BreakingCorona Virus Marathi NewsHealthIndiaLifestyleWorld

रशिया आला धावून … भारतीयांना देणार तब्बल दहा कोटी कोरोना लस..

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- देशातील कोरोना बाधितांच्या संख्येनं काल सुमारे ५० लाखांचा आकडा ओलांडला. दर दिवशी देशात ९० हजारांच्या आसपास कोरोना रुग्णांची नोंद होत असल्यानं आरोग्य व्यवस्थेवर अतिशय मोठा ताण आला आहे.

सध्याच्या घडीला ऑक्सिजन पुरवठ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी बेड्सचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे कोरोना लस नेमकी कधी उपलब्ध होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. याच दरम्यान जगात सर्वात आधी मंजुरी मिळालेली रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ ही कोरोना वरील लस लवकरच भारतात उपलब्ध होणार आहे.

मागच्या काही दिवसांपासून या लसीसाठी भारताची रशियन लस निर्मात्यांबरोबर चर्चा सुरु होती. रशियन आरोग्य मंत्रालयाशी संबंधित असलेल्या गमालेया संशोधन संस्थेने ही लस विकसित केली आहे.भारताच्या रेग्युलेटरी ऑथॅरिटीने परवानगी दिल्यानंतर लस पुरवठा करण्यात येणार आहे.

रशियाने भारतातील डॉ. रेड्डी लॅबोरटरीज बरोबर करार केला असून रशियन डायरेक्ट इन्व्हेसमेंट फंडने (आरडीआयएफ) ही माहिती दिली. डॉ. रेड्डी लॅबला रशिया स्पुटनिक व्ही लशीचे ट्रायल म्हणजे चाचणी आणि वितरणासाठी तब्बल 10 कोटी डोस देणार आहे. चालू वर्षाच्या अखेरीस भारतात स्पुटनिक-व्ही लस निर्यात केली जाईल.

कोरोनावरील लसीची नोंदणी करणारा रशिया हा जगातला पहिला देश आहे. लशीची मानवी चाचणी म्हणजे क्लिनिकल ट्रायल आणि भारतात वितरणासाठी डॉ. रेड्डी लॅबला सहकार्य करणार असल्याचे रशियन डायरेक्ट इन्व्हेसमेंट फंडने सांगितले.

आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर प्रक्रिया लगेच सुरु होईल असे आरडीआयएफकडून सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही लस सुरक्षित असल्याचे म्हटले होते. लशीचा डोस दिल्यानंतर ठराविक दिवसांनी अँटीबॉडीज शरीरात तयार झाल्या असे अहवालात म्हटले होते.

चाचणीमध्ये यशस्वी ठरल्यास पुढच्यावर्षीपर्यंत ही लस उपलब्ध होऊ शकते. भारतात सध्या कोव्हॅक्सीन, ऑक्सफर्ड आणि झायडसने विकसित केलेल्या लशीच्या मानवी चाचण्या सुरु आहेत. दरम्यान, या लसीची किंमत नेमकी किती असेल, याची माहिती आरडीआयएफनं दिलेली नाही. मात्र कोरोना लसीच्या विक्रीतून आम्हाला नफा कमवायचा नाही.

निर्मितीसाठी आलेला खर्च वसूल होईल, इतकाच विचार करून लसीची किंमत ठरवण्यात येईल, असं आरडीआयएफनं याआधी म्हटलं होतं. रशियाने आपली ‘स्पुटनिक व्ही’ ही लस साामान्य रशियन नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. लशीची पहिली खेप वितरीत करण्यात आली आहे. त्याशिवाय कझाकस्तान, ब्राझील, मेक्सिकोमध्येही रशिया आपली लस देणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button