डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविताना बांधकाम विभागाने लावला चुना

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- जिह्यातील बहुतांश तालुका स्तरावर तसेच गावपातळीवर नादुरुस्त रस्ते, रस्त्यावरील खड्डे, यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

यातच शेवगाव शहरातील रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजवितांनी बांधकाम विभागाने नागरिकांनाच चुना लावला असल्याचा काहीसा प्रकार घडला आहे.

पाच- सहा महिन्यांपासून रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करणाऱ्या शेवगावकरांना बांधकाम विभागाने खड्डे बुजवून तात्पुरता दिलासा दिला आहे;

मात्र डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी चक्क कोरडी खडी व मातीमिश्रित मुरमाचा वापर केल्याने, दुरुस्तीचे काम “फार्स’च ठरणार आहे.

जूनपासून सातत्याने झालेल्या पावसामुळे शहर व तालुक्‍यातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. आता पाऊस थांबल्याने शहरातील नगर, नेवासे, पाथर्डी,

पैठण या रस्त्यांवरील खड्ड्यांची तात्पुरत्या स्वरूपातील डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली आहे. त्यात डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मोठी खडी व मातीमिश्रित मुरूम वापरला जात असल्याने,

वाहनांमुळे खडी रस्त्यावर पसरून वाहतुकीला अडथळा ठरू लागली आहे. माती व मुरूम वाहनांच्या चाकांमुळे उडून मागील वाहनचालकांच्या, तसेच पादचारी व दुकानदारांच्या नाका-तोंडात जात आहे.

पाऊस झाल्यास खड्डे उघडे पडून वाहनचालकांना पुन्हा कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे सर्व रस्त्यांवरील खड्डे डांबर व खडीच्या साहाय्याने बुजविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved