पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या फोटोला जाहीर आंघोळ आणि….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- वारंवार मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने अखेर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे-शेवगाव परिसरातील जीवनज्योत फाउंडेशनने अनोख्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

नेवासे फाटा ते शेवगाव या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम येत्या सात दिवसात सुरू झाले नाही तर या रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्यात नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा फोटो ठेवून त्याला जाहीर आंघोळ घालण्याचे आगळेवेगळे आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनामुळेही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेला जाग आली नाही व त्यांनी रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले नाही, तर मग आंदोलनाच्या आठव्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रतिमांना जोडे मारो व नंतर त्या प्रतिमांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्याचेही ठरवले गेले आहे.

या आंदोलनाच्या पोस्ट नेवासे व परिसरात व्हायरल झाल्या असून, त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जीवनज्योत फाउंडेशनचे अध्यक्ष कमलेश नवले व सचिव स्वप्निल बनसोडे यांनी या पालकमंत्री प्रतिमा आंघोळ आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

नेवासे फाटा ते शेवगाव हा नेवासे व शेवगाव या दोन्ही तालुक्यांसाठी महत्त्वाचा रस्ता असून, या दोन्ही तालुक्यांतील प्रमुख बाजारपेठा तसेच आठवडे बाजाराला जाण्या-येण्यासाठी या रस्त्याचा वापर नागरिकांकडून होतो.

पण या रस्त्यावर फूट-दीड फूट खड्डे पडले आहेत, रात्रीच्यावेळी अंधारात या खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकीस्वारांचे येथे अपघात झाले आहेत. काही यात जखमी होऊन अपंग झाले आहेत.

या रस्त्याच्या दुरुस्तीची वारंवार मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली गेली आहे. पण त्यांच्याकडून या मागणीची दखल घेतली जात नाही. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे भेंडा, कुकाणा, नेवासे, नेवासे फाटा, शेवगाव परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे.

त्यामुळे त्याची दुरुस्ती तातडीने होणे गरजेचे आहे. पण ती होत नसल्याने आता त्यासाठी ७ दिवसांची मुदत दिली जात असून, या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले नाही तर सातव्या दिवशी या रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या फोटोला जाहीर आंघोळ घातली जाणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment