पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हावासियांना आवाहन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचे ठरविले असून आपल्या जिल्ह्यात मंगळवार, दिनांक १५ सप्टेंबरपासून या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.

या मोहिमेत कोरोनादूतांनी घरोघरी सर्वेक्षण करुन प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक माहिती संकलित करावी आणि आजारी तसेच लक्षणे असणार्‍या रुग्णांवर तात्काळ उपचार करावेत. ही मोहिम २५ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार असून या मोहिमेतून कोरोनाला हदद्पार करुन विजयादशमीच्या मुहुर्तावर कोरोनारुपी रावणाचे दहन करण्याचा संकल्प करुया.

या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सदस्य, स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जिल्ह्यात उद्यापासून (दि. १५ सप्टेंबर) ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानास प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांशी संवाद साधला आणि मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत सूचना केल्या.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महानगरपालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदींसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी आदी प्रमुख अधिकारी या दरदृश्य प्रणालीद्वारे या संवादात सहभागी झाले होते. यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, राज्यातील कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

त्यामुळे गृहभेटी, तपासणी आणि कोमॉर्बीड आजारी व्यक्‍तींना उपचार आणि आरोग्य शिक्षण याद्वारे या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण राज्यात “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” राबविण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यात घरोघरी ही मोहिम राबवा. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची आरोग्यविषयक माहिती घेऊन जे आजारी आहेत, कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत किंवा इतर आजारांनी ग्रस्त आहेत, त्यांची माहिती या मोहिमेद्वारे मिळणार आहे.

तसेच आजारी व्यक्तींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी ही मोहिम साहाय्यभूत ठरणार आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महानगरपालिका, ग्रामीण भाग, नगरपालिका क्षेत्र आणि कॅन्टोन्मेंट क्षेत्रात आरोग्य पथकांची स्थापना करुन त्यांच्याद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी कोरोनादूत घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्यविषयक माहिती घेणार आहेत. सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती यांचे पदाधिकारी,सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच-सदस्य, अधिकारी-कर्मचारी सर्वांनी या मोहिमेत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहीम दोन टप्प्यात होणार असून मोहीमेची पहिली फेरी दि.१५ ते दि.१० सप्टेंबर या कालावधीमध्ये होईल आणि दुसरी फेरी दि.१४ ते २४ सप्टेंबर या कालावधीमध्ये होईल. पहिला फेरीचा कालावधी १५ दिवसांचा असेल तर दुसर्‍या फेरीचा कालावधी १० दिवसांचा राहणार आहे. सर्व यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि पदाधिकारी,, नागरिक यांनी याकामी योगदान देऊन जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव संपुष्टात आणण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन श्री. मुश्रीफ यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले, जिल्ह्यातील प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा या मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधिक चाचण्या करुन सुरुवातीच्या टप्प्यातच संशयित रुग्णांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना उपचार उपलब्ध करुन देणे यास प्राधान्य देण्यात येत आहेत. लक्षणे असणार्‍या रुग्णांना तात्काळ कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. नागरिकांनी आजाराची लक्षणे जाणवत असतील तर तात्काळ तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन वारंवार तसे आवाहन करत आहे.

घरातील प्रत्येक सदस्यांनी त्यांच्या कुटुंबातील कोणाला लक्षणे जाणवत असतील तर त्यांची तपासणी करुन घेतली पाहिजे. आता या मोहिमेमुळे प्रशासनाच्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या कामाला अधिक गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे पालकमंत्री श्री. मुश्रीफ आणि उपस्थितांना मोहिमेची अंमलबजावणी आणि त्याची तयारी याबाबत माहिती दिली. या मोहिमेअंतर्गत गृहभेटीसाठी एक आरोग्य कर्मचारी आणि २ स्वयंसेवक (एक पुरुष व एक स्त्री) असे तिघांचे पथक असेल. एक पथक १ दिवसात ५० घरांना भेटी देईल. पहिली फेरी १५ दिवस असे गृहीत धरुन संपूर्ण लोकसंख्येसाठी एकूण पथकांची संख्या निश्चित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment