This Website Is Part Of TBS Media Group
अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्याच्या काही भागात मागील दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जामखेड आणि कर्जत तालुक्यात तसेच राहुरी, श्रीरामपूर तसेच नगर शहरातही जोरदार पाऊस पडला.
परंतु कर्जत तालुक्यातील कोरेगावमध्ये काल झालेल्या वादळी पावसामुळे खरीप पिके भुईसपाट झाले आहेत. यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे.
या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले.
सुरुवातीला जोमात आलेले कपाशीचे पीक आता मोठ्या प्रमाणात पाते गळू लागल्यामुळे धोक्यात येऊ लागले आहे. या पावसामुळे झाडांची खालची पाने लालसर-पिवळी पडू लागली आहेत.
कपाशीवर मावा-तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. काही ठिकाणी कपाशीचे पीक पाण्यात डुंबत होते. तर काही ठिकाणी जास्त पाण्यामुळे कापसाचे रोपटे वाहून गेल्याचे प्रकार घडले आहेत. प्रशासनाने या सर्वांची पाहणी करावी आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved