वंचित बहुजन आघाडीचे २ नोव्हेंबर रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आंदोलन.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-पारनेर तालुक्यातील आदिवासी कुटुंबातील तरुणाच्या आत्महत्येच्या गुन्ह्याचा योग्य पध्दतीने तपास करावा व आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना पारनेर पोलिसांनी त्वरित अटक करावी,

अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवार दि. २ नोव्हेंबर रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे राज्य सह समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

अहमदनगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांना मंगळवार दि. २० रोजी या बाबत निवेदन देण्यात आले. यावेळी ॲड. डॉ. अरुण जाधव, वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, जगु गायकवाड, लोकाधिकार आंदोलनाचे श्रीगोंदा तालुका समन्वयक संतोष भोसले, ज्योती भोसले, राजू भोसले, विनोद भोसले, दत्ता भोसले, सुनिल चव्हाण, अहिस्ता भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री, गृहमंत्री, मा. खा. ॲड. प्रकाश आंबेडकर, आदिवासी विकास मंत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी यांनाही हे निवेदन पाठविण्यात आले आहे. म्हसे बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील आदिवासी तरुण परसराम भालचंद्र काळे याने रविवार दि. ११ सप्टेंबर रोजी पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द शिवारातील शिंदे मळ्यातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

त्याला गावातील सुभाष मारुती बढे व शिवाजी दिनकर मदगे या दोघांनी म्हसे ग्रामपंचायत हद्दीतील रानात मेंढ्या चारण्याच्या वादातून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली व आत्महत्येस प्रवृत्त केले अशी तक्रार विनोद निवृत्ती भोसले यांनी सोमवार दि. १२ ऑक्टोबर रोजी पारनेर पोलीस ठाण्यात केली होती. परंतू गुन्हा घडून १० दिवस उलटले तरी पारनेर पोलिसांनी याबाबत कुठलीही कारवाई केली नाही म्हणून मंगळवार दि. २० ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक ,

जिल्हाधिकारी व अहमदनगर ग्रामीण चे उप विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांना निवेदन देऊन चर्चा केली असता समाधानकारक उत्तर न देता ‘तपास चालू आहे’ असे उत्तर दिले. त्यामुळे पोलीस यंत्रणा आरोपींना जाणीवपूर्वक पाठीशी घालत आहेत. आरोपींशी पोलिसांचे अर्थपूर्ण लागेबांधे असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पारनेर तालुक्यात गेल्या २ महिन्यात आदिवासी कुटुंबातील व्यक्तींवर जीव घेणे हल्ले, आत्महत्या, अत्याचार असे गंभीर गुन्हे घडले.

यातील बहुतेक आरोपी आर्थिक दृष्टया सक्षम व राजकीय आश्रया खालील आहेत. त्यामुळे राजकीय दबाव व ‘अर्थपूर्ण’ तडजोडी मुळे अशा गुन्ह्यातील आरोपी राजरोसपणे मोकाट फिरत असून देखील पोलीस दप्तरी मात्र ते फरार आहेत, असा आरोप ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केला आहे. नगर जिल्ह्यातील आदिवासी भटके विमुक्तांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार, खून, बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त करणे व जातीय अत्याचारांच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

ही अत्यंत गंभीर बाब असून जिल्हा प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी. पालकमंत्री, आमदार, महसुल, पोलीस प्रशासन, समाज कल्याण विभाग, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन हे गुन्हे आटोक्यात कसे येतील. याबत ठोस कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment