अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांसाठी महसूलमंत्री थोरातांची उद्धव ठाकरेंकडे ‘ही’ मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  यंदा पाऊस खूप बरसला. जूनच्या पहिल्याच आठवड्यात दमदार सुरु झालेल्या पावसाने अगदी आजपर्यंत दमदार हजेरी लावली आहे. या पावसाने खरीप पिकांवर अक्षरशः पाणी फिरवले. परंतु आता परतीचा पाऊसही बळीराजाच्या मानगुटीवर बसला आहे. शेतांना तळ्यांचे स्वरूप येऊन पिके नष्ट झाली.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल काँग्रेस मंत्र्यांची बैठक घेऊन नुकसानीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. झालेले नुकसान खूप मोठे असून भरीव मदत मिळावी,

असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील इतर भागातही अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी या भागाचा दौरा केला.

काँग्रेसच्या मंत्र्यांनी काल या विषयावर चर्चा केली. झालेले नुकसान खूप मोठे आहे. शेतकर्‍यांच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे ही आमची भावना असून जास्तीत जास्त मदत मिळावी ही मंत्र्यांची भावना असून आपण ती मुख्यमंत्र्यांकडे मांडू, असे थोरात म्हणाले. दरम्यान, परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागात हाहाकार उडाला आहे.

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील अनेक भागात अतिवृष्टी झाली. यामुळे नद्या, नाल्यांना पूर आले. अनेक ठिकाणी रस्ते बंद होऊन जनजीवन विस्कळित झाले होते.

अहमदनगर जिल्हाही याला अपवाद नाही. जिल्हयाच्या विविध भागात परतीच्या पावसाने विजांच्या लखलखाटात, ढगांच्या गडगडाटासह धुडगूस केला . नगर, श्रीरामपूर शहर, शिर्डी, राहाता, राहुरी, अकोले, कोपरगाव, नेवासा संगमनेरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या नुकसानीची मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment