत्येकवेळी माझ्यात बळ पेरलं. तप्त जीवनाभुवनात मला सावली दिली. स्वत: अगणित परिस्थितीचे चटके सहन करुन छत्र धरलं. पण कधी जाणवू दिलं नाही. मोठेपणा दाखवला नाही.

घरात असताना माझे दाजी, फिल्डवर असताना पांडुरंग सर आणि खासगीत असताना माझ्यासाठी फक्त पांडुरंग होता . एकच माणूस तीन भुमिकांत माझ्यासोबत जगत होता. मला समृद्ध करत होता. पांडुरंग सराचं जाणं माझ्यासाठी कधीही भरुन निघणारी हानी आहे. मी आज आहे.

उद्या नाही. स्वत: शिक, तयार हो असा नेहमी आग्रह असायचा. कोपर्डीच्या रिपोर्टिंगवेळी सरांमधला मी शांत, संयत तितकाच निश्चल माणूस पाहिला. पांडुरंग सरांकडं मैत्रीचा बॅलन्स अफाट होता. आपल्या सहवासात आलेल्या माणसाला भरुभरुन द्यायचं. हात आखडता घ्यायचा नाही.

ऑन एअर जाण्यापासून सारे बारकावे ज्युनिअरला सांगायचे. महाविद्यालयाच्या दिवसात मुंबईला गेलो होतो. पांडुरंग सर मुंबई पुण्यनगरीला होते. 26/11 चा निकाल अंतिम टप्यात होता. अॅड. उज्ज्वल निकमांचे नाव चर्चेत होते. खटल्याची नियमित ट्रायल सुरू होती. मी सरांना म्हणालो, मला निकम सरांना भेटण्याची इच्छा आहे.

चल, तुला सरांशी भेट घालून देतो. “सर, हा कुणाल? कोपरगावला असतो. माझं काही विशेष नसताना सरांशी परिचय करून दिला. निकम सरांसोबत भरभरुन बोललो . गावाकडे आलो तर मी फोटो मित्रांना दाखवायचो. अभिमानानं सांगायचो. ग्रामीण भागातला मुलगा पुढे येतो. मुंबई, पुण्यासारख्या महानगरात स्थिरावतो.

प्रिंट टू स्क्रीन असा प्रवास करतो. अहमदनगर सारख्या पॉलिटिकली अॅक्टिव्ह जिल्हा ताकदीनं कव्हर करतो. हे सारं माझ्यासारख्या माध्यमाच्या विद्यार्थ्याला अचंबित करणार होतं. हे प्रेरणात्मक होतं. माध्यम क्षेत्रात फ्रीलान्सर कॅमेरामन ते रिपोर्टर हा प्रवास घडला केवळ पांडुरंग सरांमुळे शक्य झाला.

मुळासकट एखादा वृक्ष उन्मळून पडावा तशी माझी अवस्था आहे. मात्र, पांडुरंग सरांनी दिलेली शिकवण आहे. लढण्याची प्रेरणा आहे. पुन्हा सुरुवात करायची आहे. प्रिय पांडुंरंग सर, तुमचा पत्रकारितेचा वसा पुढे न्यायचा आहे. जेव्हा जेव्हा ऑन-एअर जाईल तेव्हा तुमची ‘आभाळमाया’ माझ्यासोबत सदैव राहू द्या. तुमचाच कुणाल (टीव्ही 9, अहमदनगर)

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!