अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाज बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागा च्या वतीने राबविण्यात येणारी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सबंधित सर्व यंत्रणांनांशी चर्चा करण्यात येऊन २ महिन्याच्या आत बैठक घेण्यात येईल असे लेखी आश्वासन जामखेड चे तहसिलदार विशाल नाईकवाडे व गट विकास अधिकारी परसराम कोकणे यांनी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेले तहसिल कार्यालयासमोरील पाल ठोको आंदोलन मागे घेण्यात आले.

अती उच्च दाबाच्या वीज वाहक तारांच्या अडथळ्यामुळे खर्डा येथील मदारी वसाहतीसाठी यापूर्वी निवडण्यात आलेली गट नंबर ११८६/२ मधील एक हेक्टर जागा बदलून खर्डा ग्रामपंचायतीने गटनंबर ११४१ मधील १ हेक्टर जागा प्रस्तावित करण्याबाबत ची कार्यवाही पूर्ण केली असून तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर केलेला आहे.

सदर जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळताच सुधारित अंदाज पत्रक तयार करून अतिरिक्त निधीबाबत चा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल असे या पत्रात म्हटले आहे. ‘घर देता का घर’ असा सवाल उपस्थित करीत खर्ड्यातील मदारी समाज बांधवांनी सोमवारी सकाळी ११ वा. आ. रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर मदाऱ्याचा खेळ केला तर तहसिल कार्यालयासमोर आपले कुटुंबीय व संसार घेऊन पाल ठोको आंदोलन सुरू केले होते.

Advertisement

ग्रामीण विकास केंद्र जामखेड, लोकाधिकार आंदोलन आणि वंचित बहुजन आघडीच्या संयुक्त विद्यमाने पुकारलेल्या आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे राज्य सह समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केले. लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष द्वारका पवार, विशाल पवार, वंचित बहुजन आघाडीचे जामखेड तालुका अध्यक्ष आतिष पारवे, हुसेन भाई मदारी,

सरदार मदारी, सलीम मदारी, फकीर मदारी, समशेर मदारी, मेहबूब मदारी, रहीम मदारी, मुस्तफा मदारी यांच्यासह खर्डा येथील समस्थ मदारी बांधव सहकुटुंब या आंदोलनात सहभागी झाले होते. मदारी समाजाच्या व्यथा मांडताना ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात उत्कृष्ठ कामगिरी बजावणाऱ्या मदारी मेहतर समाजाच्या वंशजांची केवळ नाकर्त्या सरकारच्या उदासीन धोरणामुळे दुर्दशा झाली.

व गेल्या ५० वर्षांपासून त्यांना बाजाराच्या ओट्यावर गोधडीचे पाल टाकून राहावे लागते. ही स्वतंत्र भारत देशातील भटक्यांची शोकांतिका आहे. गेल्या महिन्याभापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खर्ड्यातिल मदारी समाजातील महिला व मुला बाळांचे अतोनात हाल झाले. सारा संसार भिजला, पोटाची खळगी भरण्यासाठी ३ दगडाची चुल पेटविणे देखील मुश्किल झाले. अशा परस्थितीमध्ये फाटक्या तुटक्या समाजाला आधार देण्याऐवजी स्थानिक पुढारी व प्रशासन मात्र ढीम्म आहे.

Advertisement

अशी खंत सलीम मदारी यांनी व्यक्त केली. मदारी समाजाच्या वसाहतीच्या बांधकामाबाबत जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महसूल व पोलिस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची अंमलबजावणी तत्काळ करा, आणखी किती दिवस अन्याय सहन करणार,

आमचा लढा न्यायासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी, सोसणार नाही अत्याचार, घरकुल घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा देत तहसिल कार्यालय परिसर दणाणून सोडला. व तहसिल कार्यालय परिसरातच आपल्या चुली पेटवल्या तत्पूर्वी आ. रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर सलीम भाई मदारी, हुसेन भाई मदारी, व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदाऱ्यांचा खेळ सादर करून लक्ष वेधले.

या आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगेश आजबे, सुनिल लोंढे, प्रहार संघटनेचे जयसिंग उगले, नईम भाई शेख, मनसे चे जिल्हाध्यक्ष वैभव जमकावळे, तालुकाध्यक्ष प्रतिप टापरे, उपाध्यक्ष सनी सदाफुले, कुसडगाव चे सरपंच दादासाहेब सरनोबत, आम आदमी पार्टीचे बजरंग सरडे, संतोष नवलाखा, लहुजी शक्ती सेनेचे पोपट फुले, नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे प्रतिनिधी भिमराव चव्हाण, आजिनाथ शिंदे, संतोष शेगर यांनी पाठिंबा दिला.

Advertisement

या आंदोलनाच्या यशसवीतेसाठी ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते सचिन भिंगारदिवे, वैजिनाथ केसकर, राकेश साळवे, संतोष चव्हाण, संतोष भोसले, शरद काळे, अभास काळे, टाबर भोसले, मच्छिंद्र जाधव, अनिल सावंत, अल्ताफ शेख, कांतीलाल जाधव, कल्याण आव्हाड, आदित्य भोसले, विशाल आव्हाड, अंकुश पवार, श्रावण गंगावणे, बाजीराव गंगावणे,

साहेबराव शिंदे, शा हणुर काळे, रोहित भालेराव, पप्पुराज सदाफुले, सुशील राजगुरू, राहुल राजगुरू, लोचणा भोसले आदींनी परिश्रम घेतले. जामखेड चे तहसिलदार विशाल नाईकवाडे, गट विकास अधिकारी परसराम कोकणी यांनी आंदोलनकर्त्यांची भूमिका समजावून घेतली. सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश कांबळे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement