वैद्यकीय अधिकारी व पोलिस यंत्रणेची भूमिका संशयास्पद…’त्या’ च्या मृत्यूची चौकशी करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- निमगाव खुर्द येथील पूनम अमोल कासार या महिलेच्या मृत्यूबाबत अनेक घटना घडल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी व पोलिस यंत्रणेची भूमिका संशयास्पद असून केंद्रीय महिला आयोगामार्फत या घटनेची चौकशी व्हावी, यासाठी प्रयत्न करू अशी माहिती भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी यांनी दिली.

भाजप कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत नाईकवाडी बोलत होत्या. यावेळी जिल्हा सचिव नगरसेवक मेघा भगत, माजी नगरसेवक ज्योती भोर, प्राजक्ता बागूल, पुष्पा वाणी, लता देशमुख, रेशमा खांडरे, आरती पठाडे, कांचन ढोरे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे,

शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले, दीपक भगत, विठ्ठल शिंदे, दादासाहेब गुंजाळ, वैभव लांडगे आदी उपस्थित होते. ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून ४ लाख रुपये आणावेत, या कारणावरून सासरी पूनमचा (वय २३) छळ सुरु होता. जाचास कंटाळून तिने १० ऑक्टोबरला घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

यासंदर्भात नाईकवाडी म्हणाल्या, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी हस्तक्षेप करणाऱ्या प्राचार्य अशोक गुंजाळ यांना महिलेच्या दशक्रियेच्या वेळी मारहाण करण्यात आली. हा महिलांचा आक्रोश आहे. पूनम गरोदर होती. मृत्यूच्या अगोदर काही तासांपूर्वी आपल्या भावाबरोबर तिने खुशालीचा फोन केला होता.

ती आत्महत्या करू शकत नाही, असे तिच्या परिवाराला भेटल्यानंतर समजले. वैद्यकीय अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. मृत महिलेच्या गळ्यावर, छातीवर, तसेच पायावर जखमा होत्या. या संदर्भात आम्ही पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाहीएकूणच या प्रकरणाचा तपास संशयास्पद आहे. न्याय मिळण्यासाठी केंद्रीय महिला आयोगाकडे आम्ही चौकशीची मागणी करणार असल्याचे नाईकवाडी यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment